ज्योतिषशास्त्रात राशीभविष्याप्रमाणेच अंकभविष्यालासुद्धा प्रचंड महत्व आहे. सर्वसामान्य लोकांपासून नामांकित व्यक्तींपर्यंत अनेकजण आपल्या आयुष्यात अंकभविष्याचा आधार घेतात. अंकशास्त्रसुद्धा आपले भविष्य सांगण्याचे कार्य करते. राशीभविष्यात जसे राशीवरुन भविष्य सांगितले जाते तसेच अंकभविष्यात मूलांकावरुन भविष्याचा अंदाज बांधला जातो. प्रत्येक व्यक्तीच्या जन्म तारखेवरुन त्याचा मूलांक ठरत असतो. ज्योतिषशास्त्रात प्रत्येक मूलांकाचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. त्यानुसार त्या व्यक्तींच्या आयुष्यात सकारात्मक-नकारात्मक प्रभाव दिसून येतात. यामध्ये प्रत्येक मूलांकावर एखाद्या ग्रहाची विशेष कृपादृष्टी असते. त्याप्रमाणेच ५ या मूलांकावर बुध ग्रहाचा प्रभाव आहे. अंकशास्त्रात ५ या मूलांकाबाबत काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. आज आपण त्याबाबतचच जाणून घेणार आहोत.
शास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या ५, १४, २३ या तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ५ असतो. या मूलांकाचे लोक प्रचंड आकर्षक आणि प्रभावी असल्याचे मानले जाते. बुध हा मूलांक ५ चा स्वामी ग्रह आहे. बुध बुद्धी, ज्ञान या गुणधर्मांचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळेच या मूलांकाचे लोक बौद्धिकदृष्टया सक्षम आणि प्रचंड ज्ञानी असतात. या विचार महत्वपूर्ण समजले जातात. त्यामुळे समाजात त्यांना विशेष मानसन्मान मिळतो.
बुध ग्रहाच्या प्रभावाने हे लोक अत्यंत हुशार असतात. त्यांच्या बुद्धिमत्तेचे ठिकठिकाणी कौतुक केले जाते. त्यामुळेच लोक त्यांना आदर्श किंवा मार्गदर्शक म्हणून पाहात असतात. प्रत्येक गोष्टीतील पुरेसे ज्ञान असल्याने या लोकांचे संवाद कौशल्य उत्तम असते. कोणत्याही विषयावर हे लोक अगदी ठामपणे बोलू शकतात. त्यामुळे समाजात त्यांची विश्वासाहर्ता वाढते. हे लोक आपल्या बोलण्याने क्षणार्धात कोणालाही प्रभावित करु शकतात.
मूलांक ५ चे लोक हे सर्वगुणसंपन्न असतात. या लोकांचा स्वभाव कलात्मक आणि रचनात्मक असतो. कलेबाबत यांना विशेष आकर्षण असते. कोणत्याही गोष्टीत कलात्मक पद्धतीने विचार करण्याकडे यांचा कल असतो. शिवाय एखाद्या अडचणीच्या काळात योग्य मार्ग काढणे यांना सहज शक्य होते. त्यामुळेच लोक अडचणीच्या काळात यांचा सल्ला घेण्यास प्राधान्य देतात. या सर्व वैशिष्ट्यांमुळे हे लोक समाजात प्रसिद्ध असतात. शिवाय हे लोक अत्यंत दयाळू स्वभावाचे असतात. इतरांना मदत करण्यात अग्रेसर असतात. आपल्या संवाद कौशल्याने इतरांशी पटकन मैत्री होते. हे लोक प्रामुख्याने लेखन, पत्रकारिता आणि संपादन अशा क्षेत्रात जास्त यशस्वी होतात.
मूलांक ५ चे लोक विविध क्षेत्रांमध्ये अग्रेसर असले तरी प्रेमाच्या बाबतीत मात्र यांना थोडी प्रतीक्षा करावी लागते. आपल्या संवाद कौशल्याने हे लोक लोकांची मने जिंकतात. मात्र खऱ्या प्रेमासाठी यांना वाट पाहावी लागते. प्रेम मिळवणे यांच्यासाठी सोपे नसते. एखाद्या नाते यांच्यासाठी दीर्घकाळ टिकवणे कठीण असते. शिवाय यांचे वैवाहिक आयुष्यसुद्धा कमी कालावधीसाठीच असते.
संबंधित बातम्या