काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षांनी राज्यात एकत्रित सत्तास्थापन करण्याच्या दृष्टिने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी प्रसारमाध्यमांसमोर संयुक्त पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये सुरु असलेल्या बैठकींच्या सत्रामध्ये गुरुवारी पहिल्यांदाच शिवसेनेचे नेते बैठकीमध्ये सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.
मुंबईत झालेल्या बैठकीनंतर शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे म्हणाले की, एकसूत्री कार्यक्रमासंदर्भात तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी निवडलेल्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. एकसूत्री कार्यक्रमासंदर्भातील मसुदा सर्व नेत्यांनी एकमताने तयार केला आहे. हा मसुदा तिन्ही पक्षप्रमुखांना पाठवण्यात येणार आहे.
भाजप आमदारांची मुंबईत बैठक, या प्रमुख मुद्यांवर होणार चर्चा
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, एकसूत्री कार्यक्रमाचा आराखडा तयार करण्यासाठी काही जणांना चर्चेमध्ये भाग घेण्यासाठी नियुक्त करण्यात आले होते. काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये गेल्या दोन दिवसांपासून चर्चा सुरु होती. यावेळी शिवसेनेच्या नेत्यांच्या सहभागाने आम्ही अंतिम मसुदा तयार केला आहे. हा मसुदा पक्षश्रष्ठींकडे पाठवण्यात येईल. यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश आहे हे सध्याच्या घडीला सांगता येणार नाही. कारण याचा अंतिम निर्णय हा पक्ष श्रेष्ठींच्या हाती आहे. त्यांनी हिरवा कंदील दिल्यानंतर यातील मुद्दे स्पष्ट करु. पक्ष श्रेष्ठींनी बदल सुचवले तर याबाबतही विचार केला जाईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
राफेल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने नवे दरवाजे उघडले : राहुल गांधी
तिन्ही पक्षातील प्रमुख यासंदर्भात योग्य तो निर्णय घेतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, किमान समान कार्यक्रमाबाबत तिन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे. आम्हाला फक्त सरकार स्थापन करायचे नाही तर सरकार चालवायचे आहे. लवकरच याबाबतीत सर्व चित्र स्पष्ट होईल.