Zodiac Signs and Career : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीची एक रास असते. त्या राशीचे काही गुणधर्म असतात, ते संबंधित व्यक्तीमध्ये आढळतात. त्या स्वभावधर्मानुसार त्या-त्या व्यक्तीचं जीवन चालतं, असं मानलं जातं. राशीच्या गुणधर्मानुसार नोकरी, व्यवसाय निवडल्यास व्यक्तीची चांगली प्रगती होण्याची शक्यता असते. पाहूया कन्या (Virgo) राशीसाठी करियरचे कोणते क्षेत्र अनुकूल आहे.
कन्या ही वैश्य वर्णाची द्विस्वभावी व पृथ्वी तत्त्वाची स्त्रीकारक राशी आहे. या राशीचा स्वामी बुध असून या राशीत रविचे उत्तरा फाल्गुनी नक्षत्र, चंद्राचे हस्त आणि मंगळाचे चित्रा नक्षत्र येते. त्यामुळे साहजिकच कन्या राशीवर बुध, चंद्र यांचे वर्चस्व अधिक प्रमाणात असून रवि आणि नंतर मंगळाचे अस्तित्व जाणवते. कारण बुधाच्या मालकीची ही राशी असून चंद्राचे चारही चरण या राशीत येतात व रविची ३ चरणे आणि मंगळाची दोन चरणे या राशीत येतात. त्यामुळे सर्वाधिक प्रभाव बुध आणि चंद्राचा दिसून येतो.
बुधप्रधान व्यक्ती बौद्धिक क्षेत्रात काम करणाऱ्या असतात. संशोधक म्हणून काम करणाऱ्या व्यक्ती बुध ग्रहाच्या प्रभावाखाली असतात. गुरूप्रधान व्यक्ती लोकनेते, धार्मिक क्षेत्रातील धर्मगुरू, मठाधिपती, न्यायाधिश, शिक्षक, उपदेशक, पुरोहित वर्ग, बँक अधिकारी, अर्थ सल्लागार, जाहिरात एजंट इत्यादि क्षेत्रात करिअर करतात.
कन्या राशींच्या व्यक्ती चिकित्सक आणि दूरदर्शीपणा या गुणांमुळे जीवनात खूप पुढे जाऊ शकता. बुधाची अचाट स्मरणशक्ती रविची नीतिमत्ता आणि चंद्राची उत्तम कल्पनाशक्ती व भावुकता आणि मंगळाचे धैर्य हे गुण कन्या राशींच्या लोकांमध्ये आढळून येतात. उत्कृष्ट बुध्दिमत्ता, बुध्दिचातुर्यपणा हजरजबाबीपणा, उत्तम निरीक्षणशक्ती, विनोदी वृत्ती अशी वैशिष्ट्ये कन्या राशीची आहेत. या राशीच्या व्यक्ती बुध्दीमान, कल्पकवृत्तीच्या, ज्ञानी, भरपूर बडबड करणाऱ्या, स्वप्नांच्या दुनियेत वावरणाऱ्या असतात. देशभ्रमण करणारी नेहमी आनंदी, हसत बोलणाऱ्या या राशीच्या व्यक्तीला चांगल्या व स्वादिष्ट व चवदार पदार्थाची आवड असते. दुसऱ्याला मनाचा थांगपत्ता न लागू देता बोलणारी अशी ही राशी आहे.
कन्या राशीच्या लोकांमध्ये संशयी वृत्ती तसेच अतिचिकित्सक व अविश्वास व्यक्त करणारी प्रवृत्ती राहते. विद्वान लोकांशी ओळख असणारी ही व्यक्ती कधी कधी निष्काळजीपणाने वागणाराही दिसून येते. मनात थोडा गोंधळ असला तरी खूप चांगलं संशोधन करू शकतात. काही वेळेस स्वत:हून संकटे ओढवून घेतात. सुबत्ता असली तरी संशयी स्वभावामुळे जीवनात आनंद उपभोगता येत नाही.
कन्या राशींच्या व्यक्ती विद्वान, शास्त्र व्यासंगी, पत्रकार वृत्तीचे दिसून येतात. ही राशी द्विस्वभावी वृत्तीची असल्याने हे लोक आपली मते सतत बदलणारे दिसून येतात. यांच्यात वैचारिक गोंधळ दिसून येतो. बुधाच्या प्रभावामुळे ह्या व्यक्ती लेखन करणारे लेखक, कवि, छापखान्याशी संबंधीत व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती कन्या राशीच्या दिसून येतात.
बँकेत नोकरी करणारे, शेअर मार्केट मधील ब्रोकर्स गुंतवणूकी विषयी सल्ला देणारे सल्लागार आदि व्यक्ती कन्या राशीचे दिसून येतात. कायदेविषयक सल्ला देणारे किंवा वादविवादाशी संबंधीत वकीलीं करणारे लोक, सरकारी नियमांची माहिती करुन त्याविषयक छाननी करून योग्य सल्ला देणाऱ्या व्यक्ती बुध प्रधान व कन्या राशीच्या दिसून येतात. प्रकाशन व्यवसाय, प्रिन्टींग व्यवसायाशी किंवा उद्योगाशी संबंधीत सर्व प्रकारच्या बाबी हाताळणाऱ्या व्यक्ती कन्या राशीच्या असतात.
कन्या राशीच्या कर्मस्थ मिथुन ही बुधाची राशी असल्यामुळे या राशीचा स्वामी सुध्दा बुध असून बौध्दिक क्षेत्रात प्रामुख्याने या व्यक्ती आढळून येतात. या व्यक्ती कल्पना शक्तीच्या भराऱ्या मारणाऱ्या असल्यामुळे कलावंत मंडळीही या राशीचे दिसून येतात. निरनिराळ्या प्रकारच्या कागदांची निर्मिती करणारे कारखानदार, साखरउद्योग इत्यादी क्षेत्रात या व्यक्ती प्रामुख्याने दिसून येतात. कर्मेश बुध षष्ठ स्थानात किंवा कर्मस्थानात शनि असेल तर या व्यक्ती वरील उद्योगामध्ये नोकरी करणारे आढळून येतील.
कन्या राशीत रविचे नक्षत्र चंद्राचे नक्षत्र आणि मंगळाचे नक्षत्र येत असल्यामुळे यांचाही प्रभाव थोड्या फार प्रमाणात यांच्या करीअरवर सुध्दा दिसून येतो. रविमुळे सरकारी क्षेत्रात किंवा प्रशासकीय क्षेत्रातही या व्यक्तींचे करीअर दिसून येईल हे नोकरी किंवा व्यवसाय असे दोन्ही स्वरुपाचे असू शकेल. चंद्राचे हस्त नक्षत्र असल्यामुळे जलउद्योग, पाण्याच्या उद्योगात तसेच दुग्धव्यवसाय किंवा रसायन उद्योगातसुध्दा काही प्रमाणात या राशीच्या व्यक्ती आढळून येतात. मंगळाचे चित्रा नक्षत्र या राशीत असल्यामुळे प्रत्यक्ष वयापेक्षा तरुण वाटतात. व्यवसाय किंवा नोकरी करणारी व्यक्तीसुध्दा बुधाच्या अंकीत असणाऱ्या कन्या राशीच्या दिसून येतात. या राशीची व्यक्ती बौध्दिक क्षमतेच्या दृष्टीने उत्तम अशा असल्यामुळे वरीलपैकी कोणत्याही क्षेत्रात असू देत त्या प्रत्येक क्षेत्रात ठसा उमटवतात.
(jaynews21@gmail.com)
(लेखक ज्योतिषविद्येचे अभ्यासक आहेत.)