Tortoise Ring : 'या' राशीच्या लोकांनी अजिबात घालू नये कासवाची अंगठी! काय आहे नेमके कारण?
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Tortoise Ring : 'या' राशीच्या लोकांनी अजिबात घालू नये कासवाची अंगठी! काय आहे नेमके कारण?

Tortoise Ring : 'या' राशीच्या लोकांनी अजिबात घालू नये कासवाची अंगठी! काय आहे नेमके कारण?

May 26, 2024 03:36 PM IST

Astrological Prediction Tortoise Ring : कासवाची अंगठी काही राशींना परिधान करणे अतिशय शुभ आणि भरभराटीची असते. तर काही राशींना अतिशय अशुभ आणि नुकसानदायक असते. जाणून घ्या कोणत्या राशीच्या लोकांनी अंगठी घालावी व कोणी घालू नये.

कासवाची अंगठी, राशीभविष्य
कासवाची अंगठी, राशीभविष्य (HT)

जोतिषशास्त्रात राशीनुसार विविध आभूषणे प्रचलित असतात. त्यातीलच एक म्हणजे कासवाची अंगठी होय. कासवाच्या अंगठीला जोतिषशास्त्रात अनन्यसाधारण महत्व आहे. कासवाला विष्णू देवाचा अवतार समजले जाते. तसेच कासवाला धनसंपत्तीचे प्रतीकही म्हटले जाते. म्हणूनच सकारात्मक प्रभावासाठी कासवाची अंगठी हातात घातली जाते. कासवाची अंगठी हातात घातल्याने धनलाभ होतो, आर्थिक स्थिती सुधारते, घरामध्ये सुख समृद्धी येते अशी मान्यता आहे. त्यामुळेच अनेक लोक कासवाची अंगठी धारण करत असतात.

कासव हा पाण्यात राहणारा जलचर प्राणी आहे. लक्ष्मी देवीची उत्पत्तीसुद्धा समुद्र मंथनादरम्यान पाण्यामध्येच झाल्याचे सांगितले जाते. पाण्यात असल्यामुळे कासवामध्ये पाण्याचे शीतल असे गुणधर्म असतात. एखाद्या व्यक्तीचा स्वभाव अतिशय रागीट आणि उग्र आहे अशा लोकांना शांत राहण्यासाठी या अंगठीचा जास्त फायदा होतो.

मात्र जोतिषशास्त्रात एका राशीला ज्या गोष्टीपासून लाभ मिळतो, तर दुसऱ्या राशीच्या लोकांना त्यापासून नुकसान होऊ शकते. कासवाची अंगठी काही राशींना परिधान करणे अतिशय शुभ आणि भरभराटीची असते. तर काही राशींना अतिशय अशुभ आणि नुकसानदायक असते. त्यामुळेच कासवाची अंगठी सरसकट सर्वानी धारण करणे टाळावे. शास्त्रानुसार कोणत्या राशींनी कासवाची अंगठी आपल्या हातात घालू नये याबाबत जाणून घेऊया.

मेष

जोतिष शास्त्रानुसार राशीचक्रातील पहिली राशी असणाऱ्या मेष राशीने कधीच कासवाची अंगठी हातात घालू नये. कारण मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ असतो. अशा परिस्थिती कासवाची अंगठी घातल्यास तुमच्या आयुष्यात विविध समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे शक्यतो जोतिषांचा सल्ला घेऊनच निर्णय घ्यावा.

कन्या

कन्या राशीच्या लोकांनीसुद्धा कासवाची अंगठी घालणे टाळावे. कारण कन्या राशीचा स्वामी ग्रह बुध आहे. अशात तुम्ही कासवाची अंगठी परिधान केल्यास तुम्हाला आर्थिक नुकसानाला तोंड द्यावे लागू शकते. शिवाय तुमच्या वैवाहिक आयुष्यातसुद्धा अडचणी येऊ शकतात.

वृश्चिक

मेष आणि कन्या राशीप्रमाणेच वृश्चिक राशीच्या लोकांनी कासवाची अंगठी हातात घालणे टाळावे. कारण मेषप्रमाणे या राशीचा स्वामी ग्रहसुद्धा मंगळ आहे. जर या लोकांनी कासवाची अंगठी धारण केली तर त्यांच्यावर मंगळ ग्रहाची अशुभ दृष्टी पडण्याची भीती असते.

मीन

जोतिष शास्त्रानुसार मीन राशीच्या लोकांनीसुद्धा कासवाची अंगठी आपल्या हातात घालू नये. या राशीचा स्वामी ग्रह बृहस्पती असतो. अशा स्थितीत जर तुम्ही कासवाची अंगठी हातात घातली तर त्याचे दुष्परिणाम दिसून येतील. तुमची आर्थिक स्थिती बिघडण्याची शक्यता असते. शिवाय प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला नुकसान होऊ शकते.

कोणत्या राशीच्या लोकांनी अंगठी घालावी

जोतिष अभ्यासानुसार वृषभ आणि मकर राशीच्या लोकांनी कासवाची अंगठी हातात घालणे फायदेशीर ठरते. या राशीच्या लोकांना कासवाच्या अंगठीमुळे सुखाचे दिवस येतात. आयुष्यातील अडचणी नष्ट होतात. शिवाय हातात पैसा येतो. आणि आर्थिक स्थिती सुधारते. त्यामुळे या लोकांनी ही अंगठी धारण करणे शुभ आहे. 

कासवाची अंगठी कशी असावी

कासवाची अंगठी घालण्याचीसुद्धा एक विशिष्ट पद्धत शास्त्रात सांगितली आहे. कासवाची अंगठी नेहमीच चांदीची असावी. कासवाच्या पाठीवर 'श्री' असे लिहिलेले असावे. तसेच कोणत्याही महिन्याच्या पौर्णिमेला ही अंगठी खरेदी करावी. त्यानंतर तुळशी पत्र, मध, गंगाजल, दही अशा पाच पदार्थांचा पंचामृत बनवून घ्यावा. तसेच विष्णू देव आणि देवी लक्ष्मीजवळ दिवा पेटवून १०८ वेळा 'ऊं भगवते कुर्माय ही नमः' या मंत्राचा जप करावा. त्यांनंतर पंचामृतने त्या अंगठीला अभिषेक करावे आणि मग ही अंगठी आपल्या हातात धारण करावी. आणखी एक गोष्ट म्हणजे अंगठी घालताना त्यातील कासवाचे मुख आपल्याकडेच असेल याची खात्री करुन घ्यावी.

Whats_app_banner