आपल्या देशामध्ये विविध जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. प्रत्येक धर्माच्या चालीरिती आणि मान्यतांमध्ये विविध बदल पाहायला मिळतात. धर्मानुसार त्या-त्या लोकांच्या धार्मिक श्रद्धा बदलत असतात. अंकभविष्यानुसार प्रत्येक धर्मात लोकांसाठी काही विशेष अंक महत्वाचे असतात. जोतिष शास्त्रानुसार हिंदू धर्मात ४ हा अंक अतिशय महत्वाचा मानला जातो. तसेच इस्लाम धर्मात ७८६ हा क्रमांक फारच महत्वाचा समजला जातो. अनेक लोक आपल्या घरावर, वाहनांवर आणि आवडत्या गोष्टींवर या क्रमांकांचा उल्लेख करतात. इतकेच नव्हे तर अनेक हिंदी चित्रपटांमध्येसुद्धा या क्रमांकाचा उल्लेख करण्यात येतो.
परंतु अनेकांना या आकड्यामागची खरी भावना किंवा कारण माहितीच नाही. त्यामुळेच आज आपण मुस्लिम बांधवांना ७८६ हा आकडा इतका प्रिय का आहे? हे जाणून घेणार आहोत. कोणत्याही ठिकाणी ७८६ हा क्रमांक पाहताच आपल्याला मुस्लिम बांधवांचा विचार मनात येतो. याचं कारण म्हणजे हे लोक या क्रमांकाला अतिशय पवित्र मानतात. आणि प्रत्येक शुभ कार्यात या क्रमांकाचा आवर्जून वापर करतात. मात्र खरच इस्लाम धर्मात या क्रमांकाला विशेष महत्व आहे? की हा फक्त एक आकडा आहे असे अनेक प्रश्न बहुतांश लोकांच्या मनात येतात.
आपल्या इथे हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्याची आखणी करताना नेहमीच देवी-देवतांच्या नावाचा उल्लेख अथवा जप केला जातो. त्याचप्रमाणे ईस्लाम धर्मात ७८६ या अंकाला शुभ मानून त्याचा उल्लेख केला जातो. आता विविध धर्मा अभ्यासानुसार याचे विविध महत्व प्रचलित आहेत. मात्र यामागचे सर्वात महत्वाचे आणि प्रभावी कारण एक आहे. ईस्लाम धर्मानुसार 'बिस्मिल्लाह अल रहमान अल रहीम' हे अल्लाहचे नाव आहे.
'बिस्मिल्लाह अल रहमान अल रहीम' हे नाव अरबी भाषेत लिहिले गेले आहे. अल्लाहच्या नावातील अक्षरांची एकूण संख्या ७८६ असल्याचे सांगितले जाते. आणि अशातच मुस्लिम लोक अल्लाहच्या नावाच्या जागी ७८६ या अंकाचा वापर करतात. अल्लाहच्या नावाशी संबंधित असल्याने ७८६ या क्रमांकाला मुस्लिम बांधवांमध्ये अतिशय महत्व आहे. त्यामुळेच कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना मुस्लिम लोक ७८६ लिहून सुरुवात करतात. एकप्रकारे हे लोक अल्लाहच्या नावाचे स्मरण करत असतात.
'बिस्मिल्लाह अल रहमान अल रहीम' या शब्दाचा अर्थ 'अल्लाह' म्हणजेच अतिशय दयाळू, पवित्र आणि कृपाशिल असा होतो. परंतु आपल्या देशातील मुस्लिम बांधवांमध्ये ७८६ या क्रमांकांबद्दल विविध मान्यता आणि मते प्रचलित आहेत. काही लोकांच्या मते ७८६ क्रमांक हा केवळ आकडा आहे. याचा इस्लाम धर्माशी काहीही संबंध नसल्याचे म्हणतात. तर काही लोक 'बिस्मिल्लाह' च्या जागी ७८६ हा क्रमांक वापरणे हे केवळ मान्यता असल्याचे म्हणतात. तर अरबी देशात जन्मलेल्या अनेक लोकांना ७८६ या क्रमांकाबद्दल असलेल्या मान्यता माहितीच नाहीत. त्यांच्या मते 'अल्लाह'चे नाव घेताना अंकाच्या ऐवजी पूर्ण आत्मीयतेने आणि आदराने घेतले गेले पाहिजे. परंतु आपल्या देशात अनेक मुस्लिम लोक या क्रमांकाला पवित्र मानतात.
बॉलिवूड चित्रपटांमध्ये विविध धर्माच्या चालीरीती अत्यंत सुंदर पद्धतीने पडद्यावर दाखवल्या जातात. त्यानुसारच, बिग बी अमिताभ बच्चन यांच्या 'कुली' या चित्रपटात ७८६ या अंकाला अत्यंत सिम्बॉलिक पद्धतीने दाखवण्यात आले आहे. तर बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि अभिनेत्री प्रीती झिंटाच्या 'वीर जारा' या गाजलेल्या चित्रपटातसुद्धा ७८६ या पवित्र अंकांचा उल्लेख करण्यात आला आहे. तर अक्षय कुमारच्या 'खिलाडी ७८६' या चित्रपटाच्या नावातच ७८६ च्या उल्लेख करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या