ज्योतिषशास्त्रात राशीभविष्यानुसार अंकभविष्यसुद्धा तितकेच प्रभावी माध्यम आहे. अंकशास्त्रात एखाद्या व्यक्तीच्या मूलांकावरुन विविध गोष्टींचा उलघडा केला जातो. अंकभविष्यात केवळ भविष्यच नव्हे तर व्यक्तीचा स्वभाव, गुणदोष, व्यवसाय, वैवाहिक आयुष्य अशा अनेक बाबींवर अंदाज बांधण्यात येतात. अनेक लोकांना आपल्या करिअरची चिंता वाटत असते. काही लोकांनां नोकरी करायची असते तर काहींना व्यवसाय करायचा असतो. अशावेळी आपल्याला त्या-त्या क्षेत्रात यश मिळेल का? अशी चिंता सतावत असते. परंतु ज्योतिषशास्त्रात यावरसुद्धा अचूक उपाय सांगण्यात आला आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीला त्याच्या राशीनुसार,जन्म तारखेनुसार क्षेत्र निवडणे लाभदायक ठरते. अनेकदा अचानक उठून कोणताही व्यवसाय करणे किंवा नोकरी करणे नुकसानीचे ठरु शकते. मान्यतेनुसार विशिष्ट ग्रह आपल्या राशींवर प्रभाव टाकत असतात. त्या ग्रहांच्या गुणधर्माचा प्रभाव आपल्या राशींवर असतो. आणि त्या ग्रहांच्या विरुद्ध जाऊन काही गोष्टी केल्यास त्याचा नकारात्मक परिणाम भोगावा लागतो. मग अशावेळी उद्योग-व्यवसायात नुकसान होणे, नोकरीमध्ये सतत अडचणी येणं अशा गोष्टी पहायला मिळतात. शास्त्रानुसार व्यवसाय सुरु करण्यापूर्वी किंवा एखाद्या नोकरीत रुजू होण्यापूर्वीच आपल्यासाठी तेच क्षेत्र किंवा उद्योग फलदायी आहे का? हे एकदा तपासून घ्यावे.
आज आपण मूलांकावरून कोणत्या व्यक्तीसाठी कोणता व्यवसाय आणि नोकरी योग्य असणार हे जाणून घेणार आहोत. बहुतांश लोकांना मूलांक म्हणजे काय? असा प्रश्न पडला असेल. तर आपल्या जन्मतारखेच्या बेरजेवरुन जो अंक मिळतो त्याला मूलांक म्हटले जाते. उदाहरणार्थ जर तुमची जन्म तारीख १८ असेल तर तुमचा मूलांक ९ असतो.
मूलांक १ वर सूर्याचा प्रभाव असतो. त्यामुळे हे लोक अत्यंत तेजस्वी असतात. या लोकांसाठी सरकारी नोकरी, पोलीस, उच्च अधिकारी अशा क्षेत्रात प्रगतीचे योग असतात. त्यामुळे या लोकांनी हे क्षेत्र निवडणे सोयीचे ठरते. कोणत्याही महिन्याच्या १, १०,१९,२८ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक १ असतो.
मूलांक २ वर चंद्राचा प्रभाव असतो. त्यामुळे हे लोक शांत आणि प्रभावी व्यक्तिमत्वाचे असतात. या लोकांनी कृषी, पशुपालन,राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्र निवडल्याने करिअर बहरते. कोणत्याही महिन्याच्या २, ११, २०, २९ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक २ असतो.
मूलांक ३ वर गुरुचा प्रभाव असतो. या लोकांना रचनात्मक कार्यांमध्ये रुची असते. त्यामुळेच या लोकांना लेखन, संगीत, राजकीय, वैद्यकीय या क्षेत्रांमध्ये प्रचंड यश मिळते. कोणत्याही महिन्याच्या ३, १२, २१, ३० तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ३ असतो.
मूलांक ४ वर राहूचा प्रभाव असतो. हे लोक समाजशील असतात. त्यामुळे या लोकांना प्रशासकीय, राजकीय, वायुसेना, लेखन अशा क्षेत्रात उत्तम यश मिळते. कोणत्याही महिन्याच्या ४, १३, २२,३१ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ४ असतो.
मूलांक ५ वर बुधचा प्रभाव असतो. हे लोक प्रॅक्टिकल स्वभावाचे असतात. या लोकांनी मार्केटिंग, विमा विभाग, बँकिंग, लोकसेवा, राजनीती अशा क्षेत्रामध्ये करिअर करणे सोयीस्कर ठरते. कोणत्याही महिन्याच्या ५, १४, २३ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ५ असतो.
मूलांक ६ वर शुक्र ग्रहाचा प्रभाव असतो. या मूलांकांचे लोक मितभाषी आणि कलात्मक वृत्तीचे असतात. त्यामुळेच या लोकांना समाजसेवा, हॉटेल, रेस्टोरंट, पर्यटन किंवा विदेशी व्यापार करणे अत्यंत लाभदायी ठरते. कोणत्याही महिन्याच्या ६, १५, २४ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ६ असतो.
मूलांक ७ वर केतूचा प्रभाव असतो. या मूलांकाचे लोक जिद्दी आणि संशोधकवृत्तीचे असतात. त्यामुळेच या लोकांना विज्ञान, संशोधन, पत्रकारिता, धर्मशोध, लेखन अशा क्षेत्रात करिअर करणे योग्य ठरते. कोणत्याही महिन्याच्या ७, १६, २५ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ७ असतो.
मूलांक ८ वर शनीचा प्रभाव असतो. या मूलांकाचे लोक प्रभावी व्यक्तिमत्वाचे आणि जिद्दी असतात. या लोकांना प्रकाशन, पशूपालन व्यवसाय, लोकसेवा, ज्योतिषशास्त्र अशा क्षेत्रात करिअर करणे अत्यंत फलदायी असते. कोणत्याही महिन्याच्या ८, १७, २६ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ८ असतो.
मूलांक ९ वर स्वामी ग्रह मंगळचा प्रभाव असतो. या मूलांकाचे लोक शिस्तप्रिय आणि रोखठोक स्वभावाचे असतात. या लोकांना शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, वैद्यकीय आणि रेल्वे विभागात काम करणे फायद्याचे ठरते. कोणत्याही महिन्याच्या ९, १८, २७ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ९ असतो.
संबंधित बातम्या