पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'धाडसी आणि कठोर निर्णय घेण्याची सरकारमध्ये ताकद'

सरसंघचालक मोहन भागवत

या देशाच्या सरकारमध्ये धाडसी आणि कठोर निर्णय घेण्याची ताकद आहे असं कौतुक सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. नागपूरात संघाच्या दसरा मेळाव्यात ते संघाच्या कार्यकर्त्यांना संबोधीत करत होते.

या देशाच्या सरकारमध्ये धाडसी आणि कठोर निर्णय घेण्याची ताकद आहे कलम ३७० रद्द करून सरकारनं ते दाखवून दिलं आहे. जनतेनं भाजपला मोठ्या संख्येनं निवडून दिलं आहे. जनतेनं पुन्हा भाजपवर विश्वास दाखवला. केंद्रात भाजप सरकार आल्याने देशात काही तरी व्हायला लागले आहे असा विश्वास लोकांना वाटू लागला, असं कौतुक मोदी सरकारचं मोहन भागवत  यांनी मेळाव्यात केलं.

तर दुसरीकडे 'झुंडबळी' हा शब्द चुकीच्या पद्धतीनं प्रचलित करून देशाची प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर त्यांनी टिकास्त्र सोडलं आहे. 'काही घटना या चुकीच्या पद्धतीनं पसरवल्या जात आहेत. मात्र झुंडबळीच्या आडून काही लोक देशाची, हिंदू समाजाची  प्रतिमा मलिन करून काही समाजातील लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. लिंचिंग अर्थात झुंडबळी हा शब्द इथला नाही, तो बाहेरून आला' असं भागवत म्हणाले.

'देशात केवळ एकाच समाजाने दुसऱ्या समाजावर अत्याचार केलेत असेच घडत नाही, तर अन्य समाजातील लोकही इतर समाजावर अत्याचार करतात. एखाद्या समुदायातील ठराविक लोकांवर अत्याचार केले याचा अर्थ संपूर्ण समाजाला जबाबदार धरता येणार नाही. हिंसक घटनेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा काहीएक संबंध नसतो. मात्र अशा गोष्टींसाठी संघाला जबाबदार  धरलं  जातं, हे चुकीचं आहे. संघ अशा घटना रोखण्याचे काम करतो' असंही मोहन भागवत म्हणाले.  

इथल्या लोकांमध्ये वेैचारिक मतभेद नक्कीच आहेत, मात्र कोणत्याही परिस्थिती  कायदे, मुल्यांचं उल्लंघन करू नका. कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घ्या असं आवाहनही त्यांनी मेळाव्यात बोलताना केलं.

भारतातील आर्थिक मंदी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने फार चांगले काम केले आहे. या सरकारने उपाययोजना नक्कीच केल्या आहेत. तेव्हा देशातील आर्थिक मंदीवर सातत्याने चर्चा करणे योग्य ठरणार नाही, असे भागवत म्हणाले. वैश्विक अर्थव्यवस्थेत मंदी आहे. त्याचे सर्वत्र परिणाम दिसून येत आहे. आर्थिक मंदीतून आपण निश्चितपणे बाहेर येणार आहोत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

नागपुरमधील रेशीम बागेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्याला एचसीएलचे संस्थापक आणि अध्यक्ष पद्मभूषण शिव नाडर हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, माजी लष्करप्रमुख व्ही.के.सिंगदेखील उपस्थित होते. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:The move of the reelected regime to nullify Article 370 has once again proved that it has the courage to fulfil those expectations Mohanji Bhagwat on goverment