Anganewadi Jatra 2025: मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची वार्षिक जत्रा यंदा २२ फेब्रुवारी रोजी होत आहे. आंगणेवाडील आंगणे कुटुंबाची ही देवी असली तरी देखील ही जत्रा सर्वांनाच खुली असते. दरवर्षी देवीला कौल लावल्यानंतर जत्रेची तारीख निश्चित केली जाते. त्यासाठी धार्मिक विधीही केला जातो. ही जत्रा दीड दिवस चालते. या जत्रेला सुमारे ५ ते ७ लाख लोक येतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
ही गर्दी विभाजित व्हावी या उद्देशाने मध्य रेल्वे आणि कोंकण रेल्वेवरून आंगणेवाडी यात्रेसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते सावंतवाडी रोड अशा विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत.
या बाबत कोंकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०११२९ विशेष रेल्वेगाडी एलटीटी येथून २१ फेब्रुवारी रोजी रात्री १२.५५ वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे दुपारी १२ वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक ०११३० विशेष रेल्वेगाडी सावंतवाडी रोड येथून २१ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता सुटेल, तर ती लोकमान्य टिळक टर्मिनस येथे सकाळी ६ वाजून १० मिनिटांनी पोहोचेल. या रेल्वेगाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकावर थांबेल. या रेल्वेगाडीला एकूण १९ डबे असणार आहेत.
गाडी क्रमांक ०११३१ ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २२ फेब्रुवारी रोजी रात्री १२.५५ वाजता सुटेल. तर, ती सावंतवाडी रोडला दुपारी १२ वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक ०११३२ सावंतवाडी रोडवरून २२ फेब्रुवारीला संध्याकाळी ६ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे सकाळी ६ वाजून १० मिनिटांनी पोहोचेल.
या गाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांवर थांबेल. या गाडीला एकूण २२ डबे असणार आहेत. सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रे आणि आयआरसीटीसीच्या (IRCTC) संकेतस्थळावरून ९ फेब्रुवारीपासून या रेल्वेगाडीचे आरक्षण प्रवाशांना करता येणार आहे.
संबंधित बातम्या