वैदिक शास्त्रानुसार लक्ष्मीला धन आणि वैभवाची देवी म्हटले जाते. ज्या लोकांवर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो. त्यांना आयुष्यात कधीच धनधान्याची किंवा इतर कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. त्यामुळेच प्रत्येक व्यक्ती लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो. मात्र काही लोकांना काहीही न करता आयुष्यभर देवी लक्ष्मीची शुभ कृपादृष्टी लाभते.
ज्योतिषशास्त्रामध्ये राशीभविष्याप्रमाणे अंकभविष्याला प्रचंड महत्व आहे. अंकशास्त्रात अंकावर विशेष भर दिला जातो. अंकांच्या साहाय्याने भविष्य सांगितले जाते. मात्र अंकशास्त्रात केवळ भविष्यच समजत नाही तर, एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, आवडीनिवडी आणि गुणवैशिष्ट्येदेखील समजतात. अंकशास्त्रात मूलांकाच्या आधारे भविष्य सांगितले जाते. मूलांक म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या जन्म तारखेच्या बेरजेवरुन मिळालेला अंक होय. उदाहरणार्थ, जर तुमची जन्मतारीख कोणत्याही महिन्याची १७ तारीख असेल तर त्याच्या बेरजेवरून तुमचा मूलांक ८ असतो. अंकशास्त्रात १ ते ९ असे एकूण ९ मूलांक असतात.
राशीप्रमाणे मूलांकाचासुद्धा प्रत्येकाचा एक स्वामी ग्रह असतो. त्या ग्रहाचा पूर्ण प्रभाव त्या मूलांकावर पडत असतो. त्यामुळेच प्रत्येक मूलांकाच्या व्यक्तीचे गुणधर्म वेगळे असतात. प्रत्येक मूलांकावर त्या-त्या देवी देवतांचा प्रभाव असतो. त्याचप्रमाणे काही जन्म तारखेच्या लोकांवर देवी लक्ष्मीचा शुभ प्रभाव आहे. लक्ष्मीच्या प्रभावाने या मूलांकाच्या लोकांना विशेष लाभ मिळत असतो. त्यामुळेच या राशीच्या लोकांना आयुष्यात कधीही आर्थिक चणचण भासत नाही. शिवाय आर्थिक नुकसानही होत नाही. आणि झालेच तरी फारच कमी प्रमाणात होते.
अंकशास्त्रानुसार मूलांक ६ च्या लोकांवर लक्ष्मीची विशेष कृपा असते. यामध्ये कोणत्याही महिन्याच्या ६, १५, २४ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ६ असतो. त्यामुळेच या जन्म तारखेच्या लोकांवर देवी लक्ष्मी नेहमीच प्रसन्न असते. या लोकांना आयुष्यात कधीच पैशांची कमतरता भासत नाही. हे लोक ऐश्वर्याचे धनी असतात. या लोकांना आयुष्यात प्रचंड भौतिक सुख मिळते. त्यामुळेच त्यांचे जीवन ऐषोरामी असते. या लोकांना मिळकतीचे अनेक मार्ग सापडतात. त्यामुळेच त्यांच्याकडे आर्थिक बचत मोठ्या प्रमाणात होते.
मूलांक ६ चे लोक अत्यंत कष्टाळू आणि हुशार असतात. कष्टाच्या जोरावर हे लोक आयुष्यात प्रचंड संपत्ती कमावतात. शिवाय या लोकांचे मन फारच मोठे असते. कारण हे लोक खर्च करताना कधीही आकडता हात घेत नाहीत. जवळच्या व्यक्तींवर पैसे खर्च करण्याने यांना आनंद मिळतो. हे लोक सतत इतरांना सरप्राईज आणि भेटवस्तू देत असतात. या लोकांच्या मनमिळाऊ आणि दयाळू स्वभावामुळे लोक पटकन त्यांच्याकडे आकर्षित होतात. मूलांक ६ च्या लोकांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव आणि दबदबा लोकांवर असतो.