उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दोन दिवस निवासस्थानाबाहेर न पडलेल्या अजित पवार यांनी रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास थेट वर्षा निवासस्थान गाठून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ३० नोव्हेंबर रोजी बहुमत चाचणी आणि सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याचे सांगण्यात येते. मुख्यमंत्री कार्यालयाने मात्र अजित पवार यांच्याशी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीविषयी आणि राज्यातील विविध प्रलंबित विषयांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केल्याचे टि्वट करुन सांगितले. फडणवीस यांनी हेच टि्वट रिटि्वट केले आहे.
देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांच्यात 'वर्षा'वर खलबतं
अजित पवारांनी फडणवीस यांची मध्यरात्री भेटून खलबतं केल्याचे वृत्त माध्यमात आली होती. त्यानंतर सीएमओने टि्वट करुन शेतकऱ्यांच्या विषयावर चर्चा केल्याचे सांगितले.
CM @Dev_Fadnavis and DCM @AjitPawarSpeaks today met and discussed on various measures for additional support & assistance to unseasonal rain affected farmers. Tomorrow it will be further discussed with the Chief Secretary & Finance Secretary.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 24, 2019
टि्वटमध्ये म्हटले की, आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अतिरिक्त मदतीसाठी आम्ही विस्तृत चर्चा केली. सोमवारी यावर आम्ही मुख्य सचिव आणि अर्थ सचिवांबरोबरही याविषयावर चर्चा करु.
महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न, 'ऑपरेशन लोटस'ची तयारी?
या बैठकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विनोद तावडे हे देखील उपस्थित होते. यावेळी अजित पवारांनी सत्तास्थापनेसंदर्भातील काही महत्त्वाच्या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीने अजित पवारांची गटनेतेपदावर हकालपट्टी केली असली तरी २७ आमदारांचा गट हा त्यांच्यासोबत असल्याची चर्चा आहे. सध्याच्या घडीला अजित पवारांकडे संख्याबळ दिसत नाही. कारण अजित पवारांसोबत असलेले बहुतेक आमदार हे सध्याच्या घडीला शरद पवारांसोबत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे राजकीय घडामोडी कोणते वळण घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.