मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Budh Gochar : बुध करणार राशी परिवर्तन! 'या' राशीच्या लोकांनी सांभाळून राहावे, होऊ शकते नुकसान

Budh Gochar : बुध करणार राशी परिवर्तन! 'या' राशीच्या लोकांनी सांभाळून राहावे, होऊ शकते नुकसान

Jun 27, 2024 09:18 AM IST

Mercury Transit Negative Impact On Zodiac Signs : बुध ग्रह मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. बुध ग्रहाची स्थिती कमकुवत असेल तर काही राशींना त्याचा त्रास सहन करावा लागतो. अशात बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे कोणत्या राशीच्या लोकांना सांभाळून राहावे लागेल जाणून घ्या.

बुध संक्रमणाचा राशींवर प्रभाव
बुध संक्रमणाचा राशींवर प्रभाव

ज्योतिषशास्त्रात तब्बल नऊ ग्रह कार्यरत आहेत. या ग्रहांपैकी बुध ग्रहाला अतिशय शुभ ग्रह समजले जाते. शिवाय बुध बुद्धी, वाणी, संवाद, धन, व्यापार यांचे प्रतीक आहे. बुध शुभ स्थानातून गोचर करत असेल तर त्याच्या या गुणधर्मांचा लाभ राशीचक्रातील राशींना मिळतो. मात्र बुध ग्रहाची स्थिती कमकुवत असेल तर काही राशींना त्याचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळेच बुध ग्रहाच्या हालचाली अत्यंत महत्वाच्या समजल्या जातात.

ज्योतिष अभ्यासानुसार २९ जून २०२४ रोजी रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी शनीदेव आपली वक्री चाल चालणार आहेत. परंतु तत्पूर्वी बुध राशी परिवर्तन करत कर्क राशीत प्रवेश करणार आहे. २९ तारखेलाच दुपारी १२ वाजून १३ मिनिटांनी बुध गोचर होणार आहे. बुध आणि शनीच्या राशी परिवर्तनाचा काही राशींवर नकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. कोणत्या राशींना बुध ग्रहापासून जपून राहावे लागणार ते जाणून घेऊया.

वृषभ

वृषभ राशीसाठी बुध दुसऱ्या आणि पाचव्या घराचा स्वामी ग्रह आहे. मात्र बुध आता या राशीच्या तिसऱ्या घरात प्रवेश करणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना सांभाळून राहावे लागणार आहे. याकाळात वृषभ राशीच्या लोकांना कार्यक्षेत्रात अडचणी निर्माण होतील. वरिष्ठांचा रोष ओढवून घ्याल. उद्योग-व्यापारात मनासारखा लाभ मिळणार नाही. याउलट नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे. भागीदारीच्या व्यवसायात पार्टनरसोबत मतभेद होऊ शकतात. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. अथवा हातातील चांगल्या संधी निसटतील. शिवाय आर्थिक चणचण भासू शकते.

कर्क

बुध कर्क राशीच्या तिसऱ्या आणि बाराव्या घराचा स्वामी ग्रह आहे. मात्र यंदा बुध या राशीच्या पहिल्या घरात संक्रमण करणार आहे. करिअरच्या दृष्टीने हा काळ कर्क राशीच्या लोकांसाठी कठीण असणार आहे. कार्यक्षेत्रात विविध अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. व्यापार-उद्योग असणाऱ्यांना काही निर्णय चुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठे नुकसान होईल. तुमची विचार करण्याची क्षमता काहीशी मंदावेल. त्यामुळे योग्य आणि अयोग्य समजण्यास अडचण होईल. याकाळात तुमच्या खर्चात वाढ होऊन आर्थिक स्थिती बिघडण्याची शक्यता आहे. शिवाय जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे.

सिंह

बुध गोचरचा नकारात्मक परिणाम सिंह राशीच्या लोकांनासुद्धा सहन करावा लागणार आहे. बुध ग्रह सिंह राशीसाठी दुसऱ्या आणि अकराव्या घरातील स्वामी ग्रह आहे. मात्र तो आता बाराव्या घरात प्रवेश करणार आहे. बुधच्या या गोचरने तुमच्या सुखसुविधांमध्ये घट होण्याची शक्यता आहे. हा काळ तुमच्यासाठी काहीसा तणावात्मक असणार आहे. कार्यक्षेत्रात अडचणी निर्माण होतील. कामाची गती मंदावेल. नोकरीमध्ये सतत वरिष्ठांचा दबाव जाणवेल. आरोग्यसंबंधी समस्या उद्भवतील. त्यामुळे खानपानात विशेष काळजी घ्या.

WhatsApp channel