मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Dhanu Rashi Career : धनु राशीचे लोक प्रचंड धाडसी आणि कर्तृत्ववान असतात, व्यवसायात अधिक यशस्वी होतात

Dhanu Rashi Career : धनु राशीचे लोक प्रचंड धाडसी आणि कर्तृत्ववान असतात, व्यवसायात अधिक यशस्वी होतात

Jan 21, 2024 12:17 PM IST

Dhanu Rashi Career Predictions : राशीच्या गुणधर्मानुसार नोकरी, व्यवसाय निवडल्यास व्यक्तीची चांगली प्रगती होण्याची शक्यता असते. पाहूया धनु राशीसाठी करियरचे कोणते क्षेत्र अनुकूल आहे.

Dhanu Rashi Career
Dhanu Rashi Career

Zodiac Signs and Career : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीची एक रास असते. त्या राशीचे काही गुणधर्म असतात, ते संबंधित व्यक्तीमध्ये आढळतात. त्या स्वभावधर्मानुसार त्या-त्या व्यक्तीचं जीवन चालतं, असं मानलं जातं. राशीच्या गुणधर्मानुसार नोकरी, व्यवसाय निवडल्यास व्यक्तीची चांगली प्रगती होण्याची शक्यता असते. पाहूया धनु (Sagittarius) राशीसाठी करियरचे कोणते क्षेत्र अनुकूल आहे.

धनु राशीत येणारी नक्षत्रे

धनु ही पुरुष प्रधान विषम संख्या असलेली अग्नीतत्त्वाची सात्विक वृत्तीची अशी राशी आहे. या राशीचा स्वामी गुरू असून या राशीमध्ये केतूचे मूळ नक्षत्र, शुक्राचे पूर्वाषाढा आणि रविचे उत्तराषाढा एक चरण नक्षत्र अशी तीन नक्षत्रे येतात. त्यामुळे या राशीवर राशीस्वामी गुरु बरोबरच केतू शुक्र आणि रविचा प्रभाव आहे. या राशीत सर्वाधिक गुरूचा प्रभाव असल्याने बौद्धिक क्षमता, ज्ञानाने परिपूर्ण राशी म्हणून ओळखली जाते. आध्यात्मिक मठ, देवस्थाने इत्यादींशी धनु राशीचा संबंध असतो. या क्षेत्राशी जुळलेल्या कार्याशी धनु राशीच्या व्यक्तींचा संबंध असतो. 

नोकरीच्या निमित्ताने किंवा विश्वस्त म्हणून किंवा अधिकारी म्हणून धनु राशीच्या व्यक्तींना मानाचे स्थान प्राप्त होत असते. प्रायव्हेट क्लासेसचे चालक, पुस्तकांचे लेखक, उच्च न्यालायाये न्यायाधीश, शिक्षक गणितज्ज्ञ, अकाउटंट, इन्कमटॅक्स सल्लागार, इत्यादी व्यवसायात धनु व्यक्ती यशस्वी होतात.

धनु राशींच्या व्यक्तींचा स्वभाव आणि गुणधर्म

धनु राशींचे लोक हे शौर्य गाजवणे, स्वामीनिष्ठा आणि उमदेपणा या गुणांमुळे उठून दिसतात. बुद्धी आणि गती यांचा सुरेख संगम या राशीत आढळतो. ही सज्जन वृत्तीची, महत्त्वाकांक्षी, त्यागी वृत्तीची, प्रेमळ व कलोपासक, दिलदार व न्यायप्रिय अशी राशी आहे. द्विस्वभाव वृत्तीमुळे धरसोड वृत्ती वैचारिक अस्थिरता, अविचारी प्रवृत्ती, चंचलता यांसारखे दुर्गुणही दिसून येतात. सतत नाविन्याची आवड असणारी व सात्विक वृत्तीच्या, पण तेवढ्याच तापट स्वभावाच्या ह्या व्यक्ती दिसून येतात.

प्रचंड धाडस आणि कर्तृत्व हा या राशींच्या लोकांचा पिंड आहे. इतरांना समावून घेण्याची, समजुन घेण्याची वृत्ती यांच्यात आहे. धर्मप्रिय, बुद्धिमान, प्रतापी, आणि विद्वान असतात. शिक्षणात विशेष प्रगती करतात. राजकीय पुढाऱ्यांकडून व मान्यवर व्यक्तीकडून योग्य तो सन्मान यांना मिळतो. समाज व कुटुंबातही मोठे स्थान मिळते. देवावर विश्वास असतो. धार्मिक आस्था, धाडस, उत्साह आणि दृढनिश्चयी असुन स्वत:च्या भाग्यवृद्धीकरिता प्रयत्नशील असतात.

धनु राशींच्या व्यक्तींसाठी अनुकुल कार्यक्षेत्र

धनु राशीचे लोक राजकीय क्षेत्रात मंत्र्यापासून मुख्यमंत्र्यापर्यंत मजल मारतात. कला क्षेत्राशी संबंधीत सर्व व्यवहारात धनु राशीचे महत्त्वाचे योगदान असते. नाटकाच्या क्षेत्रातसुध्दा धनु राशीच्या व्यक्ती प्रामुख्याने आढळून येतात. बँकींग, इन्शुरन्स या क्षेत्रातसुध्दा धनु राशीच्या व्यक्ती आढळतात. तसेच मनोरंजन क्षेत्राशी संबंधीत किंवा फूड इंडस्ट्री, डायमंड उद्योग, सिगरेट किंवा तंबाखू उद्योगाशी सुध्दा काही प्रमाणात धनु व्यक्तींचा संबंध येऊ शकतो. 

धनु राशीत रविचे उत्तराषाढा नक्षत्र असल्याने काही प्रमाणात या व्यक्ती सरकारी किंवा निमसरकारी क्षेत्रात किंवा प्रशासकीय क्षेत्राशी संबधीत नोकरी करतानासुध्दा आढळून येतात. धनु राशीच्या कर्मस्थानात कन्या राशी येते ही बुधाची राशी असून बुधासंबंधीत उद्योग व्यवसायात सुध्दा धनु राशीच्या व्यक्ती दिसून येतात. टेलीकम्युनिकेशन, पर्यटन उद्योगाशी सुध्दा धनु राशीच्या व्यक्ती आढळून येतात. कमिशन तत्त्वावरील सर्व व्यवसाय जाहिरात उद्योग इत्यादी क्षेत्राशी संबंधीत सर्व प्रकारच्या व्यवसायात स्वतःचा उद्योग किंवा नोकरी करतांना धनु राशीच्या व्यक्ती आढळून येतात. कर्माचा स्वामी बुध व राशी स्वामी गुरू या दोन्ही ग्रहांचा बुध्दीशी प्रबोधनाशी संबंध आहे. त्यामुळे या व्यक्ती बौध्दिक क्षेत्राशी प्रामुख्याने जोडल्या जातात. 

समाजकारण सामाजिक प्रबोधनकार, शिक्षणतज्ञ, शिक्षणाधिकारी अशा पदांशी धनु व्यक्तींचा संबंध येतो. धनु व्यक्ती या क्षेत्रात प्रामुख्याने आपले करीअर करतांना आढळतात. धनु व्यक्तींच्या स्वतःच्या शिक्षणसंस्था, कॉलेजमध्ये सुध्दा आढळून येतात. परंतु नोकरीपेक्षा स्वतःच्या व्यवसायातच धनु व्यक्ती विशेष करून रममाण होतांना दिसतात. कर्मस्थानातील राशी कन्या असून ती द्विस्वभावी वृत्तीची व तिचा स्वामी बुध सुध्दा द्विस्वभावी वृत्तीचा असल्याने धनु व्यक्ती एकाच व्यवसायात किंवा एकाच नोकरीत कधीही टिकत नाहीत. त्यांचे एकापेक्षा जास्त उद्योगातुन करीअर घडले जाते. नोकरी करुनसुध्दा पार्टटाईम उद्योग करणाऱ्या व्यक्ती धनु राशीत आढळून येतात. या व्यक्तींची एकाच नोकरीत किंवा एकाच व्यवसायात आपले करीअर करण्याची इच्छा नसते. धनु राशीत येणाऱ्या नक्षत्राचा आणि नक्षत्र स्वामीच्या प्रभावाचा विचार केले असता नोकरी संभाळून व्यवसायाही धनु व्यक्ती करू शकतात. पंरतु योग्य क्षेत्राची निवड केली तर नोकरी पेक्षा व्यवसायात नक्कीच जास्त यशस्वी होऊ शकतात. बौद्धीक अधिष्ठान लाभलेल्या या व्यक्तींना व्यवसाय हाच अनुकुल राहील.

 

 

जय अर्जुन घोडके

(jaynews21@gmail.com)

(लेखक ज्योतिषविद्येचे अभ्यासक आहेत.)

WhatsApp channel