जोतिषशास्त्र हे प्रचंड विस्तारित शास्त्र आहे. यामध्ये ग्रह-नक्षत्रांच्या आधारे भविष्याचा अंदाज बांधला जातो. तसेच यामध्ये व्यक्तीची जन्म तारीख, दिवस आणि महिन्याच्या आधारे त्यांचे स्वभावगुण आणि वैशिष्ट्ये सांगण्यात येतात. प्रत्येक व्यक्तीमध्ये कोणते ना कोणते सद्गुण आणि दुर्गुण निश्चितच असते. त्यानुसार त्या व्यक्तीला कार्यक्षेत्रात आणि समाजात ओळख मिळत असते. आज आपण जून महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव नेमका कसा असतो याबाबत जाणून घेणार आहोत. अवघ्या दोन दिवसांनी जून महिना प्रारंभ होणार आहे. तत्पूर्वी या लोकांची वैशिष्ट्ये पाहूया.
जोतिष अभ्यासानुसार जून महिन्यात जन्मलेल्या लोकांची रास प्रामुख्याने मिथुन किंवा कर्क असते. मात्र याला काही अपवादसुद्धा असतात. अंकभविष्यानुसार या लोकांना ६ किंवा ९ हा अंक अतिशय लाभदायक असतो. या अंकांचा वापर दैनंदिन गोष्टींमध्ये केल्यास त्यापासून लाभ मिळत असल्याचे सांगण्यात येते. तसेच या लोकांसाठी काही रंगसुद्धा शुभ समजले जातात. हिरवा, पिवळा आणि मरुन रंगाचा यामध्ये समावेश होतो. या लोकांनी मोती किंवा रुबीची आभूषणे शरिरावर धारण केल्यास शुभ लाभ मिळतात.
जून महिन्यात जन्मलेले लोक अतिशय शिस्तप्रिय आणि विनम्र स्वभावाचे असतात. या लोकांना कोणत्याही कामात गोंधळ गडबड रुचत नाही. योजनाबद्ध काम करायला यांना आवडते. कोणत्याही क्षणी इतरांना मदत करायला हे लोक तत्पर असतात. त्यामुळे त्यांचा गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता असते. समाजात-लोकांमध्ये आपला वेगळा ठसा उमठवण्यात हे लोक यशस्वी होतात. विनम्र स्वभावामुळे लोक यांच्याकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात.
जूनमध्ये जन्मलेल्या लोकांच्या मूडचा अंदाज लावणं थोडसं कठीण असतं. या लोकांचा मूड क्षणार्धात बदलत असतो. या लोकांना पटकन राग येतो. मात्र तितक्याच पटकन हा राग नाहीसा होतो. या लोकांना आपल्या भावना इतरांसमोर व्यक्त करणे पसंत नसते. त्यामुळे सतत ते आपल्या मनात गोष्टी साठवून ठेवतात. हे लोक काहीप्रमाणात हट्टी असतात. खाण्यापिण्याच्या बाबतीत सतत दुर्लक्ष करत असतात.
जून महिन्यातील लोक हुशार आणि जिद्दी असतात. त्यामुळेच शैक्षणिक क्षेत्रात या लोकांना चांगले यश मिळते. हे लोक उच्चशिक्षित असतात. प्रामुख्य्याने या महिन्यातील लोक पत्रकार, डॉक्टर, मॅनेजर किंवा शिक्षक असतात. आपल्या कार्यक्षेत्रात माणसे जोडणे यांना पसंत असते. त्यामुळेच हे लोक सतत चर्चेत असतात.