Vrishabha Career Predictions : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीची एक रास असते. त्या राशीचे काही गुणधर्म असतात, ते संबंधित व्यक्तीमध्ये आढळतात. त्या स्वभावधर्मानुसार त्या-त्या व्यक्तीचं जीवन चालतं, असं मानलं जातं. राशीच्या गुणधर्मानुसार नोकरी, व्यवसाय निवडल्यास व्यक्तीची चांगली प्रगती होण्याची शक्यता असते. पाहूया वृषभ राशीसाठी करियरचे कोणते क्षेत्र अनुकूल आहे.
वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. या राशीत रविचे कृत्तिका चंद्राचे रोहिणी आणि मंगळाचे मृगशीर्ष ही नक्षत्रे येतात. त्यामुळे या राशीवर शुक्र रवि चंद्र व मंगळ या ग्रहांचे प्रभाव आहे. रविच्या नक्षत्राची तीन चरणे आणि मंगळाच्या नक्षत्राची दोन चरणे या राशीत येतात. चंद्राची चारही चरणे या राशीत येतात. त्यामुळे वृषभ राशीवर रवि आणि मंगळापेक्षा शुक्र आणि चंद्राचे वर्चस्व जास्त प्रमाणात असते. रवि त्यानंतर मंगळाचा प्रभाव राहील. सर्वाधिक प्रभाव वृषभ राशीवर शुक्र ग्रहाचा दिसून येतो. प्रंचड मेहनती असं या राशीचं वर्णन करता येईल. पैसा मिळविण्यासाठी कष्ट करणारी तेवढीच खर्चिक स्वभावाची माणसं असतात. स्वार्थ आणि परमार्थ अशी दोन्ही साधणारी ही रास आहे.
वृषभ राशीच्या व्यक्ती स्थिर गतीने चालणाऱ्या असतात. आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि नेहमी चांगल्या कामात रस घेणाऱ्या व वैयक्तिक चातुर्यांने सौख्यमय जीवन जगणाऱ्या असतात. चालण्या बोलण्यात अल्लडपणा दिसून येतो. खाण्यापिण्याचे शौकीन असतात. संवेदन शील कलात्मक गोष्टींकडे कल असणाऱ्या निसर्गाच्या सान्निध्यात रमणाऱ्या दिसून येतात. स्थिर प्रवृत्तीच्या विचारात सहसा बदल न करणाऱ्या एकनिष्ठ अशा असतात. ज्याच्यावर विश्वास ठेवतील त्याच्याशी प्रामाणिक राहतील. सामाजिक जीवनात यांना चांगले स्थान प्रतिष्ठा असते. सामाजिक कार्यात या रममाण होणाऱ्या दिसून येतात. राजकारण, चित्रकला, सिनेमा, अभिनय इत्यादी क्षेत्राशी संबंधीत असणाऱ्या दिसून येतात. उद्योगप्रियता व व्यवहारकुशलता या गुणांचा समावेश वृषभेत दिसून येतो. विलासी वृत्ती ऐहिक सुखाची आवड असणाऱ्या असतात. निर्मितीक्षम व सर्जनशील राशी असल्यामुळे कलावंत या राशीत दिसून येतात.
वृषभ राशीच्या व्यक्ती कलासक्त व निसर्गप्रेमी असतात. वृषभ राशीवर शुक्र ग्रहांचा प्रभाव आणि उद्योगशील वृत्तीची राशी असल्याने ह्यांचे करियर विशेषतः कला, शेअर्स मार्केट, संगीत, बँकिंग ऑफिसर तसेच ड्रेस डिझायनर्स, केमिस्ट इत्यादि क्षेत्रात उत्तम करीअर होते. यांच्या कर्मस्थानी शनिची राशी असल्यामुळे या व्यक्ती वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ असतात. सर्विस इंडस्ट्रीत अशा व्यक्ती दिसून येतात. या राशीत रविचे कृत्तिका नक्षत्रावर या व्यक्तींचा जन्म झाला असेल तर प्रशासकीय क्षेत्रातील नोकरी करताना आढळून येतील.
वृषभ राशीत रवीचे कृतिका नक्षत्र येत असल्यामुळे सरकारी किंवा निम सरकारी क्षेत्रात नोकरी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. शनि जर कर्मस्थानी बलवान असेल तर नोकरी ऐवजी स्वतंत्र व्यवसाय करणारा दिसून येईल. लोखंडाचा व्यवसाय स्टील उद्योग किंवा या व्यवसायाला लागणाऱ्या इतर साहित्य निर्मितीसंबंधीत व्यवसायात या व्यक्तींना संधी दिसून येतात. वृषभ राशीच्या व्यक्ती टेक्सटाईल्स संबंधीत व्यवसायात किंवा फॅशन डिझायनिंगच्या व्यवसायातसुध्दा दिसून येतात. कारण हे सर्व उद्योग किंवा व्यवसाय शुक्र ग्रहाच्या प्रभावाखाली येतात.
शेतीउद्योग आणि हॉटेल या व्यवसायात वृषभ राशीचे वर्चस्व दिसून येते. सिने इंडस्ट्रीतील वेगवेगळ्या विभागात जसे गायन वादन अभिनय तांत्रिक बाबतीत सृजनशील वृषभ राशीच्या व्यक्ती दिसून येतील. रत्न हिरे सोन्या चांदीचे दागिने बनविण्याच्या उद्योगामध्ये सुध्दा वृषभ राशीच्या व्यक्तींना चांगल्या संधी मिळू शकतील. दुग्धव्यवसाय वृषभ राशीच्या प्रभावाखाली येतात.
अत्याधुनिक वस्तूंची निर्मिती या व्यवसायात वृषभ राशीच्या व्यक्तींना चांगल्या संधी मिळतात. ज्यांचे जन्मनक्षत्र रोहिणी नक्षत्र आहे अशा वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी वरील उद्योग किंवा व्यवसाय चांगले फायदेशीर ठरू शकतात. शिपिंगचा व्यवसायसुध्दा चांगला ठरु शकतो. वैद्यकीय क्षेत्रात किंवा औषधी निर्मिती क्षेत्रातसुद्धा करियर करू शकतो. चंद्राचे रोहिणी नक्षत्र येत असल्यामुळे सौंदर्यप्रसाधने ब्युटी पार्लर वनौषधी उत्पादन या क्षेत्रात करीअर करण्याची शक्यता असते.
वृषभ राशीत मंगळाचे मृगशीर्ष नक्षत्र येत असल्यामुळे पोलीस दल मिलिटरी संरक्षक दल किंवा जमिनीच्या व्यवसायात बांधकाम व्यवसायातही करीअर होण्याची शक्यता असते. अशाप्रकारे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी नोकरीपेक्षा उद्योग क्षेत्रात मोठी मजल मारता येऊ शकते.
(jaynews21@gmail.com)
(लेखक ज्योतिषविद्येचे अभ्यासक आहेत.)
संबंधित बातम्या