Maharashtra Assembly Election 2024: विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी शड्डू ठोकून एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. विजय कोणाचा होणार याबाबत राजकीय विश्लेषक अंदाज बांधत आहेत. अशात दोन्हीकडील मोठ्या नेत्यांच्या कुंडल्या काय सांगतात, तसेच महायुतीत असलेल्या भाजप आणि शिवसेना (शिंदे गट), तसेच अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या कुंडल्या काय सांगतात याबाबत ज्योतिषीय विश्लेषणातून काय दिसते हे पाहणे मनोरंजक ठरेल.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्म नागपूर येथे २२ जुलै १९७० या दिवशी सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी झाला. फडणवीस यांची जन्मकुंडली कन्या लग्नाची आहे. लाभाच्या एकादश भावात असलेल्या बुधाच्या शुभदशेत ते सन २०१४ ते २०१९ (नोव्हेंबर) पर्यंत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. डिसेंबर २०१८ पासून ते डिसेंबर २०२५ पर्यंत त्यांच्या कुंडलीत हानीच्या १२ व्या स्थानी बसलेल्या केतूची महादशा सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कुंडलीत नवमेश शुक्राशी युती आहे, तर लाभेश चंद्राशी दृष्ट आहे.
या धन योगाच्या बळाने त्यांनी जुळवाजुळ करून जुलै २०२२ मध्ये शिवसेनेत बंडखोरी करून आलेले एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने उपमुख्यमंत्रिपद मिळवले. मात्र सध्या केतूच्या महादशेत अष्टम भावात शनीची कठीण स्थिती असल्याने देवेंद्र फडणवीस यांना सर्वाधिक त्रास होत असल्याचे दिसत आहे. असा स्थितीत त्यांना निवडणुकीत निराशेचा सामना करावा लागू शकतो. इतकेच नाही, तर कुंभ राशीच्या चंद्रावर शनीच्या संक्रमणामुळे 'साडेसाती'च्या कोपामुळे त्याच्या पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाशी त्यांचे वादही होऊ शकतात.
अजित पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ या दिवशी दुपारी ०१ वाजून ४२ मिनिटांनी अहमदनगर येथे झाला. तूळ लग्न असलेल्या यांच्या जन्मकुंडलीत मे २०२३ पासून ते नोव्हेंबर २०२५ पर्यंत बुधात राहूची विंशोत्तरी दशा सुरू आहे. बुध नवम (भाग्य) आणि द्वादश (हानी) भावाचा स्वामी असताना राजसत्तेच्या दशम भावात सूर्यासोबत बसला आहे. जुळवाजुळव आणि पक्षबदल करण्याच्या राजकारणाचा कारक मानला गेलेला ग्रह राहू अजित पवार यांच्या कुंडलीत १२ व्या स्थानी आहे. याच राहूने अजित पवार यांना जुलै २०२३ मध्ये भाजपसोबत गेल्यानंतर उपमुख्यमंत्रिपद दिले. मात्र नंतर बुध आणि राहूत शनीच्या खडतर विंशोत्तरी दशेमुळे लोकसभा निवडणुकीत पराभव देखील दाखवला.
येत्या निवडणुकीत अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ५३ जागांवर लढत आहे. अजित पवार यांच्या तूळ राशीत बुध राशीतील केतूचा कठीण काळ ०२ नोव्हेंबर ते २७ डिसेंबरपर्यंत आहे. राहू हानीच्या बाराव्या घरात बसला आहे आणि प्रत्यंतर दशा नाथ केतू वादाच्या सहाव्या घरात पीडा देत आहे. कुंभ राशीच्या चंद्रावर शनीच्या संक्रमणाने अजित पवारांवर 'साडेसाती'चा कोप ओढवला आहे. निवडणुकीतील पराभवानंतर अजित पवारांनी पुन्हा आपला पक्ष काका शरद पवार यांच्या पक्षात विलीन केल्यास नवल वाटायला नको.
उद्धव ठाकरे यांचा जन्म २७ जुलै १९६० रोजी सकाळी १० वाजून १४ मिनिटांनी मुंबईत झाला. ठाकरे यांची जन्म कुंडली कन्या लग्नाची आहे आणि चंद्र रास सिंह आहे. जन्म लग्नाने केंद्रात गुरू आणि बुध आपल्या स्वत:च्या राशीत असून त्यानुसार उद्धव ठाकरे हे स्वच्छ प्रतिमेचे नेते ठरतात. गुरु ग्रहातील केतूच्या कठीण स्थितीमुळे डिसेंबर २०१९ मध्ये मुख्यमंत्री झालेले उद्धव ठाकरे यांना आपल्या कार्यकाळात नेहमीच संकटांशी झुंज द्यावी लागली आहे. उद्धव ठाकरे यांच्या कुंडलीत गुरू वक्री होऊन त्याची शनीशी युती आहे आणि अष्टमेश मंगळाच्या आठव्या दृष्टीमुळे पीडित आहेत.
सन २०२२ मध्ये, गुरु ग्रहातील शुक्राच्या ६/८ (षडष्टक) दशेत चालत असलेल्या उद्धव ठाकरेंना त्यांच्या पक्षात मोठ्या प्रमाणात फूट पडल्यामुळे मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. त्यांच्याकडून त्यांच्या पक्षाचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह हिसकावून ते बंडखोरांचे नेते व आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला देण्यात आले. परंतु सध्या चालू असलेली गुरु ग्रहातील चंद्राची शुभ विंशोत्तरी दशा एप्रिल २०२४ ते ऑगस्ट २०२५ पर्यंत आहे.
उद्धव ठाकरेंच्या कुंडलीत चंद्र लाभ घराचा स्वामी असून आपला मित्र सूर्याच्या सिंह राशीत आहे. तर सूर्य चंद्राच्या कर्क राशीत चांगला राशी परिवर्तन योग निर्माण करत आहे. या संयोगाच्या प्रभावामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने लोकसभा निवडणुकीत ९ जागा जिंकून महाराष्ट्रात आपले राजकीय अस्तित्व वाचवले. आता आगामी विधानसभेच्या वेळी उद्धव ठाकरेंच्या कुंडलीत गुरूमध्ये चंद्रात शनीची विंशोत्तरी दशा असेल. शनी हा गुरूची रास धनुत असून आपली उच्च राशी तूळेच्या नवांशात आहे. या मुळे महाराष्ट्राच्या चाव्या उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवल्या जाऊ शकतात.
शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांचा जन्म ३० जून १९६९ रोजी सकाळी ११ वाजता पुणे येथे झाला. त्या सध्या लोकसभेच्या खासदार आहेत. सिंह लग्नाच्या यांच्या जन्मकुंडलीत, राजसत्तेत दशम स्थानी लाभेश बुध बसला आहे. बुधावर चतुर्थेस आणि योगकारक असलेल्या नवमेश मंगळाच्या दृष्टीसह मंत्रिपदाच्या पचमेश गुरूची देखील दृष्टी पडत आहे. सुप्रिया सुळे यांच्या सध्याच्या नवांश आणि दशमांश कुंडलीत वर्तमानात सुरू असलेली गुरूतील बुधाची विंशोत्तरी दशेचा स्वामी अतिशय शुभ स्थितीत बसलेला आहे. अशा स्थितीत निवडणुकीतील यशानंतर सुप्रिया सुळे यांचेही नाव काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून (शरद पवार) मुख्यमंत्रिपदासाठी पुढे केले जाऊ शकते.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.