शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी सरकारचे नेतृत्व उद्धव ठाकरे करतील यावर बैठकीत सहमती झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. तिनही पक्षांच्या संयुक्त बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्रीपदावरुन दुमत नसल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. तिनही पक्षांची बैठक मुंबईतील नेहरु सेंटर येथे पार पडली. या बैठकीत मंत्रिमंडळ कसे असावे, कोणाला किती वाटा असावा यावर चर्चा झाली.
शरद पवार पुढे म्हणाले की, बैठकीत आता विस्तृत कार्यक्रमावर चर्चा सुरु आहे. शनिवारी पत्रकार परिषद घेऊन सर्व माहिती सांगण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
त्याचबरोबर एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगितले. राज्यपालांकडे कधी जायचे हेही उद्याच ठरवले जाईल असे त्यांनी सांगितले.
NCP Chief Sharad Pawar after Shiv Sena-NCP-Congress meeting: Tomorrow a press conference will be held by the three parties.Discussion are continuing. Tomorrow we will also decide when to approach the Governor (file pic) pic.twitter.com/fHfR2Q2GCO
— ANI (@ANI) November 22, 2019
विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना आणि भाजपने आपली ३० वर्षांची युती संपुष्टात आणली होती. अडीच वर्षांचे मुख्यमंत्री मागणाऱ्या शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्यामुळे पाच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळणार आहे.
दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांनी राज्यातील या घडामोडींमुळे आपला दिल्ली दौरा रद्द केला आहे. आपले वैचारिक मतभेद बाजूला ठेऊन एका किमान समान कार्यक्रमावर हे तिनही पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करणार असल्याचे संकेत दिल्यानंतर राज्यपालांनी आपला दौरा रद्द केला असल्याचे बोलले जाते.