mulank 8 in Ank Shastra : ज्योतिषशास्त्रात राशीभविष्यानुसार अंकभविष्यसुद्धा तितकेच प्रभावी माध्यम आहे. आपल्या आयुष्यात अंकांना प्रचंड महत्व असते. प्रत्येक अंकांचे एक वेगळे वैशिष्ट्य असते. अंकभविष्यात याच अंकांच्या अर्थातच मूलांकाच्या साहाय्याने भविष्याचा आढावा घेतला जातो. मात्र अनेकांना वाचून आश्चर्य वाटेल अंकशास्त्रात फक्त भविष्यच सांगितले जात नाही. तर मूलांकाच्या आधारे त्या संबंधित व्यक्तीचा स्वभाव, त्याच्या आवडी-निवडी त्याची गुणवैशिष्ट्ये या सर्वांचा खुलासा केला जातो. त्यामुळेच अंकशास्त्राला विशेष महत्व आहे. सध्याच्या युगात सर्वसामान्य लोकांपासून मोठमोठ्या नामांकित लोकांपर्यंत सर्वचजण अंकशास्त्राचा आधार घेतात.
राशीभविष्यात राशी पाहून भविष्य सांगितले जाते. त्याचप्रमाणे अंकभविष्यात मूलांकाच्या सहाय्याने भविष्य सांगितले जाते. बहुतांश लोकांना मूलांकाबाबत कल्पनाच नाही. तर तुमच्या जन्म तारखेच्या बेरजेच्या आधारे जो अंक मिळतो त्याला मूलांक असे संबोधले जाते. उदाहरणार्थ, जर तुमची जन्म तारीख कोणत्याही महिन्याची ११ तारीख असेल, तर त्याच्या बेरजेच्या आधारे तुमचा मूलांक २ असतो. या प्रत्येक मूलांकाचा एक स्वामी ग्रह असतो. या ग्रहाचा प्रभाव या मूलांकाच्या लोकांवर दिसून येत असतो. त्यामुळेच प्रत्येक मूलांकाचे लोक वेगळ्या स्वभावाचे असतात. आज आपण अशा लोकांबाबत जाणून घेणार आहोत जे लोक अत्यंत न्यायप्रिय आणि शिस्तप्रिय असतात. शिवाय या लोकांवर नेहमीच शनिदेवाची कृपा असते. पाहूया हा भाग्यवान मूलांक नेमका कोणता आहे.
अंकशास्त्रानुसार अत्यंत शिस्तप्रिय आणि न्यायप्रिय असणारा अंक म्हणजे ८ हा मूलांक होय. कोणत्याही महिन्याच्या ८, १७ आणि २६ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ८ असतो. ८ या मूलांकाचा स्वामी ग्रह शनी आहे. शनिदेव हे अत्यंत न्यायप्रिय, शिस्तप्रिय आणि कर्मानुसार फळ देणारे देवता आहेत. त्यामुळेच ८ या मूलांकाचे लोकसुद्धा अत्यंत शिस्तप्रिय आणि न्यायप्रिय असतात. या लोकांना घरामध्ये किंवा राहत्या ठिकाणी पसारा, गोंधळ, अस्वच्छता अजिबात पसंत नसते. या लोकांना सर्वप्रथम शिस्त प्रिय असते. या मूलांकाचे लोक प्रत्येक गोष्ट अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करतात.
मूलांक ८ च्या लोकांना भौतिक आणि अध्यात्मिक गोष्टींमध्ये समतोल साधणे योग्यरित्या साध्य होते. एखादी गोष्ट करण्याचा निश्चय केल्यास हे लोक कधीच मागे हटत नाहीत. महत्वाचं म्हणजे या मूलांकाच्या लोकांवर शनीदेवाची विशेष कृपा असते. त्यामुळे या लोकांना प्रत्येक गोष्टीत यश मिळते. हे लोक अत्यंत कष्टाळू असतात. मूलांक ८ चे लोक आपल्या कष्टाच्या जोरावर आयुष्यात बरीच धनसंपत्ती कमवतात. या मुलांकाचे स्वामी शनीदेव असल्याने हे लोक कर्मावर विश्वास ठेवतात. चांगले कर्म केल्याने चांगले फळ प्राप्त होते या युक्तीवर चालतात. त्यामुळे शनिदेव यांच्यावर शुभ कृपादृष्टी ठेवतात.
मूलांक ८ च्या लोकांना पराभव पचत नाही. या लोकांना नेहमीच प्रत्येक गोष्टीत पहिल्या क्रमांकावर राहणे पसंत असते. त्यांना कोणत्याच गोष्टीत हार मंजूर नसते. त्यामुळे हे लोक यशस्वी होण्यासाठी जीवाची बाजी लावतात. या लोकांना स्वतःवर प्रचंड आत्मविश्वास असतो. आणि त्यामुळेच ते यशापर्यंत पोहोचतात. मूलांक ८ च्या लोकांना कोणतेही कार्य करण्यापूर्वी त्याची योजना आखण्याची सवय असते. त्यामुळे अपयश येण्याची शक्यता फार कमी असते. शिवाय हे लोक पैशांची बचत करण्यात चांगले असतात.