मनुष्याच्या आयुष्यात वृक्षांना अतिशय महत्व आहे. कारण पर्यावरणातूनच आपल्याला प्राणवायू अर्थातच ऑक्सिजन मिळत असतो. निसर्गात असणारी झाडे ऑक्सिजन निर्मिती तर करतातच शिवाय आपला निसर्ग शुद्धीकरणसुद्धा करत असतात. तर हिंदू धर्मात वृक्षांना देवता म्हणून त्यांचे पूजन करतात.
वैदिक शास्त्रात अशी मान्यता आहे की, ज्या व्यक्तीने आपल्या आयुष्यात किमान एकदा तरी वटवृक्ष किंवा पिंपळाचे झाड लावून ते वाढवल्यास त्याला नरकात जावे लागत नाही. तुळशीचीही पूजा आपल्या धर्मात महत्वाची आहे. शिवाय ज्योतिषशास्त्रात कोणत्या राशीच्या लोकांनी कोणते झाड लावायला हवे याबाबत माहिती दिली आहे. आज याबाबतच जाणून घेणार आहोत.
ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक राशीचा एक स्वामी ग्रह असतो. त्यानुसार मेष या राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे. त्याला अनुसरुन या राशीच्या लोकांनी डाळिंब, लिंबू, तुळस, आवळा, आंबा याशिवाय मंगळवारी लाल चंदन आणि खैराची रोपेसुद्धा लावावीत. या वृक्षांमुळे तुम्हाला नवा आत्मविश्वास मिळण्यास मदत होईल. शिवाय तुमच्या आयुष्यात शुभ परिणाम दिसून येतील.
वृषभ या राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. या लोकांनी पांढऱ्या फुलांची रोपे लावावीत. आणि त्यांची योग्य वाढ होईपर्यंत त्यांची काळजी घ्यावी. प्रामुख्याने चमेली, अशोक,जांभूळ इत्यादी झाडे लावावीत. यामुळे तुमच्या आयुष्यात सुखसमृद्धी येईल.
मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध आहे. या लोकांनी बुधवारच्या दिवशी आंबा, अशोक, मनी प्लांट, पेरू, तुळस यांसारखी हिरवी पाने असलेली झाडे आणि रोपे लावावीत. त्यामुळे तुमच्या आयुष्यात आर्थिक समाधान लाभेल.
कर्क राशीचा स्वामी ग्रह चंद्र आहे. सोमवारी या लोकांनी रातराणी, चमेली, मोगरा, आवळा, पिंपळ यांची रोपे लावावीत. याशिवाय तुम्ही औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतीही म्हणजे तुळस, गवती चहा, पुदीनाही लावू शकता. त्यामुळे तुमच्या आयुष्यात प्रगतीचा नवा मार्ग खुला होईल.
सिंह राशीचा स्वामी ग्रह सूर्य आहे. या लोकांनी सूर्यफूल, लाल गुलाब, लाल झेंडू यांसारखी फुले येणारी झाडे लावावीत. शिवाय या राशीचे लोक जांभूळ, वड किंवा लाल चंदनाची झाडेही लावू शकतात.
कन्या राशीचा स्वामी ग्रह बुध आहे.त्यामुळेच या राशीच्या लोकांनी अशोक, मनी प्लांट ही रोपे लावावी. शिवाय फळझाडे-वेली म्हणून सुपारी, द्राक्षे आणि पेरूही लावणे शुभ असते. यामुळे तुमच्या आयुष्यात विविध मार्गाने आनंद येईल.