ज्योतिषशास्त्रानुसार राशी अत्यंत महत्वाच्या असतात. राशिचक्रात एकूण १२ राशी कार्यरत असतात. या १२ राशींपैकीच कोणत्याही एक राशीत प्रत्येक व्यक्तीचा जन्म होत असतो. त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर राशींचा मोठा प्रभाव पडत असतो. राशीच्या आधारे एखाद्या व्यक्तीचे भविष्यच नव्हे तर स्वभाव, गुणदोष, आवडी-निवडी आणि करिअर याबाबतही अंदाज बांधता येतो.
शास्त्रानुसार राशींमध्येसुद्धा दोन प्रकार पाहायला मिळतात. या प्रकारांना चंद्र राशी आणि सूर्य राशी असे म्हटले. चंद्र राशीलाच जन्म राशी म्हणून संबोधले जाते. तर सूर्य राशी एखाद्या व्यक्तीची भविष्यात होणारी प्रगती, इच्छा आकांक्षा यासंबंधित अंदाज बांधण्याचे काम करते. सर्वसामान्य लोकांप्रमाणेच बॉलिवूड सेलिब्रेटीसुद्धा ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवतात. अनेकांना आपल्या आवडत्या सेलेब्रेटींची राशी जाणून घेण्याची इच्छा असते. आज काही लोकप्रिय बॉलिवूड कलाकारांच्या राशीबद्दल जाणून घेणार आहोत.
बॉलिवूडचा दबंग म्हणून सलमान खानला ओळखले जाते. आज वयाच्या पन्नाशीनंतर चाहत्यांवर त्याचा जलवा कायम आहे. सलमान खानच्या राशींबाबत सांगायचे झाले तर, त्याची चंद्र रास मकर आणि सूर्य रास धनु आहे. मकर राशीचे लोक गंभीर स्वभावाचे असतात. तर धनु राशीचे लोक निडर आणि आत्मविश्वासी असतात. त्यामुळेच या दोन्ही राशीचे गुण सलमानमध्ये पाहायला मिळतात.
बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे कतरिना कैफ होय. कतरिनाला तिच्या फिटनेस आणि डान्स मूव्ह्ससाठी प्रचंड प्रशंसा मिळत असते. ज्योतिषशास्त्रानुसार कतरिनाची चंद्र राशी कन्या तर सूर्य राशी मिथुन आहे. कन्या राशीचे लोक प्रचंड भावुक आणि आशावादी असतात. तर मिथुन राशीच्या लोकांना मर्यादेत राहायला आवडतं. त्यांना आयुष्यात प्रत्येक गोष्टीत यश मिळते. आणि या दोन्ही राशीच्या गुणधर्मांचा फायदा कतरिनाला मिळत आहे.
बॉलिवूडचा हॅंडसम हंक अभिनेता आणि कतरिनाचा पती म्हणजे विकी कौशल होय. विकी कौशलने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले विशेष स्थान निर्माण केले आहे. विकीची चंद्र राशी मेष आणि सूर्य राशी वृषभ आहे. मेष राशीचे लोक अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे असतात. समाजात त्यांना महत्वाचे स्थान असते. तर वृषभ राशीचे लोक आकर्षक आणि कलाप्रेमी असतात. त्यामुळेच हे गुण विकीमध्ये आपसूकच येतात.
बॉलिवूडच्या सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून दीपिका पादुकोणला ओळखले जाते. दीपिकाने बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा प्रभाव पाडला आहे. लवकरच आई बनणार असणाऱ्या दीपिकाची चंद्र राशी तूळ आणि सूर्य राशी धनु आहे. तूळ राशीच्या स्त्रिया फारच आकर्षक असतात. त्यांचे हास्य खूपच लोभस असते. या लोकांना मनाने नाही तर बुद्धीने काम करणे पसंत असते. तर धनु राशीचे लोक निडर आणि महत्वकांक्षी वृत्तीचे असतात.
बॉलिवूडचा बाजीराव म्हणजेच अभिनेता रणवीर सिंग होय. रणवीरने आपल्या अभिनयातून आपला एक वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. रणवीरची चंद्र राशी कुंभ आणि सूर्य राशी मिथुन आहे. कुंभ राशीचे लोक साहित्यप्रेमी आणि हुशार असतात. तसेच या लोकांना व्यवहार ज्ञान प्रचंड असते. तर मिथुन राशीच्या लोकांना महागड्या कार आणि भौतिक सुखसुविधांचे आकर्षण असते.
बॉलिवूडमध्ये अगदी कमी वयात मोठे यश मिळवणारी अभिनेत्री म्हणून आलिया भट्टला ओळखले जाते. बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूडमध्येही आलियाने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. करिअरमध्ये अफाट यश मिळवणाऱ्या आलियाची चंद्र राशी धनु आणि सूर्य राशी मीन आहे. धनु राशी स्पष्टवक्तेपणा आणि विचारांचे प्रतिनिधित्व करते. तर मीन राशी दयाळू आणि संवेदनशीलतेचे प्रतीक आहे.
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने आपल्या चॉकलेटी बॉयच्या इमेजने तरुणींना अक्षरशः वेड लावले आहे. शिवाय अभिनेत्याने आलिया भट्टसारख्या आघाडीच्या अभिनेत्रीसोबत लग्न करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. एका गोंडस लेकीचा बाबा असणाऱ्या रणबीरची चंद्र राशी मकर आणि सूर्य राशी कन्या आहे. मकर राशीचे लोक अति महत्वकांक्षी असतात. तर कन्या राशीचे लोक भावुक आणि हट्टी स्वभावाचे असतात.
संबंधित बातम्या