मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope July 2024 : जुलै महिना तुम्हाला कसा जाईल? वाचा मासिक राशीभविष्य

Horoscope July 2024 : जुलै महिना तुम्हाला कसा जाईल? वाचा मासिक राशीभविष्य

Jul 01, 2024 12:38 AM IST

Monthly Rashi Bhavishya July 2024 : जुलै महिना हा तुमच्यासाठी कसा जाईल. आषाढी पंढरपूरची यात्रा आणि चातुर्मासात हा महिना कोणत्या राशींवर गुरुकृपा करेल, वाचा जुलै महिन्याचे सविस्तर राशीभविष्य.

राशीभविष्य जुलै २०२४, मासिक राशीभविष्य, जुलै महिन्याचे राशीभविष्य
राशीभविष्य जुलै २०२४, मासिक राशीभविष्य, जुलै महिन्याचे राशीभविष्य

जुलै महिन्यात चातुर्मास्यारंभ होत आहे. रवि आणि शुक्र कर्क राशीत तर मंगळ बुध अनुक्रमे वृषभ व सिंह राशीत प्रवेश करणार आहे. मार्गी नेपच्युन वक्री होणार आहे. सुर्यदेवता पुनर्वसु, पुष्य आणि आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. शुक्र, मंगळ, रवि, बुध या प्रमुख ग्रहांच्या राशीबदलात कसा जाईल हा महिना! गुरुपौर्णिमेनजीक कोणत्या राशींवर होईल गुरूकृपा!जाणुन घेऊ यात आपल्या जन्मराशीनुसार! वाचा मासिक राशीभविष्य!

जुलै महिन्यातील शुभ-अशुभ दिवस.

उत्तम दिवसः ०७,१२,१५,२२,२३,२६,३१.

चांगला दिवसः ०६,११,१४,१९,२१,२५,२८.

अनिष्ट दिवसः ०२,०३,०४,०५,१७,२०,२४.

मेषः 

महिन्यात शुक्र बुध राशीबदलात आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत. फसवणुकीची दाट शक्यता आहे. जमिन खरेदी विक्रीचे व्यवहार लांबणीवर टाका. घाईगडबडीत निर्णय घेऊ नका विचारअंतीच निर्णय घ्यावेत. आपण बोलण्यावर संयम ठेवावा अन्यथा समस्या निर्माण होतील. लांबचे प्रवास जपुन करावेत. आरोग्याबाबतीत आर्थिक खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. संततीच्या आणि घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या प्रकृतीवर लक्ष द्यावे लागेल. मनात एक प्रकारची खिन्नता राहणार आहे. प्रयत्नांची आणि कष्टाची पराकाष्ठा करावी लागेल. खर्चाने मन व्यथित होईल. मनात चिडचिडेपणा वाढणार आहे. नवीन घर वाहन खरेदीस अनुकूल काळ नाही. प्रतिकूल परिस्थिती सावधानतेने हाताळावी लागते. त्रासदायक काळात वादविवाद टाळा. नोकरीत अचानक बदल घडतील. वातावरण बदलणार आहे. पण बदल नजीकच्या पुढच्या काळासाठी फायदेशीर ठरणार आहेत. नोकरीत आपली मते दुसऱ्यांवर न लादता प्रेमाने वागून इतरांचे सहकार्य मिळवावे लागेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळल्याशिवाय अपेक्षित प्रगती करता येणार नाही. काळात मेहनत वाढवावी लागणार आहे. बोलण्यामुळे गैरसमज होणार नाहीत याची विशेष काळजी घ्या.

चंद्रबलः ०५,०६,११,१७,२३,२७,२९,३०.

वृषभः 

महिन्यात मंगळ राशीपरिवर्तनात स्वभावावर नियंत्रण ठेवून वाटचाल करा. कुटुंबात कटकटी होतील. सुखाच्या अपेक्षेने विनाकारण श्रम करीत राहाल. आरोग्य नरम गरम राहील. स्वत:च्या नातेवाईकाकडुन अपमान होण्याची शक्यता आहे. तरूण तरूणीचे विवाहाचे योग आहेत. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्या. तिच्या आजारपणा मुळे दगदग वाढेल. आपल स्वभाव त्यागी चंचल असा राहील. संतती विषयी चिंता निर्माण होतील. डोळयाचे विकार होण्याची शक्यता आहे. नातेवाईकां कडुन फसवणुक होईल. भागीदारासोबत वादविवाद टाळा. प्रवासात काळजी घ्या. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अपघात भय संभवते. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामावर नाराज होतील. भागिदार चांगले मिळतील. आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे शत्रु निर्माण होतील. मध्यान्न काळानंतर परिस्थितीत काहीसी सुधारणा होईल. व्यवसायिकांनी व्यवसायात बेताचीच गुंतवणूक करणे फायदेशीर आहे. विद्यार्थ्यांना विद्याभ्यास उत्तम जमेल. विवाह इच्छुकांचे विवाह जमतील. भागिदारी व्यवसाय जपून करणे आवश्यक आहे. सुशिक्षीत बेरोजगारांना नोकरीची संधी उत्तम मिळेल. घरामध्ये समारंभाचे नियोजन कराल.

चंद्रबलः ०२,१८,२०,२४,२६,३०.

मिथुनः 

महिन्यात सुरुवातीचे ग्रहयोग पाहता अचानक धनलाभाची संधी मिळेल. जोडीदाराशी आपले विचार कमी जुळतील. प्रकृतिकडे दुर्लक्ष करुन जमणार नाही. प्रवासात काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. उपासने मध्ये खंड पडेल. नोकरदारांनी वरिष्ठांचे म्हणणे ऐकणे जरुरीचे आहे. अन्यथा नोकरीतील बदलास आपणास सामोरे जावे वाहन चालविण्यास ग्रहमान विरोधी आहे. आपल्या संशयी स्वभावावर आळा घाला. काही मनस्ताप देण्यासारख्या घटना अनुभवास येतील. प्रयत्नांदी परमेश्वर याचा काहीसा अनुभव आपणास येईल. महत्वाच्या कामासाठी भाग्य आपणा बरोबर असावे लागते याचा अनुभव आपण प्रत्यक्ष घेणार आहात. मध्यान्न काळानंतर वडिलार्जित इस्टेट आपणास मिळण्याचा योग आहे. आर्थिक प्रगति करण्याच्या विचाराबरोबर आपण आपले आरोग्य जपणे ही नितांत गरजेचे आहे. आपणाला अपेक्षीत असणाऱ्या घटना घडतील. व्यवसायिकांना व्यवसायासाठी अडचणीतून मार्ग काढावा लागेल. शुल्लक कारणांवरुन मानसिक भिती आपणास वाटेल. मानसिक यातनांना आपणास तोंड द्यावे लगेल. जेष्ठांचा सल्ला आपणास बहुमोल ठरेल. अवास्तव खर्च टाळणे जरुरीचे आहे.

चंद्रबलः ०१,१८,२०,२४,२६ २८.

कर्कः 

महिन्यात प्रारंभी चंद्रभ्रमण पाहता जोडीदारास त्रासदायक कालावधी आहे. वाहन प्रवास आपणास करण्यास आवडत असला तरी थोडासा आवर घालावा लागणार आहे. खर्चाचे प्रमाण वाढते ठेवणारा आहे. तेव्हा खर्च जपूनच करावा लागणारआहे. प्रॉपर्टी विक्री पासून नुकसान होण्याची संभावना आहे. शेअर्स अधिकची गुंतवणूक सध्या फायदेशीर नाही. कर्ज प्रकरणामुळे त्रास होईल. महिला वर्गाने आपले आरोग्य जपणे गरजेचे आहे. शासकिय सेवेत असणाऱ्यांसाठी काळ प्रतिकुल आहे. आपणास अतिशय प्रिय असणारा प्रवास हा दूरचा होणार आहे. नोकरदार नोकरी बदलण्याच्या विचारात असतील तर तूर्तास विचार टाळावेत. सामाजिक प्रतिष्ठेस तडा जाण्याची संभावना आहे. व्यवसायिकांना भागिदारीत सामजस्यपणाची भुमिकेतुन वाटचाल करावी लागेल. आरोग्याच्या तक्रारी वाढविणारे आहे. कार्यक्रमांमध्ये वस्तूंची जपणूक करणे गरजेचे आहे. मित्र मैत्रिणींसोबत आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. विद्यार्थ्यांनी आळस न करता उत्साहाने अभ्यास करावा लागणार आहे. मनस्ताप होणाऱ्या घटना आपण टाळल्या पाहिजे. घरातील वातावरण एकंदरीत ताणतणावाचे असल्यामुळे आपली आर्थिक स्थिती चिंतादायक असेन. कर्ज काढताना निर्णय विचारपूर्वक घेणे जरुरीचे आहे.

चंद्रबलः ०२,१७,२२,२४,२५,२६,२९.

सिंहः 

महिन्यात सुर्याचं पुनर्वसु नक्षत्रातील चंद्रभ्रमणात घरातील वरिष्ठ सदस्यांची काळजी घेणे जरुरीचे आहे. बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी जरुर मिळेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या प्रगती दायक यश मिळणार आहे. आपण केलेले नियोजन सुरळीत पार पडेल. कोर्टकचेरीच्या कामांसाठी काळ अनुकूल आहे. आपण विवाहाच्या विचारात असाल तर विवाह खात्रीशीर उत्तम पार पडेल. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षांमध्ये सहभाग घेतला तर यश मिळेल. नोकरवर्गाने वरिष्ठांशी संयमाने वागावे लागणार आहे. आपली बदली मनाविरुद्ध होण्याची संभावना आहे. सुशिक्षीत बेरोजगारांना नोकरीची संधी मिळणार आहे. व्यवसायात आपणाला अपेक्षित फायदा न झाल्यामुळे आपण चिंतीत असाल. भागिदारी व व्यवसायातले व्यवहार करताना काळजी घेणे गरजेचे आहे. कर्जामुळे आपणास त्रास जाणवेल. महिन्याच्या मध्यान्न काळानंतर अनुकूलता लाभणार आहे. त्यामुळे व्यवसायिक समाधानी असतील. व्यवसायिकांनी व्यवसायात गुंतवलेले भांडवल फायदेशीर ठरेल. नवीन घराची खरेदी करण्यास काळ अनुकूल आहे. प्रेमी युगुलांसाठी काळ अनुकूल आहे. आपले विचार एकमेकांशी कमी जुळतील आपल्या मित्र मैत्रिणीच्या सहकार्यामुळे आपण यशाच्या अगदी जवळ जाल.

चंद्रबलः ०१,१२,१६,१७,१९,२४,२६.

कन्याः 

महिन्यात बुधाचं राशीभ्रमण पाहता कला क्षेत्रातील व्यक्तींसाठी काळ यशदायक आहे. शेअर्स मध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरेल. व्यवसायामध्ये आर्थिक आवक उत्तम प्रकारे आलेली अनुभवास येईल. प्रगतीचा आलेख उंचावलेला असेल. नोकरदारांसाठी ग्रहमान साथ देणार आहे. आपणास प्रिय असणारी नोकरीमध्ये बढतीची बातमी वरिष्ठ आपल्याला देणार आहे. लेखक वर्गास त्याच्या उत्कृष्ठ लेखन शैलीमुळे आर्थिक आवक उत्तम येईल. आर्थिक प्राप्तीचे नवे मार्ग मिळतील. स्वत:च्या वास्तूमध्ये राहण्याचा आनंद आपण घ्याल. वास्तू खरेदी करुन घेतच आहात त्याच बरोबर वाहन खरेदी केल्यामुळे आपले घरातील व्यक्ती आपणावर प्रेमाचा वर्षाव तर नक्कीच करणार आहे. कलाकारांना प्रसिद्धीचा काळ उत्तम आहे. त्याच बरोबर कामामध्ये विलंब लागण्याची संभावना आहे. प्रवासातून आपणास योग्य दिशा मिळेल. आर्थिक बचत आपण उत्तम प्रकारे करु शकाल. आपल्या समस्येपेक्षा दुसऱ्याचे कष्ट कमी करण्यासाठी आपण नेहमी तत्पर रहाल. विवाह इच्छुकांचे विवाहयोग उत्तम आहे. आपण इच्छित असलेल्या कामात यश मिळेल. घरामध्ये समारंभाचे नियोजन आपण उत्कृष्ट आखाल. व्यवसायिकांना काळ अनुकूल आहे. प्रगतीचे नवे मार्ग आपणास ग्रहमान देणार आहे.

चंद्रबलः ०४,१८,२०,२७,२९,२८,३०.

तूळ: 

महिन्यात सुरुवातीचे चंद्रभ्रमण आपणास मार्केट मध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम कालावधी आहे. नोकरी व्यापार दोन्हीकरीता नवीन संधी मिळतील त्यातून निश्चित लाभ होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल. मात्र आपल्या बोलण्यावर आणि संशयीवृत्तीवर नियंत्रण ठेवा. राजकीय सामाजीक क्षेत्रातील व्यक्तींना पदप्रतिष्ठा मानसन्मान लाभेल. नोकरीत नियोजित कामे वेळेवर कराल. नवनवीन कल्पना आमलात आणाल. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल. केलेल्या कार्यातून उत्तम धनप्राप्ती होणार आहे. वाहन-घर खरेदीसाठी शुभ योग आहे. व्यापारात धनवान होण्याचे योग आहेत. आकस्मिकपणे धनलाभ होईल. सांपत्तिक परिस्थितीत सुधारणा होईल. आचरण उत्तम राहिल्यामुळे लौकिकता वाढेल. विवाहइच्छुकांचे विवाह जुळतील. वारसाहकाने धन व संपत्ती लाभणार आहे. कौटुंबिक पातळीवर संतुष्ट राहाल. पत्नीकडून विशेष सहकार्य लाभेल. संततीकडून आनंदाची बातमी मिळेल. भागीदारीत लाभ होतील. आरोग्य उत्तम राहिल. मानसिक स्वास्थ लाभेल. प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढीस लागेल. कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक व आंनदायक राहिल. व्यापारीवर्गाकरिता आर्थिक दृष्टीकोनातून उत्तम कालखंड आहे. विरोधकावर मात कराल. संतती कडून चांगली बातमी मिळेल.

चंद्रबलः ०२,,१२,१५,१६,२१,२७,२८.

वृश्चिकः 

महिन्याच्या सुरुवातीस आपल्या मनोकामना पूर्ण करणारे योग आहेत. आर्थिक लाभही आपणास उत्तमच होणार आहे. व्यवसायामध्ये भागीदारांकडून आपणास आर्थिक आवक मिळेल. पती पत्नीस सामाजिक बहुमान मिळेल. त्याचबरोबर प्रसिद्धीपण मिळेल. आरोग्याच्या तक्रारी किरकोळ आहे म्हणून दुर्लक्ष नको. महिला वर्गास शासनाकडून सन्मान मिळेल त्याचबरोबर आर्थिक लाभही उत्तम होईल. पैशाची आवक आपल्या अपेक्षेप्रमाणे असल्याने आपण आनंदी असाल. आपण आपल्या बोलण्यावर संयम ठेवाल तर बऱ्याच समस्या कमी होतील. विद्यार्थ्यांनी चिडखोर पणा वाढू देवू नये. कुटुंबामधून आपणास सुवर्ता मिळणार आहे. आपल्याला अपेक्षीत व्यवहार योग्य रित्या पार पाडणारे ग्रहमान आहे. व्यापारी वर्गास खरेदी पासून व्यवसायात अनपेक्षीत फायदा होईल. संतती प्राप्तीचे योग उत्तम आहे. सुशिक्षीत बेरोजगारांसाठी नोकरीची संधी मिळेल. इच्छीत नोकरी आपणास मिळण्यास काहीच शंका नाही. महिलांना काळ अनुकूल आहे. जोडीदाराशी मतभेद टाळावे. वाहन घर खरेदीचा योग आहे. परदेश भ्रमणात फायदा होईल. प्रेमी युगुलांनी टोकाची भूमिका घेण्यापर्यंत वादविवाद टाळावे. मित्र मैत्रिणींचे सहकार्य लाभेल.

चंद्रबलः१४,१५,१७,१९,२२,२४,२५,२६.

धनुः 

महिन्यात गुरुपौर्णिमेनजीक व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. कामाचा वेग नक्कीच वाढेल. आपण सतत कामात तर असताच व कोणतेही काम चिकाटीने पूर्णत्वास करण्याचा आपला स्वभाव आपल्याला या वेळी साथ देणार आहे. जुन्या मित्र मैत्रिणी आपणास पुन्हा भेटणार आहे. लेखकवर्गासाठी काळ अतिशय अनुकूल आहे. आपली मानसिक स्थिती प्रसन्न राहील. नोकरदारांनी आपल्या ओळखीचा फायदा होईल. आपल्याला नवीन घर वाहन घेण्याचा योग दुग्धशर्करा आहे.आपण याचा नक्कीच लाभ उठवाल. आर्थिक व्यवहारात तुम्हाला जाणवणारी भीती अयोग्य नाही. तेव्हा व्यवहार जपूनच करावा. नशिबाची साथ उत्तम मिळवून देणारे ग्रहमान आहेत. कुटुंबातील वातावरण समाधानी आनंदी असेन. त्यामुळे आपण खुष असाल. एकंदरीत ग्रहस्थिती मानसिक स्वस्थ्य उत्तम देणारी आहे. आपल्या समोर नवीन व्यवसायाच्या ऑफर इतर व्यावसायिक मांडतील. संतती योग उत्तम आहे. आपल्या आयुष्यातील अनपेक्षीत शुभप्रद घटना घडतील. व्यवसायिकांना काळ अनुकूलच आहे. नोकरदारांना वरिष्ठांकडून बक्षीस मिळेल. विद्यार्थ्यांनी आळसापासून दूर रहावे. कोर्टकचेरीची कामे सुरळीत पार पाडणारा योग आहे. शेअर्स खरेदी तूर्तास लांबणीवर ठेवलेली योग्य राहील.

चंद्रबलः ०३,८,११,१४,१७,२४,२८,२९.

मकरः 

महिन्यात मंगळ राशीपरिवर्तनात आत्मविश्वास उंचावलेलं असणार आहे. ध्येय साकार करण्यासाठी अनुकूलता लाभेल. काळ भाग्योदयाच्या दृष्टीने अत्यंत प्रभावी राहिल. युवकांना काळ अतिशय अनुकूल आहे. नवनविन संधी आपल्याला मिळणार आहे. कलाकारांना त्यांच्या कलागुणांना विकसित करण्यास ग्रहमान अनुकूल आहे. पतप्रतिष्ठा वाढण्यास मदत होईल. संततीकडून सर्वदृष्ट्या आनंददायक बातम्या मिळतील. घरातील वरिष्ठांची काळजी आपणाला वाटेल. आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. कोर्टकचेरीचे काम सहज पार पडतील त्यामध्ये आपणास विरोधकावर मात करता येईल. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश मिळेल. व्यवसायिकांना आर्थिक लाभाबरोबर प्रतिष्ठाही मिळवून देईल. जमिन विक्रीतून लाभ होईल. आरोग्य उत्तम राहील. उत्तम मित्र मिळतील. घरात एखादे धार्मिक कार्य कराल. आपल्या शांतता प्रिय व न्यायी स्वभावामुळे आपला लौकिक वाढेल. नोकरीत वरिष्ठांच्या विरूद्ध आपण जात नाही. त्यामुळे बढतीचे योग येतील. आपण आपल्या सहकाऱ्यांकडून चांगले काम करून घ्याल. आपल्या अनेक प्रकारच्या इच्छा पूर्ण होतील.

चंद्रबलः ०७,०९,१२,१४,१७,२१,२८,२९,३०.

कुंभः 

महिन्यातील ग्रहयोग पाहता आर्थिक लाभ होईल. घरातील वातावरण बिघडणार नाही. याबाबतीत काळजी घ्या. व्यवसायिकांनी उद्योगधंद्यात अधिक लक्ष केंद्रीत करावे. आपला इतरांशी स्नेह वाढेल. नोकरदारांना काळ प्रतिकूल आहे. महिला वर्गास प्रकृतीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करुन जमणार नाही. वाहन प्रवासात काळजी घेणे जरुरीचे आहे. घरातील मतभेद सामोपचाराने मिटविलेले बरे अन्यथा त्रासदायक जातील. आर्थिक दृष्ट्या त्रास जाणवेल. पतीपत्नीत मतभेद होऊ शकतात. भावंडांशी संयमाने रहावे लागले नाही तर त्यांच्या पासून दूरावण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेजाऱ्यांशी वादविवाद टाळावे. महत्त्वाचे प्रस्ताव प्रस्थापित करु नये. आरोग्याच्या तक्रारी त्रास देतील. स्वत:च्या वास्तू मध्ये लवकरच आपण प्रवेश कराल. वडिलांची प्रकृती संभाळावी लागेल. वाहन जपून चालविणे. मध्यान्न काळानंतर नोकरीत बढती प्रमोशन मिळाल्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारेल. मौल्यवान वस्तुंचा संग्रह कराल. कलाकारांना चांगली संधी निर्माण होईल. राजकारणात लाभ होतील. कुटुंबातील वरिष्ठ सदस्याच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. दुरवरचे आणि तीर्थस्थळावर प्रवास घडेल.

चंद्रबलः ०६,०७,१६,१९,२२,२४,२९.

मीनः 

महिन्यात रवि मंगळ यांचं राशीबदल पाहता नोकरदारांना नोकरीतील बदल हा विषय समोर येईल. चंचलपणावर आवर घाला. व्यवसायिकांना आर्थिक येणी येण्यास त्रास जाणवेल. व्यवहार अर्धवट होतील. लाभापासून दूरावले जाल. मित्र मंडळी नातेवाईक यांच्याशी वादविवादाची परिस्थिती निर्माण होईल. घरातील वरिष्ठांची काळजी घेणे जरुरीचे आहे. सामाजिक कार्यात ज्यांचा सहभाग आहे. त्यांना बहुमान मिळण्याची संभावना आहे. व्यापारी वर्गाने आर्थिक गुंतवणूक केली तर त्यामध्ये फायदा निश्चित होईल. नेत्र विकाराकडे दुर्लक्ष नको. कोर्टकचेरीचे कामकाजात सुयश लाभेल. प्रेमीयुगुलांनी एकमेकांतील हळवा वाद टाळणे आवश्यक आहे. जमिन खरेदीतून लाभ होईल. बेरोजगारांना नोकरीची सुसंधी मिळेल. व्यसनापासून दूर रहा. मध्यान्न काळानंतर व्यवसायिकांसाठी शुभप्रद फळे देणारे आहे. नोकरीत बदल करण्यास काळ अनुकूल आहे. राजकिय व्यक्तींना मोठा अधिकार प्राप्त होईल. सामाजिक कार्यकर्त्या महिलांसाठी काळ अनुकूल आहे. खेळाडूंसाठी शुभ घटनांचा काळ आहे. व्यापारीवर्गाची आर्थिक येणी वसुल होतील. कलावंतांना उत्तम प्रसिद्धी मिळेल.बहुमान मिळेल. प्रेमी युगुलांसाठी काळ अनुकूल आहे. बोलताना वादविवाद मात्र टाळा. आरोग्य उत्तम राहील. अचानक धनलाभ हेतील.

चंद्रबलः १२,१७,१८,१९,२२,२३,२८.

जय अर्जुन घोडके

(jaynews21@gmail.com)

(लेखक ज्योतिषविद्येचे अभ्यासक आहेत.)

WhatsApp channel