Mauni Amavasya Auspicious Yoga 2025 : महाकुंभातील सर्वात महत्वाचा सण मौनी अमावास्येचे अमृतस्नान बुधवार, २९ जानेवारी २०२५ रोजी होणार आहे. ज्योतिषांच्या कालगणनेनुसार यंदा मौनी अमावस्येच्या तिथीला तब्बल १४४ वर्षांनंतर एक अद्भुत त्रिवेणी योग तयार होत आहे. हा योग समुद्र मंथनाच्या योगासारखाच आहे, या योगात पवित्र त्रिवेणीत स्नान केल्याने सहस्त्र वज्पाय यज्ञ आणि शंभर अश्वमेध यज्ञ असे पुण्य प्राप्त होते, असे ज्योतिषी सांगतात.
हा समुद्र मंथन तुल्य योग मंगळवार, २८ जानेवारी रोजी दुपारी २.३५ ते ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.२५ वाजेपर्यंत चालणार आहे. या योगात स्नान केल्याने तुम्हाला अमृतस्नानाचे फळ मिळेल. मौनी अमावस्या तिथीला पवित्र संगमात स्नान करणे मोक्षदायी मानले जाते, असे शास्त्र आणि पुराणांमध्ये वर्णन आहे. अशात सध्या महाकुंभ मेळा सुरू आहे. ज्योतिषांच्या मते भाविकांनी कोणत्याही खास योग आणि नक्षत्राऐवजी सोयीने कोणत्याही घाटावर स्नान करावे, त्यांना संगम स्नानासारखे पुण्यफळ मिळेल.
पौराणिक मान्यतेनुसार मौनी अमावस्येच्या तिथीला मौन उपवास करून ब्रह्म मुहूर्तात सकाळी पवित्र नदीत स्नान केले जाते. पंचांगाच्या गणनेनुसार माघ महिन्याची अमावस्या तिथी २८ जानेवारी रोजी सायंकाळी ०७ वाजून ३२ मिनिटांनी सुरू होईल आणि २९ जानेवारी रोजी सायंकाळी ०६ वाजून ५ मिनिटांपर्यंत राहील.
प्रयागराजचे ज्योतिषी एचके शुक्ला सांगतात की, यंदा १४४ वर्षांनंतर महाकुंभात एक खास योगायोग तयार होत आहे. यावर्षी माघ महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी सूर्य, चंद्र आणि बुध हे तिन्ही ग्रह मकर राशीत आणि गुरू नवव्या स्थानात आहे. या विशिष्ट योगाला त्रियोग किंवा त्रिवेणी योग म्हणतात. हा त्रिवेणी योग समुद्र मंथन काळातील योगासारखाच आहे. या योगात त्रिवेणी स्नान विशेष फलदायी ठरते. मौनी अमावस्येच्या दिवशी स्नान आणि भगवान विष्णूची पूजा करण्यासाठी भाविक मूक उपवास करतात.
महाकुंभातील माघ महिन्याच्या अमावस्या तिथीला मौनी अमावस्या साजरी करतात. या दिवशी मूक उपवास करून स्नान करणे शुभ मानले जाते. मौनी अमावास्येला स्नान करण्याची उत्तम वेळ ब्रह्म मुहूर्तात असली तरी मौनी अमावस्या तिथीला दिवसभर स्नान करणे शुभ मानले जाते. उगवत्या तिथीमुळे दिवसभर अमावस्येचे स्नान होणार आहे. शक्य असल्यास या दिवशी मूक उपवास करून संगमावर स्नान करावे, विशेष पुण्यप्राप्ती होते. ज्यांना त्रिवेणी संगमात स्नान करणे जमत नाही, त्यांनी गंगाजल पाण्यात मिसळून स्नान करावे, त्यांना संगम स्नानाचे फळ मिळेल.
मौनी अमावस्येच्या दिवशी अमृतस्नानाचे अनेक शुभ मुहूर्त निर्माण होत आहेत, ज्यामध्ये स्नान आणि दान विशेष फलदायी ठरते. यात ब्रह्म मुहूर्त ते अमृत चौघडिया मुहूर्त आणि शुभ चौघडिया मुहूर्त देखील आहे. तसेच मौनी अमावस्येला उत्तराषाढा नक्षत्रानंतर श्रावण नक्षत्र होत आहे. या सर्व योग-नक्षत्रांमध्ये स्नान करून आत्म्याच्या शांतीसाठी पितरांची पूजा केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते.
ब्रह्ममुहूर्त : सकाळी ०५.२५ ते ०६:१८
अभिजीत मुहूर्त : नाही
विजय मुहूर्त : ०२:२२ ते ०३:०५
गोधूली मुहूर्त : ०५:५५ ते ०६:२२
अमृत काळ : रात्री ०९:१९ ते १०:५१
लाभ-उन्नती : सकाळी ०७:११ ते ०८:३२
अमृत-सर्वोत्तम : सकाळी ०७:११ ते ०८:३२
शुभ-उत्तम : सकाळी ११.१४ ते दुपारी १२.३४
लाभ-उन्नती : दुपारी ०४.३७ ते सायंकाळी ०५.५८
संबंधित बातम्या