Ank Jyotish : हिंदू धर्मात ५ या अंकाला समजलं जातं अतिशय शुभ! काय आहे 'पंच' चे धार्मिक महत्व?
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Ank Jyotish : हिंदू धर्मात ५ या अंकाला समजलं जातं अतिशय शुभ! काय आहे 'पंच' चे धार्मिक महत्व?

Ank Jyotish : हिंदू धर्मात ५ या अंकाला समजलं जातं अतिशय शुभ! काय आहे 'पंच' चे धार्मिक महत्व?

Published Jun 27, 2024 11:31 AM IST

Mulank 5 Significance : शास्त्रानुसार हिंदू धर्मात पूजा, धार्मिक विधी किंवा शुभ कार्यात 'पंच'ला विशेष महत्त्व दिले जाते. ५ या अंकालाच पंच म्हणून संबोधले जाते. पंचचे काय महत्व आहे जाणून घ्या.

हिंदू धर्मात मूलांक ५ 'पंच' चे धार्मिक महत्व
हिंदू धर्मात मूलांक ५ 'पंच' चे धार्मिक महत्व

प्रत्येक धर्मात विविध चालीरीती रुढ असतात. वैदिक शास्त्रानुसार या चालीरीतींना विशेष महत्व असते. त्यामुळे त्यांचे पालन करणे गरजेचे असते. हिंदू धर्मातसुद्धा पूजापाठ करण्यासाठी विविध नियम आणि चालीरीती निश्चित करण्यात आल्या आहेत. शास्त्रानुसार हिंदू धर्मात पूजा, धार्मिक विधी किंवा शुभ कार्यात 'पंच'ला विशेष महत्त्व दिले जाते. ५ या अंकालाच पंच म्हणून संबोधले जाते. त्यानुसार सर्व शुभ गोष्टींमध्ये पंचचा आवर्जून उल्लेख केला जातो. उदाहरणार्थ पंचदेव, पंचामृत, पंचगव्य, पल्लव, पाच कर्मेंद्रिये, पंचोपचार पूजा, पंचांग इ. होय. हिंदू धर्मात ५ या अंकाचे धार्मिक महत्व काय आहे? याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

पंचदेव- 

वैदिक शास्त्रानुसार हिंदू धर्मात पंचदेवांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. पंचदेवांच्या पूजेशिवाय कोणतेही शुभ कार्य अपूर्ण मानले जाते. पंचदेवांमध्ये सूर्यदेव आकाश तत्व, श्री गणेश जवा तत्व, दुर्गा माता अग्नि तत्व, भगवान शिव पृथ्वी तत्व आणि भगवान विष्णू वायु तत्वाचे प्रतिनिधित्व करतात. धार्मिक श्रद्धेनुसार या पाच देवी-देवतांची पूजा केल्यानंतरच कोणतेही शुभ कार्य पूर्ण होते.

पंचोपचार- 

पंचोपचार पूजा पद्धतीमध्ये कोणत्याही देवी-देवतेची पाच प्रकारे पूजा करण्यासाठी ५ प्रकारची आसने सांगितली आहेत. धर्मात अशी मान्यता आहे की, या आसनात पूजा केल्याने देवी-देवता आराधनेचे साहित्य स्वीकारतात. यामध्ये गंध मुद्रा, पुष्प मुद्रा, धूप मुद्रा, दीप मुद्रा आणि नैवेद्य मुद्रा अशा पाच मुद्रा निश्चित करण्यात आल्या आहेत.

पंचगव्य

पूजेत पंचगव्यालाही विशेष महत्त्व आहे. पंचगव्यामध्ये गायीशी संबंधित पाच प्रकारच्या गोष्टींचा समावेश होतो. वैदिक शास्त्रानुसार सांगायचे झाले तर यामध्ये तपकिरी गाईचे गोमूत्र, लाल गाईचे शेण, पांढऱ्या गायीचे दूध, काळ्या गाईच्या दुधापासून बनवलेले दही आणि दोन रंगाच्या गाईचे तूप यांचे मिश्रण असते. यालाच 'पंचगव्य' असे संबोधले जाते.

पंचामृत- 

हिंदू धर्मातील प्रत्येक पूजेमध्ये पंचामृत अर्पण करणे आवश्यक असते. दूध, दही, तूप, गूळ आणि मध यांच्या मिश्रणातून पंचामृत तयार केले जाते.

पंचांगचे महत्त्व - 

प्रत्येक धर्मात विविध धार्मिक ग्रंथ पाहायला मिळतात. त्यानुसारच हिंदू धर्मातदेखील महत्वाच्या धार्मिक ग्रंथांपैकी एक पंचांग होय. यामध्ये नक्षत्र, करण, वार, तिथी आणि योग इत्यादीबद्दल सविस्तर माहिती दिलेली असते.

पंच पल्लव- 

पूजेमध्ये पंच पल्लव म्हणजेच पाच पवित्र आणि धार्मिक महत्व असणाऱ्या वृक्षांची पाने शुभ मानली जातात. यामध्ये पिंपळ, आंबा, अशोक, सायकमोर आणि वडाच्या झाडाची पाने समाविष्ट असतात.

Whats_app_banner