Feng Shui Tips For Positive Energy : फेंगशुई शास्त्र हे चिनी वास्तुशास्त्र आहे. फेंगशुईच्या मदतीने जीवनात सौभाग्य वाढवता येते. अनेकवेळा चुकीच्या सवयींमुळे किंवा वास्तुदोषांमुळे नकारात्मक ऊर्जा वाढते. त्याचा परिणाम जीवनातही दिसू शकतो. फेंगशुई नुसार काही वनस्पती घरासाठी अत्यंत शुभ मानल्या जातात. घरात काही रोपांची लागवड केल्यास नकारात्मकतेवर मात करता येते, असे मानले जाते. इतकंच नाही, तर काही रोपांची लागवड केल्यास घरातील ऑक्सिजनचं प्रमाणही वाढू शकतं. जाणून घ्या अशाच काही वनस्पतींबद्दल ज्या तुमच्या घरात असायलाच हव्यात…
पीस लिली : घरातील सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी पीस लिली नक्कीच लावली पाहिजे. पीस लिली ही वनस्पती ऑफिस किंवा घरात ठेवल्याने सुख-समृद्धी टिकून राहते आणि प्रगतीचा मार्गही मोकळा होतो. याशिवाय पीस लिली घरातील हवा शुद्ध करण्याचे काम करते. याला नासाच्या ‘क्लीन एअर स्टडी’मध्ये विशेष स्थान मिळाले आहे. पीस लिली वायुरूप प्रदूषक जसे की, बेंझिन, फॉर्मल्डिहाइड, ट्रायक्लोरोएथिलीन इत्यादी शोषून घेतो आणि हवा स्वच्छ ठेवतो. त्यामुळे घरात ताजी आणि शुद्ध हवा कायम राहते.
जेड वनस्पती : जेड वनस्पती अतिशय भाग्यवान मानली जाते. असे मानले जाते की, ही वनस्पती घराच्या प्रवेशद्वारावर ठेवल्याने सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. या वनस्पतीमुळे प्राणवायू तर वाढेलच, शिवाय सुख-समृद्धीही वाढेल. जेड प्लांट हवेतील विषारी पदार्थ आणि प्रदूषक शोषून घेतो, ज्यामुळे घरात ताजी आणि स्वच्छ हवा राहते.
मनी प्लांट : घरात आणि घराच्या आजूबाजूच्या परिसरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी आपल्या घरात मनी प्लांट असायलाच हवे. मनी प्लांट घरासाठी आणि सुख-शांतीसाठी खूप भाग्यवान मानले जाते. काही मान्यतांनुसार, मनी प्लांट लावल्याने पैशाची समस्या दूर होते. याशिवाय ही वनस्पती हवेतील प्रदूषक घटकांचे प्रमाण कमी करून, स्वच्छ आणि ताज्या हवेची गुणवत्ता सुधारते. यामुळे श्वसनासंबंधी समस्यांपासून बचाव होतो.
तुळस : हिंदू धर्मात तुळशीच्या झाडाला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. तुळशीचे रोप लावून त्यासमोर तुपाचा दिवा लावल्याने आर्थिक स्थिती चांगली राहते, असे मानले जाते.
बांबूचे रोप : बांबूचे झाड घरासाठी खूप शुभ मानले जाते. घराच्या पूर्व दिशेला बांबूचे झाड लावल्याने घराची सुख-समृद्धी टिकून राहते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.