Gemstones In Marathi : रत्नशास्त्र हे भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचे शास्त्र आहे, ज्यामध्ये ग्रहांच्या प्रभावामुळे येणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी विविध रत्नांचा वापर करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. प्रत्येक रत्नाला एक विशिष्ट ग्रहाशी जोडलेले आहे, आणि ही रत्ने योग्य पद्धतीने परिधान केल्याने जीवनातील अनेक अडचणी दूर होतात, असे रत्नशास्त्र सांगते. मात्र, कोणतेही रत्न परिधान करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.
मनुष्याला ऊर्जा आणि आत्मविश्वास प्रदान करणारे गार्नेट हे रत्न सूर्य ग्रहाशी संबंधित आहे. लाल रंगाचे गार्नेट कुंडलीतील सूर्य ग्रहाची स्थिती कमकुवत असल्यास परिधान करणे लाभदायक ठरते. हे रत्न रविवारी उजव्या हाताच्या रिंग फिंगरमध्ये परिधान करावे. यामुळे आत्मविश्वास, प्रतिष्ठा आणि आरोग्य सुधारते, असे मानले जाते.
पिवळ्या रंगाचा पुखराज किंवा टोपाझ हे अत्यंत प्रभावी रत्न मानले जाते. गुरू ग्रहाशी संबंधित हे रत्न परिधान केल्याने आर्थिक स्थिरता आणि समृद्धी प्राप्त होऊ शकते. तर्जनी बोटात पुखराज परिधान करणे शुभ मानले जाते. यामुळे गुरू ग्रह मजबूत होतो आणि जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात.
तुमच्या निर्णय क्षमतेत वाढ करायची असल्यास ग्रीन जेड रत्न परिधान करणे योग्य ठरते. मेंदूची फोकस पॉवर वाढवून नशिबाला आकर्षित करणारे हे रत्न सर्जनशीलतेला देखील चालना देते. विद्यार्थ्यांसाठी आणि सर्जनशील क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हे रत्न खूप उपयुक्त मानले जाते.
निळ्या रंगाचे नीलम हे शनी ग्रहाशी संबंधित रत्न आहे. मात्र, नीलम परिधान करण्यासाठी प्रत्येकाला सल्ला दिला जात नाही, कारण ते रत्न परिधान करणाऱ्याला लाभेल की नाही, याची पडताळणी करणे महत्त्वाचे असते. जेव्हा नीलम योग्य व्यक्तीने परिधान केले जाते, तेव्हाच शनिदेवाचे अनिष्ट परिणाम कमी होतात आणि नशीब उजळते, असे शास्त्र सांगते.
पिवळ्या किंवा सोनेरी रंगाचा सिट्रिन स्टोन हा ‘लक मर्चंट स्टोन’ म्हणून प्रसिद्ध आहे. हे रत्न परिधान केल्याने आर्थिक अडचणी दूर होऊन स्थिरता प्राप्त होऊ शकते. व्यापाऱ्यांसाठी हे रत्न विशेषतः फायदेशीर मानले जाते.
रत्नांचे प्रभाव आणि फायदे अनुभवण्यासाठी त्यांना योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी परिधान करणे अत्यावश्यक आहे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाशिवाय रत्नांचा उपयोग टाळावा, कारण प्रत्येक रत्नाचा प्रभाव व्यक्तीच्या कुंडलीनुसार बदलतो.