शिवसेनेने साथ सोडल्यामुळे संख्याबळ नसल्याच्या कारणावरुन भाजपने सत्ता स्थापन करण्यास असमर्थ असल्याची माहिती राज्यपालांना दिली. भाजपच्या या भूमिकेनंतर राज्यपालांना शिवसेनेला सत्ता स्थापन करण्याचे निमंत्रण दिले आहे. भाजपसोबतच्या तणावानंतर राज्याला सेनेचा मुख्यमंत्री देण्यासाठी शिवसेना १४४ चे संख्याबळ कोठून आणणार हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न आहे. भाजप-शिवसेना यांच्यातील वादानंतर शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत सरकार स्थापन करण्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
सत्तास्थापनेसाठी भाजपकडून सेनेला शुभेच्छा!
मात्र, या चर्चा रंगत असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेकडून कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नाही, असे सांगितले होते. एवढेच नाही तर जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिल्याचा उल्लेखही त्यांनी निकालानंतर अनेकवेळा केला. सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने सत्ता स्थापनेमध्ये असमर्थ असल्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने सावध पवित्रा घेतला आहे.
धनुष्याला 'हात'भार लावू नका, संजय निरुपम यांचा काँग्रेसला सल्ला
राष्ट्रवादीचे नेते आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी शिवसेना एनडीएतून बाहेर पडल्यानंतरच त्यांच्यासोबत चर्चा होऊ शकते असे म्हटले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना नवाब मलिक म्हणाले की, शिवसेनेचा कोणताही अधिकृत प्रस्ताव अद्याप आलेला नाही. शिवसेनेसोबत चर्चा करण्यास राष्ट्रावदी तयार होईल. पण त्यासाठी त्यांनी प्रथम केंद्रातील सत्तेतून बाहेर पडायला हवे, अशी अट घातली आहे. शिवसेना केवळ राष्ट्रवादीच्या पाठिंब्यासह सरकार स्थापन करु शकणार नाही तर त्यांना काँग्रेससोबतही मनधरणी करावी लागणार आहे. या राजकीय घडामोडी कशापद्धतीने पुढे सरकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.