मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील व्यासपीठावरुन अजित पवारांच्याविरोधात आपल्या ढाण्या वाघाला निवडणुकीच्या मैदानात उतरवणार असल्याची घोषणा केली. भाजपमधून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करुन लोकसभा निवडणूक लढवणारे धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्या उपस्थितीत घरवापसी केली. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी गोपीचंद यांना बारामतीच्या मैदानातून उतरवणार असल्याचे संकेत दिले.
गोपीचंद पडळकरांची घरवापसी, काशिराम पवार यांचाही भाजप
बारामती हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. अजित पवार या मतदार संघातून मोठ्या मताधिक्याने निवडून येतात. अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर ते विधानसभा निवडणूक लढवणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र राजीनाम्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर अजित पवारांनी बारामतीतून लढण्याची संकेत दिले आहेत.
गोपीचंद पडळकर यांच्याविषयी मुख्यमंत्री म्हणाले की, गोपिचंद पडळकर हे माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत. आपल्या सर्वांचे आणि माझे लाडके पडळकर पुन्हा घरामध्ये परतल्याचा आनंद होत आहे. त्यांनी खऱ्या अर्थाने धनगर समाजाचे व्रत स्वीकारले. समाजाचे प्रश्न घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी एक ज्योत पेटवली. आपल्यासाठी काही नको जे काही द्यायचे ते माझ्या समाजाला द्या अशी भूमिका घेत त्यांनी आंदोलन केले, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी पडळकर यांचे कौतुक केले.
धनगर समाजाच्या प्रश्नावर त्यांच्याशी चर्चा करताना अदिवासी समाजाला ज्या २२ योजना लागू आहेत त्या योजना सरकारने धनगर समाजालाही लागू केल्या. धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा हा कोर्टाचा विषय आहे. त्यासाठी आवश्यक त्या गोष्टी सरकारने केल्या आहेत, असेही फडणवीसांनी सांगितले. हा प्रश्न कोर्टाच्या सुनावणीत हा आरक्षणाच्या मुदा निकाली लागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
नमिता मुंदडांचा राष्ट्रवादीला रामराम; भाजपमध्ये केला प्रवेश
ते पुढे म्हणाले की, पडळकरांनी लोकसभेत वंचितकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तेव्हा खूप दु:ख झाले होते. त्यांचा मन वळवण्याचा प्रयत्नही केला. पण समाजाची इच्छा असल्याचे सांगत त्यांनी वचिंतच्या तिकीटावर निवडणूक लढवली. लोकसभेच्या या निवडणुकीत ४ लाख मते घेत त्यांनी आपल्यातील ताकद दाखवून दिली. समाजाच्या विकास करायचा असेल तर विरोधी पक्षात राहून उपयोग नाही तर यासाठी मुख्य प्रवाहात यायला हवे. विरोधात राहून तुम्ही आंदोलन कराल पण आम्ही तुमच्या बाजूने निर्णय घ्यायला तयार आहोत तर तुम्ही बाहेर राहण्याचे कारण नाही, असे पडळकरांना समजावून सांगितले. त्यानंतर अखेर त्यांनी भाजपमध्ये पुन्हा घरवापसी केली, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.