अत्याधुनिक टेलिस्कोपच्या सहाय्याने रात्रीचे आकाशदर्शन करून विविध ग्रह, तारे पाहून त्यांच्याविषयी सखोल माहिती जाणून घेण्याची संधी मुंबईतील वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्राने उपलब्ध करून दिली आहे. विज्ञान प्रसारकार्यात अग्रेसर असलेल्या नेहरू विज्ञान केंद्रामध्ये खगोलविज्ञान विषयातील प्रशिक्षित तज्ञांच्या मदतीने अतिशय खुमासदार आणि रंजक पद्धतीने आकाशगंगेचं रहस्य उलगडून दाखविले जाणार आहे. यंदा ११, १३, १५ आणि १६ फेब्रुवारी २०२५ रोजी नेहरू विज्ञान केंद्राच्या गच्चीवर संध्याकाळी ५ः३० ते ८ वाजेदरम्यान खगोलप्रेमींसाठी आकाशदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे नेहरू विज्ञान केंद्राकडून सांगण्यात आले आहे.
नेहरू विज्ञान केंद्रातील आकाशदर्शन प्रकल्प आबालवृद्धांच्या आकर्षणाचा विषय ठरला आहे. नेहरू विज्ञान केंद्र हे केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयाअंतर्गत येणारी मुंबईतील प्रमुख व अत्याधुनिक विज्ञान प्रसार संस्था असून येथे अद्ययावत आकाश दर्शन केंद्र कार्यान्वीत आहे. खगोलविज्ञानाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी येथे वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते.
आकाशदर्शन कार्यक्रमापूर्वी आकाशगंगेची माहिती देण्यासाठी नेहरू विज्ञान केंद्रामध्ये दृक-श्राव्य माध्यमातून छोटी कार्यशाळा घेतली जाते. ‘सायन्स ऑन स्पीयर शो’ नावाच्या या शोमध्ये गोलाकार डिस्प्लेवर पृथ्वी आणि सौर मंडळाची गतिशीलता आणि अप्रतिम ॲनिमेटेड दृश्ये खगोलप्रेमींना दाखवली जातात. त्यानंतर गच्चीवर होणाऱ्या आकाशदर्शन कार्यक्रमात अत्याधुनिक दुर्बिणीद्वारे खगोलात फिरणाऱ्या ग्रह-ताऱ्यांचे निरीक्षण केले जाते आणि रात्रीच्या आकाशातील विविध रहस्ये उलगडून दाखवले जाते.
या आकाशदर्शन कार्यक्रमासाठी प्रत्येकी १०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गुगल फॉर्म भरून आगाऊ नोंदणी करणे आवश्यक असल्याचे केंद्राकडून सांगण्यात आले आहे. याविषयी अधिक माहिती edu.nscm@gmail dot com या ईमेल पत्त्यावर अथवा 022-31059022 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या