शिवसेनेने साथ सोडल्यानंतर अनपेक्षितपणे अजित पवारांच्या साथीने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या देवेंद्र फडणवीसांवर राजीनामा देण्याची नामुष्की ओढावली. मुंबईत पत्रकार परिषदेत बोलवून त्यांनी याबाबत माहिती दिली. अजित पवार यांनी वैयक्तिक कारणास्तव आमच्यासोबत येण्यास नकार दिल्याने आम्ही बहुमत सिद्ध करु शकत नाही, असे फडणवीसांनी सांगितले.
सत्तास्थापन करणाऱ्यांना शुभेच्छा! फडणवीसांचा राजीनामा
यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली. शिवसेनेचे नेते सोनियाजींच्या (काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी) नेतृत्वाखाली शपथ घेताना दिसले. सत्तेसाठी शिवसेना लाचार झाली आहे. त्यांची लाचारी त्यांना लखलाभ! अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.
अजित पवारांचा उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांनी एकत्रितपणे स्थापन केलेले सरकार हे आपल्याच ओझ्याखाली दबले जाईल, असेही फडणवीस यावेळी म्हणाले. यापक्षांच्या विचारसणीत मतभेद आहेत. भाजपला दूर ठेवणं हाच त्यांचा 'कॉमन मॅक्सिमम प्रोग्राम' आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.