पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कलम ३७०चा महाराष्ट्राशी काय संबंध विचारणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे - मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी

फक्त आपल्या कुटुंबाच्या कल्याणाचा विचार करणारे महाराष्ट्राचा जम्मू-काश्मीरशी, कलम ३७०शी काय संबंध असा प्रश्न विचारताहेत. त्यांना याबद्दल लाज वाटली पाहिजे, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर केली. अकोल्यामध्ये बुधवारी सकाळी नरेंद्र मोदींची जाहीर सभा झाली. त्यावेळी त्यांनी कलम ३७० च्या मुद्द्यावरून विरोधकांवर तोफ डागली.

महाराष्ट्रातील निवडणुकीत कलम ३७० चा मुद्दा ऐरणीवर आहे. विरोधकांनी कलम ३७० रद्द करण्याचा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा काय संबंध, असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्याला नरेंद्र मोदी यांनी अकोल्यातील सभेत प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, जम्मू काश्मिरचे लोकही भारतीयच आहेत. सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी संपूर्ण देश जम्मू-काश्मीरसोबत आहे. आपल्या देशाला कोणतीही जखम होऊ नये, म्हणून महाराष्ट्रातील जवान काश्मीरमध्ये सर्वोच्च बलिदान देत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतून आलेल्या या जवानांबद्दल आम्हाला अभिमान आहे. पण आपल्या कुटुंबाच्या कल्याणाचा विचार करणारे महाराष्ट्राचा जम्मू-काश्मीरशी, कलम ३७०शी काय संबंध असा प्रश्न विचारताहेत. असा प्रश्न विचारणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. तुमच्या प्रतिक्रिया संपूर्ण देश ऐकतो आहे. देश तुमच्याकडून उत्तर मागणार आहे हे विसरू नका. मतपेटीच्या याच राजकारणामुळे महाराष्ट्राचे नुकसान झाले आहे, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही भ्रष्ट युती
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही भ्रष्ट युती असल्याचे सांगून नरेंद्र मोदी म्हणाले, या भ्रष्टवादी युतीमुळे महाराष्ट्राचे नुकसान झाले आहे. पूर्वी विदर्भाच्या नावाने केवळ पॅकेज जाहीर व्हायचे. पण सामान्यांना त्यातून काहीच मिळत नव्हते. पण आता केंद्राची मदत थेट लोकांच्या बँक खात्यात जमा होते आहे. पूर्वी विदर्भात १८ तास भारनियमन असायचे. पण गेल्या पाच वर्षांत विजेच्या क्षेत्रात अभूतपूर्व काम झाले आहे. लोकांना आता आवश्यक असणारी वीज मिळू लागली आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रफुल्ल पटेल यांना ईडीने पाठविलेल्या नोटिसीचा थेटपणे उल्लेख न करता नरेंद्र मोदी यांनी विरोधकांचे कोणाशी संबंध होते, हे आता उघड झाले आहे. ज्यांनी देशात रक्ताची होळी खेळली त्यांच्यासोबत यांचे संबंध होते. आता यांची पोलखोल होणार आहे, असे सांगितले. हेच लोक केंद्र सरकारवर, केंद्रीय तपास संस्थांवर टीका करीत होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.