मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Dhanu Makar Kumbh Meen Rashi : मीन राशीच्या लोकांना स्पर्धापरिक्षेत प्राविण्य मिळेल! वाचा चारही राशींचे भविष्य!

Dhanu Makar Kumbh Meen Rashi : मीन राशीच्या लोकांना स्पर्धापरिक्षेत प्राविण्य मिळेल! वाचा चारही राशींचे भविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
May 04, 2024 11:02 AM IST

Sagittarius, Capricorn, Aquarius, Pisces prediction 4 May 2024 : आज ४ मे २०२४ रोजी, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा असेल शनिवारचा दिवस? वाचा चारही राशींचे राशीभविष्य!

धनु, मकर, कुंभ आणि मीन
धनु, मकर, कुंभ आणि मीन

Dhanu Makar Kumbh Meen Rashi Bhavishya : आज ऐंद्र व वैधृती योग आहे. शनिबरोबरचं मंगळ, बुध, राहु, नेपच्युन या ग्रहांशी चंद्राच्या युतीयोगात धनु, मकर, कुंभ व मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल आजचा दिवस! वाचा राशीभविष्य!

धनु: 

आजच चंद्रबल अनिष्ट असल्याने विचारपूर्वक नियोजन करून कार्य करा. नोकरी व्यापारात आर्थिक प्राप्तीसाठी खुप झगडावे लागेल. स्पर्धकांच्यावर लक्ष ठेवा. हितशत्रु गुप्तशत्रूचा त्रास जाणवेल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना लोकांचा विरोध असहकार्य लाभेल. मानसिक शारिरिक थकवा जाणवेल. मित्रमैत्रिणी बरोबर युक्तिवाद टाळावेत. मनात असंतोष निर्माण होईल. मोठे व्यवहार टाळावेत. वैवाहिक जीवनात ताणतणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. अती भावनाप्रधानतेमुळे मात्र मनःस्तापाचे प्रसंग येतील. आलेला पैसा ताबडतोब गुंतवणूक करणे हिताचे ठरेल. मुलाच्या बाबतीत वाजवी पेक्षा जास्तच विचार कराल. कुटुंबातील आपसातील मतभेद वाढू नयेत याची काळजी घ्या. कोणताही विषय जास्त ताणू नये. 

शुभरंगः पिवळसर, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०३, ०५.

मकर: 

आज गुरूच्या नक्षत्रातील चंद्रभ्रमणात मोठी आर्थिक गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर टाळा. अंहकार आणी मोठेपणामुळे मित्रमैत्रिणी दुरावण्याची शक्यता आहे. वाईट सवयीचा त्याग करा. मनाची उद्विग्नता वाढेल. नोकरीत वरिष्ठांच्या विचारा विरुद्ध जाऊ नका. महत्वाची कामे शक्यतो आज टाळावीत. मुलांकडून काही बाबतीत त्रास होईल. त्यांच्याशी वादविवाद होण्याची शक्यता आहे. मन चिंताग्रस्त राहील. मनावर संयम ठेवा. अपघात भय संभवते. आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष करु नका. प्रत्येक बाबतीत थोडा आळशीपणा कराल. परदेशा संदर्भात काही कामे असतील तर ती रखडतील. घरातील मोठ्या लोकांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. विशेषतः आईच्या प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक ठरेल. शत्रूच्या गुप्त कारस्थानाला बळी पडला नाहीत तरी त्रास मात्र होईल. स्वतःच्या हिमतीवर कामे पूर्ण कराल. प्रगतीचा मार्ग समजावून घेताना कष्टाला आपलेसे केलेत तर यश निश्चित मिळेल. 

शुभरंग: जांभळा, शुभदिशा: नैऋत्य, शुभअंकः ०४, ०७.

कुंभ: 

आजच्या अशुभ ग्रहयोगात कोणतीही नवीन योजना राबवताना त्या वास्तव परिस्थितीला धरून आहेत की नाही याचा विचार अवश्य करावा. घरामध्ये तुमचे विचार इतरांना पटणार नाहीत. त्यामुळे मतभेद होण्याची शक्यता आहे. घरातील स्त्रियांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. परदेशगमनात अडचणी आल्यामुळे परदेशी जाण्याचे बेत लांबणीवर पडतील. झोपेच्या तक्रारी डोके वर काढतील. शेअर बाजारात गुंतवणूक करताना अविचार होण्याची शक्यता आहे. व्यवसायात वादविवाद होऊ शकतात. अनिश्चितेमुळे वैचारिक पातळीवर वातावरण ताण तणात्मक राहिल. मान अपमानाचे प्रसंग घडतील. नोकरीत अनुकुलता राहिल. शासकीय कामकाजा करिता सफलतादायक दिवस आहे. कायदेशीर कामात विलंब होईल. व्यापारात भागीदाराकडून उत्तम सहकार्य मिळणार आहे. प्रेम प्रकरणात विरोधाला सामोरे जावे लागेल. महत्वाची कागदोपत्रे मात्र संभाला.

शुभरंग: निळा, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०५, ०८.

मीन: 

आज ग्रहमान अनुकुल आहे. अनेक कामे मार्गी लागतील. मानसिक स्वास्थ्य देणाऱ्या घटना घडतील. कामाच्या बाबतीत दुसऱ्यांना कामाला लावाल. मर्दानी खेळ खेळणाऱ्यांना चांगले ग्रहमान आहेत. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी येतील. प्रवासात थोडा त्रास होण्याची शक्यता असल्यामुळे उत्तम नियोजन करणे आवश्यक ठरेल. कामात यश मिळण्याचे योग आहेत. जास्त फायदा मिळण्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्न फायदेशीर राहतील. व्यापारात फसव्या योजनेवर विश्वास ठेवू नका. आर्थिक गुंतवणुक करताना विचार पूर्वक करा. भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. नोकरीत कामा प्रती सजग रहा. आळस दुर ठेवा. मित्रपरीवारां कडून उत्तम सहकार्य लाभेल. कुटुंबात धार्मिक कार्य घडेल. प्रवासातुन लाभ होईल. परदेश भ्रमणाची शक्यता आहे. स्पर्धापरिक्षेत प्राविण्य मिळेल. कौटुंबिक सौख्य वाढेल.

शुभरंगः पिवळा, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०२, ०६.

WhatsApp channel