ज्योतिषशास्त्रानुसार अवकाशात असलेले नऊ ग्रह मनुष्याच्या आयुष्याशी निगडित असतात. या ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींचा प्रभाव राशीचक्रातील राशींवर पडत असतो. ग्रह आणि नक्षत्र जेव्हा राशी परिवर्तन करतात तेव्हा या राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक बदल दिसून येतात. हे बदल काही राशींसाठी शुभ तर तेच बदल इतर राशींसाठी अशुभ असतात. शास्त्रात नवग्रहांना प्रचंड महत्व आहे. या नवग्रहांमध्ये शनिदेवाला महत्वाचे स्थान आहे. ज्योतिष अभ्यासानुसार शनि ग्रह सर्वात कमी वेगाने गोचर करतात त्यामुळे शनिदेवाच्या शुभ-अशुभ प्रभावाचा कालावधी राशींवर जास्त काळासाठी पडत असतो.
वैदिक शास्त्रानुसार शनिदेव कर्मानुसार त्या-त्या राशीला फळ देत असल्याचे म्हटले जाते. चांगले कर्म करणाऱ्यांना चांगले फळ तर वाईट कर्म करणाऱ्यांना वाईट फळ ते देत असतात. परंतु बऱ्याचवेळा शनीदेव अशुभ स्थानात असल्यानेदेखील काही राशींना त्रास सहन करावा लागतो. ज्योतिष शास्त्रानुसार, शनिदेव सध्या आपल्या मूळ राशीत म्हणजेच कुंभ राशीत विराजमान आहेत. शनिदेव ज्या राशीत स्थित असतात त्या राशीवर किंवा आजूबाजूच्या राशींवर शुभ अशुभ दृष्टी टाकत असतात. सध्या शनिदेवाची अशुभ तिसरी दृष्टी मंगळवर पडत आहे. याचा काहीसा त्रास राशीचक्रातील तीन राशींना सहन करावा लागणार आहे. पाहूया कोणत्या तीन राशींना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
मंगळवर पडणाऱ्या शनिदेवाच्या तिसऱ्या अशुभ दृष्टीचा नकारात्मक परिणाम तूळ राशीवर पडणार आहे. तूळ राशीच्या लोकांना विविध क्षेत्रात अपयश सहन करावे लागेल. महत्वाच्या कामात अडचणी आलेल्या दिसून येतील. हातातील कामे रेंगाळतील. याकाळात कोणत्याही क्षेत्रात आर्थिक गुंतवणूक करणे टाळा. नाहीतर नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. कार्यक्षेत्रात त्रास जाणवेल. विरोधकांच्या कारवाया वाढतील. त्यातून मानसिक तणाव निर्माण होईल. कुटुंबातील सदस्यांसोबत एखाद्या गोष्टीवरुन वादविवाद होतील. त्यामुळे आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. आर्थिक चणचण भासेल.
वृश्चिक राशीच्या लोकांनासुद्धा शनिदेवाच्या तिसऱ्या अशुभ दृष्टीचा नकारात्मक परिणाम सहन करावा लागणार आहे. आयुष्यात विविध अडचणी येतील. मात्र त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही सापडेल. कामाच्या ठिकाणी तणावात्मक वातावरण राहील. त्यामुळे सतत चिडचिड होईल. अनेक चांगल्या संधी हातातून निसटतील. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडेल. याकाळात योग-ध्यान करण्याने काहीसा आराम मिळेल. कोणत्याही व्यक्तीवर पटकन विश्वास ठेवणे टाळा. अथवा तुमचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. ऑफिसमध्ये वरिष्ठांचा दवाब जाणवेल. त्यामुळे तुमची बढती रखडेल. शिवाय पैशांच्या अडचणी जाणवतील.
कन्या राशीच्या लोकांनासुद्धा शनिदेवाच्या अशुभ कृपेचा काहीसा त्रास होणार आहे. या लोकांना खाजगी आणि व्यावसायिक आयुष्यातसुद्धा विविध अडचणींचा सामना करावा लागणार आहे. अगदी लहान लहान गोष्टींसाठीसुद्धा प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. सतत घडत असलेल्या नकारात्मक गोष्टींमुळे मनावरचा ताण वाढेल. आर्थिक बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल. अथवा नुकसान होण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. नाहीतर कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. जोडीदाराला समजून घेण्याचा प्रयत्न करा. अन्यथा वैवाहिक आयुष्यातील ताळमेळ बिघडू शकतो.
संबंधित बातम्या