विवाह हा आपल्या आयुष्यातील एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. विवाहाने फक्त दोन व्यक्ती नव्हे तर दोन कुटुंब एकत्र येतात. यामुळे अनेक सकारत्मक बदल घडून येतात. अनेक लोक यातून आपल्या भविष्याची स्वप्ने रंगवत असतात. हिंदू धर्मात वधू-वरांच्या जन्म राशी आणि जन्म तारखेवरुन विवाह तिथी निश्चित केल्या जातात. सर्व मंगलकार्य प्रामुख्याने शुभ मुहूर्त आणि तिथी पाहून पार पाडली जातात. परंतु बदलत्या जगात काही लोक ट्रेंड नुसार आपल्या लग्नाची तारीख निश्चित करत असतात. मात्र जोतिषशास्त्राचा आधार घेऊन या तारखा ठरवणे लाभदायक आणि शुभ समजले जाते.
जर तुमचाही साखरपुडा झालाय, आणि आता लग्नाची तारीख ठरवण्यासाठी वाटचाल सुरु आहे, तर ही माहिती तुम्हाला निश्चितच फायदेशीर ठरेल. वधू-वराची कुंडली पाहून जी तारीख काढली जाते त्यालाच मुहूर्त असे म्हणतात. विवाहा इतकाच विवाहाचा मुहूर्तदेखील सुखी वैवाहिक आयुष्यात महत्वाची भूमिका बजावत असल्याची मान्यता आहे. याबाबतच आज आपण जाणून घेणार आहोत.
जोतिषशास्त्रात राशीभविष्य, रत्न शास्त्र, हस्तरेखा शास्त्र यानुसारच अंकशास्त्रालासुद्धा अनन्यसाधारण महत्व आहे. राशीभविष्यात ज्याप्रमाणे राशींवरुन भविष्य सांगितले जाते. त्याप्रमाणेच अंकभविष्यात मूलांकावरुन भविष्याचा अंदाज बांधला जातो. बहुतांश लोकांना मूलांक म्हणजे काय याची अद्याप कल्पना नाही. तर मूलांक तुमच्या जन्म तारखेवरुन निश्चित केला जातो. उदाहरणार्थ तुमची जन्म तारीख १५ असेल तर तुमचा मूलांक ६ असतो. अंकशास्त्रात १ ते ९ असे एकूण नऊ मूलांक आहेत. या मूलांकांचा आधार घेऊन तुमचे भविष्य, करिअर, आर्थिक, वैवाहिक घडामोडी आणि प्रेम जीवनाबाबत सांगितले जाते.
विवाहामध्ये दोन व्यक्ती एकत्र येऊन नव्या आयुष्याची सुरुवात करत असतात. या नात्यातून अनेक अपेक्षा आणि आकांक्षा असतात. प्रत्येक तरुण किंवा तरुणी आतुरतेने आपल्या लग्नाची वाट पाहात असते. या संकल्पनेतून प्रत्येक व्यक्तीला एक हक्काचा अर्थातच जोडीदार मिळतो. त्यामुळे हा दिवस अत्यंत खास बनवण्याची सर्वांची इच्छा असते.
शास्त्रानुसार आयुष्यातील हा खास दिवस आणखी खास बनवण्यासाठी आणि आयुष्यभर वैवाहिक सौख्य प्राप्त करण्यासाठी मुहूर्तावर लग्न करणे गरजेचे आहे. जोतिषशास्त्रानुसार वधू आणि वराच्या जन्मतारखेच्या बेरजेतून जो अंक मिळतो त्या अंकानुसार लग्नाची तारीख निश्चित करावी. उदाहरणार्थ एखाद्या वधू आणि वराची जन्मतारीख अनुक्रमे ३ आणि ५ असेल तर यांच्या बेरजेतून ८ हा मूलांक मिळतो. आणि ८ या अंकाला अनुसरुन लग्नाची तारीख निश्चित केल्यास प्रचंड लाभ मिळतो. तेव्हा लग्नाची तारीख ठरवताना अंकज्योतिषानुसार तारीख निश्चित करा आणि सुखी व आनंदी वैवाहीक जीवन अनुभवा.
संबंधित बातम्या