मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Kark Rashi Career : कर्क राशीचे लोक कोणत्या करिअर आणि व्यवसायात प्रगती करतील? जाणून घ्या

Kark Rashi Career : कर्क राशीचे लोक कोणत्या करिअर आणि व्यवसायात प्रगती करतील? जाणून घ्या

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 19, 2024 11:11 AM IST

Kark Rashi Career Predictions : राशीच्या गुणधर्मानुसार नोकरी, व्यवसाय निवडल्यास व्यक्तीची चांगली प्रगती होण्याची शक्यता असते. पाहूया कर्क (Cancer) राशीसाठी करियरचे कोणते क्षेत्र अनुकूल आहे.

Kark Rashi Career Predictions
Kark Rashi Career Predictions

Zodiac Signs and Career : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीची एक रास असते. त्या राशीचे काही गुणधर्म असतात, ते संबंधित व्यक्तीमध्ये आढळतात. त्या स्वभावधर्मानुसार त्या-त्या व्यक्तीचं जीवन चालतं, असं मानलं जातं. राशीच्या गुणधर्मानुसार नोकरी, व्यवसाय निवडल्यास व्यक्तीची चांगली प्रगती होण्याची शक्यता असते. पाहूया कर्क राशीसाठी करियरचे कोणते क्षेत्र अनुकूल आहे.

कर्क राशीत येणारी नक्षत्रे

आपल्या राशी आणि नक्षत्रानुसार कोणत्या क्षेत्रात करिअर करता येईल. याचा विचार आपण या ठिकाणी केलेला आहे. कर्क राशीचा स्वामी चंद्र असल्याने अत्यंत भावूक वृत्तीची व हळव्या मनाची ही रास आहे. विप्र वर्णाची जलतत्त्वाची प्रवाही प्रवृत्तीची कर्क राशी असून या राशीत पुनर्वसु नक्षत्राचा चौथा चरण, पुष्य नक्षत्राचे चार चरण व आश्लेषा हे बुधाच्या मालकीचे नक्षत्र आहे. त्यामुळे चंद्र, गुरु, शनि व बुध या ग्रहांचे कारकत्व गुणधर्म या राशीत असतात.

कर्क राशीत सर्वाधिक प्रभाव चंद्राचा असल्याने या राशीतील बहुतेक लोक राजकारण, समाजकारण, नेव्ही, मरीन इंजिनीअरींग, हॉटेल व्यवसाय करणारे, नर्सिंग, हॉस्पिटल डॉक्टर, इतिहासतज्ञ, राजकीय पुढारी, मंत्री, प्राध्यापक, नौसेनेचे कॅप्टन, राज्य कर्मचारी, भाषा विशारद व अद्भूत वस्तुसंग्रह करणारे, वकील, इत्यादि क्षेत्रात दिसतात. कवी, लेखक, कलावंत, अभिनय क्षेत्रात करीअर करणाऱ्या व्यक्तीही कर्क राशीच्या आढळून येतात.

कर्क राशींच्या व्यक्तींचा स्वभाव आणि गुणधर्म 

कर्क राशीची व्यक्ती अतिशय महत्त्वाकांक्षी, मुत्सद्दी असतात. शास्त्र व कलेत प्रवीण असतात. चांगले व्यापारी असतात. खूप प्रेमळ परंतु तेवढेच चंचलदेखील असतात. अतीसंवेदनशील स्वभावामुळे कधीकधी त्यांचे नुकसान होऊ शकते. 

स्त्रीप्रधान आणि सम संख्या असलेली, कवी मनाची, कल्पना शक्ती उत्तम असलेली आणि स्वप्नाळू वृत्तीची लोकंही या राशीत दिसून येतात. निसर्गतः या राशी पाण्यासारख्या निर्मळ मनाच्या असतात. आपल्या मनाचा विचार करतातच परंतु दुसऱ्यांच्या भावनांची कदर करणाऱ्या व दुसऱ्याविषयी तेवढीच आपुलकी बाळगणाऱ्या असतात. 

एकांतप्रिय असणाऱ्या या व्यक्तींना समाजात वावरतांना गर्दीच्या ठिकाणी राहणे अवघड वाटते. विपरित घटनांनी या व्यक्ती उदास होतात किंवा आनंदीही होताना दिसतात. कौटुंबिक जीवन यांना आवडते. प्रामाणिक वृत्तीच्या स्वच्छ मनाच्या या चांगल्या गुणांबरोबरच मानसिक चंचलता पोकळ बडेजाव आणि चिडखोर वृत्ती या दुर्गुणांचा समावेश दिसून येतो. आपण आणि आपले काम असा यांचा स्वभाव असतो. एकाकीपणे जीवन जगणारे असतात. त्यामुळे फारसे मित्र नसतात.

कर्क राशींच्या व्यक्तींसाठी अनुकुल कार्यक्षेत्र

 कर्क राशीत चंद्राबरोबर शनिचे प्राबल्य मोठ्या प्रमाणात असल्याने या व्यक्तींना व्यवसायापेक्षा नोकरी करणे आवडते. सेवावृत्तीचा शनि आणि चंद्राची दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची वृत्ती यामुळे या व्यक्तींना व्यवसायापेक्षा नोकरी करणे आवडते.

तसेच यांना वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरी करणेसुध्दा आवडते. विशेषतः शिपींगची नोकरी यांना आवडते. मरीन इंजिनीअरींग, केमिकल इंजिनीअरींग या क्षेत्रातील इंजिनीअर कर्क राशीच्या व्यक्ती दिसून येतात. सिनेमा क्षेत्रात या व्यक्ती रमतात. शेती उद्योगात किंवा शेत मालाच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारातील नोकरी करायलाही कर्क राशीतील लोक अग्रेसर असतात. 

मोबाईल यासारख्या वस्तू विक्रीच्या उद्योगात यांची सेवा लाभदायी ठरते. खाद्यपदार्थ पुरवण्यासाठी कर्क व्यक्ती विश्वासू असतात, या उद्योगात त्यांना चांगली प्रगती करता येईल. कर्क राशीच्या व्यक्ती कवी मनाच्या व कल्पना शक्तीच्या भराऱ्या मारणाऱ्या असल्यामुळे जाहिरात क्षेत्रातसुध्दा यांना चांगली प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते. घरगुती उपयोगाच्या वस्तू पुरवणाऱ्या उद्योगात यांना चांगले यश मिळते. शुक्र चंद्र युती असेल तर वाईन शाॅप, तेल उद्योग, मत्स्य उद्योग, दूधाचे पदार्थाचे उत्पादन, जल उद्योगात कर्क व्यक्ती प्रामुख्याने आढळून येतात. 

कर्क राशीच्या व्यक्तींना व्यापारात मोठा धोका पत्कारणे आवडत नाही. छोटीसी गुंतवणूक करून त्यात यशस्वी होतील. लहान स्वरूपाच्या जबाबदाऱ्या स्वीकारून प्रामाणिकपणे पुर्ण करणे हा यांचा गुणधर्म आहे. आर्थिक स्थिती यांची हळूहळू सुधारत जाते. या व्यक्ती फारशा लोभी नसतात. शनिबरोबर चंद्र असणाऱ्या व्यक्ती सेवा उद्योगात यशस्वी होतात. सेवा पुरवणाऱ्या कोणत्याही उद्योगात कर्क व्यक्ती यशस्वी होताना दिसतात. 

कोळसा, लाकूड, लोखंड, इमारतींची निर्मिती, उद्योगात यशस्वी होण्यासाठी चंद्राबरोबर मंगळ, शनिचा योग महत्त्वाचा ठरतो. कर्क राशीत गुरु असेल तर या व्यक्ती अतिशय धार्मिक व अध्यात्मिक प्रवृत्तीच्या असतात. धार्मिक व अध्यात्मिक गोष्टींसाठी लागणाऱ्या वस्तू पूजा साहित्य या बाबतीत असणाऱ्या उद्योगात या व्यक्ती यशस्वी होताना दिसतात. कर्क राशीत चंद्र-मंगळ युती लक्ष्मीयोग मानला जाते. आर्थिक कमतरता जाणवत नाही. कर्क राशीच्या फार कमी व्यक्ती व्यवसायात यशस्वी होताना दिसतात. प्रामुख्याने नोकरीतचं जास्तीचं यश मिळताना दिसून येते.

जय अर्जुन घोडके

(jaynews21@gmail.com)

(लेखक ज्योतिषविद्येचे अभ्यासक आहेत.)