मनुष्याच्या विविध अडचणींवर रत्नशास्त्रात विविध रत्ने धारण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शास्त्रात या रत्नांना एक विशेष महत्व आहे. यातील एक रत्नह अत्यंत खास आहे. हे रत्न म्हणजे 'माणिक' होय. माणिकला रत्नांचा राजा म्हणून ओळखले जाते. रत्नशास्त्रात मनुष्याच्या काही अडचणींवर मात करण्यासाठी माणिक रत्न धारण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. परंतु सरसकट सर्वांनीच हे रत्न धारण केल्यास हवा तसा लाभ मिळत नाही. त्यामुळेच ज्योतिषांच्या सल्ल्याने त्या-त्या राशीच्या लोकांनीच हे रत्न धारण केल्यास विशेष फायदा दिसून येतो.
'माणिक'ला रत्नांचा राजा असे म्हटले जाते. या रत्नाचे सौंदर्यात्मक मूल्य तसेच भौतिक आणि आध्यात्मिक गुणधर्मांमुळे हे एक अत्यंत मौल्यवान रत्न समजले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार माणिक रत्नला सूर्यदेवाशी संबंधित मानले जाते. हे रत्न धारण केल्याने त्या व्यक्तीचा कुंडलीत सूर्य ग्रह मजबूत होतो. त्यामुळे त्या व्यक्तीच्या आयुष्यात धन आणि शक्ती प्राप्त होते.
तुमच्या स्वभावातील निडरपणा आणि धैर्य टिकवून ठेवण्यास हे रत्न मदत करते. शिवाय मनातील भीती आणि शंकावर ताबा ठेवण्यास मदत करते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रगती आणि यश प्राप्त होते. तुमचे व्यक्तिमत्व उठावदार बनते. समाजात मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभते. आर्थिक चणचण दूर होऊन बक्कळ पैसा मिळतो. माणिक धारण केल्यास तुमच्या संवाद कौशल्यात सकारात्मक बदल होतो.
रत्न शास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीला ७ ते ८ भारचा माणिक धारण करणे गरजेचे असते. महत्वाचे म्हणजे तांब्याच्या किंवा सोन्याच्या धातूमध्ये हे रत्न घडवून मग धारण करणे अत्यंत शुभ असते. ही अंगठी अनामिका बोटामध्ये धारण करावी. अंगठी धारण करण्यापूर्वी गंगाजल आणि दुधात ती शुद्ध करुन घ्यावी. त्यानंतर ही अंगठी आपल्या हातामध्ये घालावी. शिवाय अंगठी धारण केल्यानंतर सूर्याशी संबंधित वस्तूंचे दान अवश्य करावे. असे केल्याने अंगठीचा पुरेपूर लाभ त्या व्यक्तीला मिळतो.
रत्न शास्त्रात राशीनुसार रत्न धारण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोणत्याही व्यक्तीने कोणतेही रत्न धारण करणे शुभ नसते. कोणतेही रत्न धारण करण्यापूर्वी ज्योतिषांचा सल्ला घेणे गरजेचे असते. सरसकट सर्वानीच एखादे रत्न धारण केल्यास त्याचा विपरीत परिणाम दिसू शकतो. ज्योतिष शास्त्रानुसार, माणिक रत्नाचा लाल रंग आणि निडर गुणधर्म मेष राशीशी मिळताजुळता आहे. त्यामुळेच हे रत्न मेष राशीच्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर असते. शिवाय सिंह, धनु, कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांनीसुद्धा माणिक धारण केल्यास लाभ मिळतो. मात्र हे रत्न धारण करण्यापूर्वी एकदा ज्योतिषांचा सल्ला घेतलेले उत्तम असते.
संबंधित बातम्या