मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Meen Rashi Career : मीन राशीच्या लोकांना या प्रकारच्या नोकरी आणि उद्योगात हमखास यश मिळते, जाणून घ्या

Meen Rashi Career : मीन राशीच्या लोकांना या प्रकारच्या नोकरी आणि उद्योगात हमखास यश मिळते, जाणून घ्या

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 23, 2024 08:35 PM IST

Meen Rashi Career Predictions : राशीच्या गुणधर्मानुसार नोकरी, व्यवसाय निवडल्यास व्यक्तीची चांगली प्रगती होण्याची शक्यता असते. पाहूया मीन राशीसाठी करियरचे कोणते क्षेत्र अनुकूल आहे.

Meen Rashi Career predictions
Meen Rashi Career predictions

Zodiac Signs and Career : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीची एक रास असते. त्या राशीचे काही गुणधर्म असतात, ते संबंधित व्यक्तीमध्ये आढळतात. त्या स्वभावधर्मानुसार त्या-त्या व्यक्तीचं जीवन चालतं, असं मानलं जातं. राशीच्या गुणधर्मानुसार नोकरी, व्यवसाय निवडल्यास व्यक्तीची चांगली प्रगती होण्याची शक्यता असते. पाहूया मीन (Pisces) राशीसाठी करियरचे कोणते क्षेत्र अनुकूल आहे.

मीन राशीत येणारी नक्षत्रे 

मीन ही विप्रवर्णाची, द्विधा मनस्थितीची, जलतत्त्वाची राशी आहे. या राशीचा स्वामी गुरु असून गुरुचे नक्षत्र पूर्वाभाद्रपदाचा शेवटच चरण, शनिचे उत्तरा भाद्रपदाचे चार चरण आणि बुधाच्या रेवती नक्षत्राचे चार चरण असे नऊ चरण मिळून ही राशी तयार झाली आहे. म्हणूनच गुरु, शनि व बुध या ग्रहांचे गुणधर्म या राशीत दिसून येतात. मोक्ष मार्गाची व सात्त्विक विचारांची राशी आहे. 

मीन या राशीच्या व्यक्ती बॅंकीग क्षेत्रात काम करणाऱ्या, कारकून, हिशेब तपासनीस, बौद्धिक क्षेत्रात काम करणाऱ्या तसेच शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या आढळून येतात. धार्मिक, अध्यात्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या पुरोहित, सल्लागार, कर्मकांड करणाऱ्या व्यक्ती मीन राशीत दिसून येतात. वैराग्याची व बुध्दिमान अशी ही राशी आहे. आत्मज्ञान, धार्मिक व देवाधर्माची आवड असणाऱ्या असतात. या राशीमध्ये बौध्दिक क्षमता प्रचंड असते. लेखन करणारे साहित्यिक, प्राध्यापक यांच्यावर मीन राशीचा अंमल असतो.

मीन राशींच्या व्यक्तींचा स्वभाव आणि गुणधर्म

मीन राशींच्या व्यक्तींना संघर्षमय परिस्थितीशी जुळवून घेणे अगदी बरोबर जमते. अनेक कामे हातात घेतात मात्र कोणत्याही कामात पूर्ण लक्ष न घातल्यामुळे मागे पडतात. परंतु सर्वांना मदत करण्यासाठी कायम पुढे सरसावतात. गर्विष्ठपणा, आळस याबरोबरच संथपणाचा अतिरेकही दिसून येतो. द्विस्वभाववृत्तीमुळे निश्चित दिशा मिळत नाही. वैचारिक स्थिरता नसते. निर्णय क्षमतेचा अभाव दिसून येतो.

मीन या राशीच्या व्यक्ती भित्र्या स्वभावाच्या, धार्मिक व अध्यात्मिक क्षेत्रात वावरणाऱ्या असल्या तरी कर्मकांडाची आवड असणाऱ्या असतात. अस्थिर बुद्धिच्या किंवा द्विधा मनस्थितीच्या असून देवाधर्मावर विश्वास ठेवणाऱ्या ग्रंथ प्रामाण्य मानणाऱ्या निती नियमांचे पालन करणाऱ्या असतात. बऱ्याच प्रमाणात गबाळ्या पद्धतीने राहतांना दिसतात. टापटीपपणा कमीच असतो. वागण्या बोलण्यातून बेफिकीरपणा दिसून येतो. जीवनात मानप्रतिष्ठा मिळते. नेहमी नवनवीन कामात रस घेण्याची प्रवृत्ती यांच्यात असते. जीवनात खूप संघर्ष करावा लागतो. अडथळ्यांची शर्यत जिंकल्याशिवाय यांचे काम पूर्ण होऊ शकत नाही.

मीन राशींच्या व्यक्तींसाठी अनुकुल कार्यक्षेत्र

मीन या राशीचा स्वामी गुरु असल्यामुळे ज्वेलर्स व्यवसायात, बॅकींग क्षेत्रात, इन्शुअरन्स, विमा व्यवसाय, हाऊसिंग फायनान्य या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, आर्थिक सल्लागार, शिक्षण क्षेत्रात शिक्षणतज्ञ. प्राध्यापक, शिक्षणाधिकारी, शिक्षण सल्लागार शिक्षणसंस्थांचे अधिकारी मीन राशीचे दिसून येतात. या राशीत शनीचे उत्तराभाद्रपदा नक्षत्र असल्यामुळे शनीच्या प्रभावाखालील व्यवसायात मीन व्यक्ती आढळतात.  मीन राशीचे लोक बांधकाम व्यावसायिक, खाद्यउद्योग, तेल उद्योग, पेट्रोल पंप इत्यादी व्यवसायात नोकरी किंवा स्वतंत्रपणे व्यवसाय करताना आढळतात. शनी सेवा कार्याचा कारक असल्यामुळे मीन व्यक्ती सेवा उद्योगात, लेबर उद्योगातही कार्यरत असतात. लोखंडी सळ्या, ग्रील बनवणे, सिमेंट, स्टील जाळ्या विक्री व्यवसायात किंवा हार्डवेअर शॉप च्या व्यवसायात दिसून येतात. 

मीन राशीत रेवती हे बुधाचे नक्षत्र असून बुधाच्या अमलाखाली व्यवसायसुध्दा मीन व्यक्ती करतांना दिसतात. जाहिरात एजन्सी, कुरिअरसेवा, पर्यटन व्यवसायात, वृत्तपत्रे, मासिके प्रकाशन व प्रिन्टींग उद्योगात मीन व्यक्ती दिसून येतात. जाहिरात कला शिक्षण देणाऱ्या संस्थेतील अध्यापकवर्ग, कमर्शियल आर्टिस्ट, लेखक, संपादक, प्रकाशक म्हणून मीन व्यक्ती करीअर करताना आढळून येतात. 

मीन राशीच्या कर्म स्थानी धनु राशी येते राशीस्वामी गुरू असल्यामुळे आर्थिक सल्लागार, बौद्धिक क्षेत्रात शिक्षण क्षेत्रातील संचालक इत्यादि जबाबदाऱ्या सांभाळतांना दिसतात. हाऊसींग फायनान्य करणाऱ्या संस्थांमध्ये अधिकारी म्हणून मीन व्यक्ती दिसून येतात. गुरू, शनी व रवी या तिघांच्या प्रभावाखालील उद्योगात जसे शिक्षणक्षेत्र, बँकीग, फायनान्स, मेकॅनिकल इंजिनीअर, सिमेंट व लोखंडी सळयांचा व्यवसाय करणारे किंवा बांधकाम साहित्य विक्री करणारे तसेच सरकारी निमसरकारी नोकरी करणारे किंवा प्रशासकीय जबाबदारी सांभाळणारे लोकसुद्धा मीन राशीच्या अधिपत्याखालील येतात. 

मीन ही गुरूच्या मालकीची राशी असल्यामुळे प्रामुख्याने शिक्षणक्षेत्र, बँकीग, फायनान्स, प्राध्यापक, शिक्षणा धिकारी या सारख्या करीअरमध्ये आढळून येतात. नोकरी व्यवसायाचा किंवा करीअरचा विचार करता येईल. मीन राशीच्या व्यक्ती नोकरीमध्ये कमी दिसतात. व्यवसायात जास्त यशस्वी होताना दिसतात.