आपल्या संस्कृतीत लग्न ही एक अत्यंत महत्वाची बाब आहे. या प्रथेतून दोन अनोळखी व्यक्ती एकत्र येऊन नव्याने आयुष्य सुरु करतात. तसेच ते आयुष्यभर एकमेकांची साथ देण्याचे वचन घेतात. त्यामुळेच नवरा-बायकोचे नाते खूप खास असते. आपण आपल्या आजूबाजूला अनेक जोडपी पाहिली आहेत जी एकमेकांसोबत खूप प्रेमाने राहतात. तर दुसरीकडे अशी अनेक जोडपी आहेत जी सतत आपापसांत भांडत असतात. याचे एक कारण म्हणजे परस्पर समन्वय आणि विश्वासाचा अभाव होय. परंतु ज्योतिषशास्त्राच्या आधारे पाहिले तर यामागचे एक महत्वाचे कारण म्हणजे ग्रह-नक्षत्र होय. ग्रह-नक्षत्रांच्या दोषांमुळे पती-पत्नीमध्ये नेहमी मतभेद होत असल्याचे सांगितले जाते.
शास्त्रानुसार पती पत्नीच्या नात्यामध्ये ग्रहांची दशा प्रभाव पाडत असते. त्यामुळेच नकळत त्यांच्या नात्यात विविध अनपेक्षित बदल पाहायला मिळतात. प्रचंड प्रेम असूनदेखील त्यांचे क्षुल्लक कारणावरुन खटके उडत असतात. सततच्या वादामुळे त्यांचे नाते कमजोर व्हायला सुरुवात होते. एकमेकांबद्दल आदर आणि प्रेमसुद्धा कमी व्हायला लागते. अशावेळी अनेक नाती मोडण्याच्या दशेत असतात. त्यामुळे योग्य वेळी हे ग्रहदोष दूर करणे आवश्यक असते. पती-पत्नीमध्ये वादविवाद होण्यामागे कोणते ग्रह कारणीभूत असतात आज आपण त्याबाबत जाणून घेणार आहोत.
ज्योतिषशास्त्रामध्ये मनुष्याच्या आयुष्यात येणाऱ्या विविध दोषांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. एखाद्या गोष्टीत प्रचंड कष्ट करुन यश मिळत नसेल किंवा अफाट प्रेम असूनही जोडप्यांमध्ये भांडण होत असेल, तर त्याला कारणीभूत कुंडलीमधील ग्रह असतात. कुंडलीतील ग्रह मनुष्याच्या आयुष्यात प्रभावी बदल घडवून आणतात. शास्त्रानुसार पुरुषाचे वैवाहिक आयुष्य शुक्र ग्रहाच्या स्थितीवर अवलंबून असते तर दुसरीकडे स्त्रियांचे वैवाहिक आयुष्य गुरु ग्रहावर अवलंबून असते. या दोन ग्रहांच्या शुभ प्रभावाने पतिपत्नीचे नाते बहरते. मात्र यांचा प्रभाव अशुभ असेल तर या नात्यात अनेक अडचणी येतात. शिवाय शनि, सूर्य, मंगळ, राहू, केतू अशा ग्रहांचादेखील कमीअधिक प्रभाव पतिपत्नीच्या नात्यावर दिसून येतो. मात्र या नात्यासाठी मुख्य ग्रह शुक्र आणि गुरुच असतात.
ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीत विविध ग्रहांच्या स्तिथींचा महत्वाचा वाटा असतो. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत ६ व्या, ८व्या किंवा १२व्या घरात सातवा स्वामी असेल किंवा सप्तम स्वामी पाचव्या भावात असेल तर त्या कुटुंबात सतत वाद-विवादामुळे अशांतता निर्माण होते. त्याचबरोबर सातव्या भावात शनि, मंगळ, सूर्य, राहू-केतू या ग्रहांची दृष्टी असल्यास पती-पत्नीमध्ये वाद होतात. त्यांचे नाते बिघडायला सुरुवात होते. शिवाय त्यांच्या नात्यातील प्रेम आणि आदर कमी व्हायला लागतो.
ज्योतिषशास्त्रानुसार नवरा-बायकोच्या नात्यात स्थैर्य आणण्यासाठी मंगळ ग्रह महत्वाची भूमिका बजावतो. मंगळच्या शुभ-अशुभ प्रभावाचा परिणाम पतिपत्नीच्या नात्यावर दिसून येतो. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ अशुभ स्थानात असेल किंवा त्याचा संबंध कुंडलीच्या ७व्या किंवा ५व्या घराशी असेल तर अशा स्थितीत पती-पत्नीमध्ये अनेकदा वाद होतात. त्यांच्यामध्ये अनपेक्षित गोष्टी घडतात. म्हणून वेळीच ग्रहदोष दूर करणे गरजचे असते. बहुतांश नाती घटस्फोटापर्यंत पोहोचतात. मात्र हे ग्रहदोष दूर केल्यास पतिपत्नींमध्ये विश्वास आणि प्रेम वाढीस लागतो. आणि वादविवाद संपुष्ठात येतात.
ज्योतिष शास्त्रामध्ये हे ग्रहदोष दूर करण्यासाठी प्रभावी उपाय सांगितले आहेत. त्यानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबात वाद होत असतील तर अशा परिस्थितीत दररोज झोपण्यापूर्वी उशीखाली कापूर ठेवावा. यानंतर सकाळी उठून हा कापूर जाळावा, असे केल्याने पती-पत्नीमधील प्रेम वाढू लागते आणि घरात शांतता राहते. मात्र कोणताही उपाय करण्यापूर्वी एकदा ज्योतिष किंवा त्यातील तज्ञ लोकांचा सल्ला घेणे लाभदायक असते.
संबंधित बातम्या