Mithun Rashi Career : नोकरी की व्यवसाय? मिथुन राशीच्या लोकांना कोणत्या क्षेत्रात अधिक लाभ मिळतो? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mithun Rashi Career : नोकरी की व्यवसाय? मिथुन राशीच्या लोकांना कोणत्या क्षेत्रात अधिक लाभ मिळतो? जाणून घ्या

Mithun Rashi Career : नोकरी की व्यवसाय? मिथुन राशीच्या लोकांना कोणत्या क्षेत्रात अधिक लाभ मिळतो? जाणून घ्या

Jan 18, 2024 05:25 PM IST

Mithun Rashi Career Predictions : राशीच्या गुणधर्मानुसार नोकरी, व्यवसाय निवडल्यास व्यक्तीची चांगली प्रगती होण्याची शक्यता असते. पाहूया मिथून राशीसाठी करियरचे कोणते क्षेत्र अनुकूल आहे.

Mithun Rashi Career Predictions
Mithun Rashi Career Predictions

Mithun Career Predictions : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीची एक रास असते. त्या राशीचे काही गुणधर्म असतात, ते संबंधित व्यक्तीमध्ये आढळतात. त्या स्वभावधर्मानुसार त्या-त्या व्यक्तीचं जीवन चालतं, असं मानलं जातं. राशीच्या गुणधर्मानुसार नोकरी, व्यवसाय निवडल्यास व्यक्तीची चांगली प्रगती होण्याची शक्यता असते. पाहूया मिथून राशीसाठी करियरचे कोणते क्षेत्र अनुकूल आहे.

मिथुन राशीत येणारी नक्षत्रे 

आपल्या राशी आणि नक्षत्रानुसार कोणत्या क्षेत्रात करिअर करता येईल. याचा विचार आपण या ठिकाणी केलेला आहे. मिथुन राशी द्विस्वभाव प्रवृत्तीची असून वायु तत्त्वाची आहे. या राशीचा स्वामी बुध असून या मिथुन राशीत मंगळाचे मृगशीर्ष राहूचे आर्द्रा आणि गुरुचे पुनर्वसु ही नक्षत्रे येतात. 

मिथुन राशीवर मंगळ, बुध राहू व गुरु या ग्रहांचा प्रभाव दिसून येतो. त्यात मंगळाच्या मृगशीर्ष नक्षत्रांची दोन चरणे आणि गुरुच्या पुनर्वसु नक्षत्राची तीन चरणे येतात. राहूची चारही चरणे आणि बुधाच्या मालकीमुळे मिथुन राशीवर बुधाचा प्रभाव जास्त प्रमाणात असून बुध प्रधान व्यक्ती बौद्धिक क्षेत्रात काम करणाऱ्या असतात. 

वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रात डायरेक्टर अथवा उद्योग समुहाचे मालक, उद्योगपती तसेच प्राध्यापक, पत्रकार लेखक प्रकाशक, पुस्तक विक्रेते, वकील, संपादक, संशोधक म्हणून काम करणाऱ्या व्यक्ती या बुध ग्रहाच्या प्रभावाखाली असतात.

मिथुन राशींच्या व्यक्तींचा स्वभाव आणि गुणधर्म

मिथुन राशींचे लोक मेहनती व साधे जीवन जगणारे असतात. या लोकांना आयुष्यात बरेच चढाव-उतार बघावे लागतात. सोबतच या लोकांचा रसिक स्वभाव, तीक्ष्णबुद्धी असते.

कर्ज घेण्यादेण्यात वाकबगार असतात. संशोधक वृत्ती चिकित्सक स्वभाव आणि सदा गतीमान रहाण्याची आवड हे गुप्त गुण उपजतचं असतात. द्विस्वभाव प्रवृत्तीची असल्याने चंचल स्वभाव राहतो. ज्ञानाची इच्छा असणारी ही मिथुन राशी आहे. उत्तम ग्रहणशक्ती असलेली, हास्यविनोदी व खेळकर स्वभावाची ही राशी आहे. 

समयसूचकता चांगली असलेली ही राशी असून अस्थिर विचारसरणी असेही दुर्गुण या राशींच्या लोकांमध्ये आढळतात. सोबतच या राशीचे लोक बडबड्या वृत्तीचे असतात. अस्थिरता आणि गोंधळाची अवस्थाही दिसून येते. 

तसेच, मिथुन राशीचे लोक कल्पक विचारांच्या आणि स्वप्नाळूपणात जगतात. ज्ञानी असल्यातरी भरपूर बडबड करणाऱ्या आढळून येतात. विचारांमध्ये सतत बदल होत असतात. विचारातही स्थिरता कमीच दिसून येते. मिथुन राशीच्या व्यक्ती नेहमीच अस्थिर विचाराने वावरत असतात. अशा व्यक्तींची निष्ठा सतत बदलती असते. त्यामुळे मिथुन राशीच्या व्यक्ती सहजासहजी दुसऱ्या व्यक्तींवर विश्वास ठेवत नाहीत. या राशीच्या व्यक्ती नोकरीपेक्षा व्यवसायात जास्त रमताना दिसतात.

मिथुन राशींच्या व्यक्तींसाठी अनुकुल कार्यक्षेत्र

मिथुन राशीचा स्वामी बुध असून बुधाकडे बुध्दी, कल्पकता, आणि द्विस्वभावी वृत्ती यामुळे नोकरीत अस्वस्थ आणि अस्थिर राहतात. उद्योग क्षेत्रात मिथुन व्यक्तींना चांगल्या संधी मिळतात. त्यामुळे या राशींच्या व्यक्ती व्यवसायात जास्त आढळतात. 

नोकरी बद्दल विचार केला तर शिक्षणतज्ञ, शिक्षणाधिकारी म्हणून बौध्दिक क्षेत्रात, तसेच जाहिरात कलावंत, जाहिराततज्ञ, ज्या ठिकाणी खूप बोलावे लागते आणि आपला विचार पटवून द्यावा लागतो अशी क्षेत्रे यांच्यासाठी चांगली असतात. 

वृत्तपत्रे, जाहिरात संस्था, संगणकामधील सॉफ्टवेअर उद्योग या क्षेत्रात मिथुन व्यक्तींना चांगला स्कोप असतो. पत्रकारिता वृत्तपत्रे यामधील पत्रकार आणि संपादक यांची जबाबदारी सुरुवातीला नोकरी म्हणून आणि नंतर पुढे वैयक्तिक व्यवसाय करण्याकडे या व्यक्तींचा कल दिसून आलेला आहे. 

बुध शुभ स्थानात असता लेखनकार्यही करतात. कला आणि विद्या स्थानातील बुध या व्यक्तींना अभिनय क्षेत्राकडेही वळवितो. चांगला वक्ता असतो. यांना शिक्षण क्षेत्रासंबंधीत नोकरी देतो. पुस्तके, ग्रंथसंपदा निर्माण करतात. वैचारिक स्वरूपाचे लेखन कार्य होते.  मिथुन या राशीत राहूच्या नक्षत्राचा विशेष प्रभाव दिसून येतो. वाम मार्गाने पैसा कमवण्याकडेही कल राहतो. अवैध धंद्याच्या व्यवसायातून कमाई करतांना दिसून येतात.

मिथुन राशीत मंगळ व गुरुचीही नक्षत्र येतात. त्या ग्रहांचाही प्रभाव या राशीवर दिसून येतो. व्यवसायाबाबत गुरू चांगली फळे देतो. धडाडीने एखादे काम पूर्ण करणे या गोष्टी संभवतात. शैक्षणिक क्षेत्र आणि संशोधन क्षेत्रातही चांगल्या प्रकारे कार्य करू शकता. मंगळाच्या प्रभावामुळे मिथुन व्यक्ती बांधकाम व्यवसाय, जमिनीचे व्यवहारात कमिशन एजंट म्हणून काम करतांना दिसतात. 

बँकींग क्षेत्रातही ह्या व्यक्ती रममाण होताना दिसतात. रबर उद्योगामध्ये सुध्दा या व्यक्तींना चांगल्या संधी मिळू शकतात. शेती अवजारे व शेतीमालाची खरेदी विक्री व्यवसायातदेखील या व्यक्ती आपले करीअर करु शकतात. उद्योग या क्षेत्रात या व्यक्ती आपला चांगला ठसा उमटवू शकतात. लोकांना करिअर विषयक मार्गदर्शन करणे या क्षेत्रात मिथुन व्यक्ती आपले स्वतःचे करिअर करू शकतात. विशेषतः या व्यक्ती नोकरीपेक्षा स्वतंत्रपणे उद्योग व्यवसायात रममाण होणाऱ्या आढळून आल्या आहेत.

Whats_app_banner