मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope Today 1 february 2024 : फेब्रुवारी महिन्याचा पहिला गुरुवार तुमच्यासाठी कसा राहील! वाचा राशीभविष्य!

Horoscope Today 1 february 2024 : फेब्रुवारी महिन्याचा पहिला गुरुवार तुमच्यासाठी कसा राहील! वाचा राशीभविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Feb 01, 2024 08:45 AM IST

Horoscope Today 1 february 2024: आज १ फेब्रुवारी २०२४ गुरुवार रोजी, लाभ होईल की नुकसान, दिवस शुभ असेल की अशुभ, किती संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे राशीभविष्य.

Horoscope Today 1 february 2024
Horoscope Today 1 february 2024

आज गुरुवार १ फेब्रुवारी रोजी, चंद्र कन्या राशी नंतर तूळ राशीत संक्रमण करेल व बुध ग्रह राशीबदल करणार आहे. कसा जाईल आजचा दिवस! वाचा राशीभविष्य!

मेषः 

आज कामाचा दर्जा सुधारेल. ऐषोआरामाचे जीवन जगावे असे वाटेल. घरामध्ये मंगलकार्ये ठरतील. त्यासाठी उत्तमोत्तम खरेदी कराल. जोडीदार निवडण्याची संधी मिळेल. खूप चांगल्या कलाकृती तयार कराल. व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. शेअर मार्केटध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कामाचा वेग वाढेल. स्वभाव मन मिळावू राहील. नवीन वाहन व घर खरेदीचे योग आहेत. प्रियजनांच्या भेठीगाठी होतील. कला क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक लाभ होईल.

वृषभः 

आज थोडा तापट स्वभाव सर्वकाही बदलू शकतो. घरामध्ये जास्तीत जास्त वेळ द्यावा लागेल. व्यवसायात परिस्थितीचा साधक बाधक विचार करून निर्णय घ्यावा. अती संवेदनशील स्वभावामुळे प्रत्येक गोष्टीचा उगाचच विचार करीत राहाल. आत्मविश्वास आणि उत्साह कमी राहील. उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना काळ अनुकूल आहे. कर्ज फेड करण्यासाठी अनुकूल दिवस आहे. विद्यार्थ्यांनी आळसापासून दूर रहावे. कलाकारांना प्रसिद्धीचे योग आहे. मानसिक समाधान उत्तम राहील.

मिथुनः 

आज लाभदायक दिवस आहे. तुमच्यासमोर शत्रूंचा टिकाव राहणार नाही.  प्रत्येक विरोधावर मात करण्याची ताकद येईल. इतरांना सल्ले देण्यात पुढे राहाल. आर्थिक स्थिती सुधारली तरी खर्चही तेवढेच वाढतील. अध्यात्मिक प्रगती कराल. नवीन योजनेत कामाच्या जबाबदाऱ्या वाढतील. आर्थिक तेजी राहील. आचरण उत्तम राहिल्यामुळे लौकिकता वाढेल. वारसाहकाने धन व संपत्ती लाभणार आहे. प्रवासाचे योग येतील. धार्मिक कार्य करण्याची इच्छा निर्माण होईल.

कर्कः 

आज तुम्ही अस्वस्थ व्हाल. तुमचे कोणतेही काम तातडीने होणार नाही. जास्तच कष्ट घ्यावे लागतील. व्यवसाय नोकरीत शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरेल. मोठ्यांच्या मनाप्रमाणे वागावे लागेल. निर्णय विचारपूर्वक घेणे जरुरीचे आहे. घरातील वातावरण ताण-तणावात्मक राहील. उद्योग धंद्यात लक्ष कमी राहील. आर्थिक समस्या येऊ शकतात. वेळेचा अपव्यय टाळा. स्थावर मालमत्ते बाबत अडचण येऊ शकते. मनस्तापाच्या घटना आपण टाळणं गरजेचं आहे.

सिंहः 

आज कामाचे नियोजन उत्तम केल्यास यश मिळेल. उच्चपदस्थ लोकांच्या मध्यस्थीने कामे लवकर होतील. धंद्यातील कामे अंतिम टप्प्यावर जाऊन पोहोचतील. प्रसिद्धीचे योग येतील. कलाकार आणि खेळाडूंना चांगल्या संधी निर्माण होतील. कार्यक्षेत्रात आर्थिक लाभाबरोबर प्रतिष्ठाही मिळेल. जमिन विक्रीतून लाभ होईल. घरात एखादे धार्मिक कार्य कराल. फायदेशीर काळ आहे. प्रवासाचे योग येतील. विचारपूर्वक गुंतवणूक करा. 

कन्याः 

आज काही कामे अडली असतील तर ती पूर्ण होतील. काही सवलती मिळायच्या असतील तर त्या मिळून जातील. व्यवसायात गिऱ्हाईकांना आकर्षित करण्यासाठी खास योजना आखाल. वरिष्ठांची मर्जी झाल्यामुळे प्रमोशनही मिळू शकते. राहणीमान उंचावण्यासाठी बराच पैसा खर्ची टाकाल. विद्यार्थ्यांचा तणाव कमी होईल, स्पर्धात्मक यश मिळेल. जबाबदारीने काम करा. वेळेचे नियोजन असेल तर योग्यच फायदा होईल. कोणताही महत्त्वाचा व्यवहार करताना कागदोपत्रांची तपासणी काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे.

तूळ: 

आज वेगवेगळ्या संधी मिळतील. घरातील वातावरण सुधारेल. विद्यार्थ्यांनी कोणताही अविचार करू नये. नोकरीत अधिकार मिळेल. राजकारणात भावनेपेक्षा बुद्धीच्या कसरतीचा उपयोग जास्त होईल. सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास यश मिळेल. पूर्वी मांडलेले आर्थिक आडाखे यशस्वी होतील. स्पर्धकांवर मात करावी लागेल. इतरांना आर्थिक मदत करताना विशेष काळजी घ्या. नात्यात मैत्रीत मधुरता येईल. काळजीपूर्वक काम करावे लागेल.

वृश्चिकः 

आज फायदा होईल. प्रेम प्रकरणामध्ये तरुणांना यश येईल. महत्त्वाचे निर्णय लवकर घ्यावेत. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने परदेशी जाण्याचे योग येतील. कामाच्या ठिकाणी अनेक सुधारणा कराल त्यामुळे उत्पन्नात वाढ होईल परंतु हातात पैसे मिळायला थोडा वेळ लागेल. यशाचा आनंद मिळेल. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. व्यवसाय वृद्धीच्या संधी चालून येतील. शेअर्स अथवा अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरेल. खर्च करावा लागेल.

धनुः 

आज मनाचा गोंधळ उडेल. अस्वस्थता वाढेल. नोकरीत वरिष्ठांच्या अपेक्षा जास्त असल्यामुळे थोडा ताण राहील. व्यवसायात मात्र स्पर्धकांना तोंड द्यावे लागेल. नव्या कल्पना इतरांना पटणार नाहीत. तरुणांना प्रेम आणि कर्तव्य यामध्ये पेचात टाकणारी परिस्थिती निर्माण होऊ शकते. अपेक्षित कार्य पूर्ण करण्यासाठी कसरत करावी लागेल. प्रतिकूल परिस्थितीवर मात करावी लागेल.

मकरः 

आज खर्चावर काटेकोरपणे नियंत्रण ठेवण्यात यशस्वी व्हाल. भाग्याची साथ चांगली मिळेल. तुमच्या मनातील गोष्टी पूर्ण होण्याच मार्गावर राहतील. व्यवहारात तुमची मते स्पष्टपणे मांडायला घाबरू नका. लाबंच्या प्रवासाचे योग येतील, परंतु प्रवासामध्ये काळजी घ्यावी. मानसिक आणि शारिरिक आरोग्य उत्तम राहील. बेरोजगारांना नोकरीची सुसंधी मिळेल. तरुणवर्गास इच्छित नोकरी मिळेल.  यशाचा दिवस आहे.

कुंभः 

आज घरामध्ये एखाद्याच्या आजारासाठी पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. संततीच्या बाबतीत दोन पिढ्यांमधील संघर्ष अनुभवाल. इथे सुवर्णमध्य काढावा लागेल. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही याची काळजी घ्या. आर्थिक प्रगती करण्याच्या विचाराबरोबर आपण आपले आरोग्यही जपा. व्यवसायिकांना व्यवसायासाठी अडचणीतून मार्ग काढावा लागेल. शुल्लक कारणांवरुन मानसिक भिती आपणास वाटेल. प्रेमिकांना एकमेकांच्या वागण्यामुळे मानसिक त्रास होईल. कोर्टकचेरीचे प्रसंग सध्या टाळावेत. प्रवासात काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. आरोग्याकडेही लक्ष द्या.

मीनः 

आज व्यवसायात कोणत्या गोष्टी केल्या असता आपली प्रगती होऊ शकते याचा खोलवर अभ्यास करा. वैवाहिक जीवनात एकमेकांना समजून घ्याल. त्यामुळे थोडी शांतता मिळेल. व्यवहारात नवनवीन गोष्टींचे जरा जास्तच आकर्षण राहील. उद्दिष्ट साकार करण्यासाठी अनुकूलता लाभेल. परिस्थितीवर मात करण्यासाठी अनुत्साही न होता जोमाने चिकाटीने प्रयत्न करावे. आर्थिक आवक वाढेल. अर्थिक व्यवहार करताना तात्पुरता फायदा लक्षात घेऊ नये. संततीकडून सर्व दृष्ट्या आनंददायक बातम्या मिळतील. 

 

जय अर्जुन घोडके

(jaynews21@gmail.com)

(लेखक ज्योतिषविद्येचे अभ्यासक आहेत.)