आपल्या संस्कृतीमध्ये अंक ज्योतिष एक महत्वाचे शास्त्र आहे. यालाच संख्याशात्र किंवा न्यूमरॉलॉजी असेदेखील म्हटले जाते. अंकशास्त्रात अंकांच्या साहाय्याने लोकांचे भविष्य सांगितले जाते. यामध्ये प्रामुख्याने नऊ ग्रहांच्या विशेषणे प्रत्येक राशी आणि मूलांकांना लागू केली जातात. त्यामुळे या ग्रह-नक्षत्रांचा प्रभाव राशी आणि मूलांकावर पडत असतो. अंक भविष्यात प्रत्येक मूलांकाच्या आधारे त्या-त्या व्यक्तीचे भविष्य, स्वभाव, गुणदोष, करिअर, वैवाहिक आयुष्य याबाबत अंदाज बांधले जातात. आज आपण याच मूलांकाच्या आधारे व्यक्तीचे स्वभावगुण पाहणार आहोत.
मूलांकानुसार प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव बदलत असतो. त्यामुळेच काही लोक रागीट असतात तर काही अतिशय लाजाळू असतात. तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीचा स्वभाव जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही त्याच्या जन्म तारखेच्या साहाय्याने जाणून घेऊ शकता.
कारण जन्म तारखेवरुनच मूलांक काढला जातो. त्यानुसार अंकभविष्यात ५, १४, २३ या तारखेला जन्मलेले लोक अतिशय लाजाळू असतात. या जन्मतारखेनुसार त्यांचा मूलांक ५ असतो. हा मूलांक खास आहे. या मूलांकाच्या लोकांबद्दल आपण अधिक जाणून घेऊया.
अंक भविष्यानुसार ५, १४, २३ या तारखेला जन्मलेले लोक अर्थातच मूलांक ५ चे लोक प्रचंड लाजाळू असतात. या लोकांना आपल्या मनातील भावना व्यक्त करणे सहजासहजी जमत नाही. लोकांच्यात पटकन मिळूनमिसळून राहणे यांना कठीण जाते. तसेच एखाद्या व्यक्तीसोबत नातेसंबंध दृढ करण्यासाठी यांना बराच वेळ लागतो. हे लोक कलात्मक आणि रचनात्मक स्वभावाचे असतात. बौद्धिक क्षमता उत्तम असण्यासोबतच यांच्याकडे दूरदृष्टीसुद्धा चांगली असते. मूलांक ५ च्या लोकांना कला क्षेत्रातील प्रचंड माहिती असते.
मूलांक ५ असणाऱ्या या व्यक्तींवर बुध ग्रहाची कृपा असते. त्यामुळे हे व्यापार-उद्योगात अतिशय हुशार असतात. या लोकांना नियोजनबद्ध काम करणे पसंत असते. त्यामुळे व्यापारात यांचा चांगला जम बसतो. या लोकांना पैशांची बचत करण्याची कला अवगत असते. त्यामुळे यांच्याकडून अनावश्यक खर्च होत नाही. या मूलांकाचे लोक प्रामुख्याने मार्केटिंग, लेखन, उद्योग या क्षेत्रात नावलौकिक मिळवतात.