पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विधानसभा निवडणूक : मतमोजणीबद्दलची सर्व माहिती एका क्लीकवर

विधानभवन

गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात आला आहे. गेल्या सोमवारी राज्यातील सर्व मतदारसंघात मतदान पूर्ण झाले आहे. राज्यात यावेळी सरासरी ६१ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. आता सर्वांचे लक्ष मतमोजणीकडे म्हणजे निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल आणि त्यानंतरच्या सर्व प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती खाली दिली आहे.

 

विधानसभा निवडणुकीचा निकाल कधी?

 

महाराष्ट्रात सोमवारी, २१ ऑक्टोबर २०१९ रोजी झालेल्या मतदानानंतर विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरुवार, २४ ऑक्टोबर २०१९ रोजी जाहीर होणार आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान झाले होते. या सर्व ठिकाणचा निकाल गुरुवारी जाहीर होणार आहे.

 

विधानसभा निवडणुकीची मतमोजणी किती वाजता सुरू होईल?


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी, २४ ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी ८ वाजता सुरू होईल. 

 

 

विधानसभा निवडणुकीचा निकाल किती वाजता लागेल? 


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल दुपारी १२ ते २ च्या दरम्यान पूर्णपणे जाहीर झालेला असेल. मतमोजणीच्या सर्व फेऱ्या जाहीर झाल्यानंतर संबंधित मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून निकाल जाहीर केला जातो. सर्वसाधारणपणे विधानसभा निवडणुकीचा निकाल १२ नंतर लागण्यास स्पष्ट होईल.

 

 

विधानसभा निवडणुकीचा पहिला कल कधी समजेल?


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा पहिला कल साधारणपणे गुरुवारी, २४ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास कळण्याची शक्यता आहे. काही मतदारसंघातीलच कल यावेळी कळू शकतील. नंतर हळूहळू चित्र स्पष्ट होत जाईल.

 

 

विधानसभा निवडणुकीचा निकाल कुठे पाहता येईल?


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल तुम्हाला हिंदुस्थान टाइम्स समुहातील www.htmarathi.com या वेबसाईटवर मराठीमध्ये पाहता येईल. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे लाईव्ह कव्हरेज, विश्लेषण तुम्हाला इथे वाचता येईल. त्याचबरोबर विविध वृत्तवाहिन्यांवर तुम्हाला मतमोजणीचे कल आणि अंतिम निकाल बघता येईल. 

 

 

सत्तास्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक आहेत?


महाराष्ट्र विधानसभेत एकूण २८८ जागा आहेत. कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला सत्ता स्थापन करण्यासाठी विधानसभेत बहुमत असणे आवश्यक असते. त्यामुळे विधानसभेत ज्या पक्षाला किंवा आघाडीला १४५ किंवा त्यापेक्षा जास्त जागा मिळतील. तो पक्ष सत्ता स्थापनेचा दावा करू शकतो किंवा अशा पक्षाच्या विधीमंडळ गटाच्या नेत्याला राज्यपाल सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रित करू शकतात. 

 

 

मुख्यमंत्री कसा निवडला जातो?


आपल्या देशात संसदीय लोकशाही आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ किंवा कार्यकारी मंडळ हे विधानसभेला जबाबदार असते. विधानसभेत त्यांच्याकडे बहुमत असणे आवश्यक असते. निवडणुकीनंतर विधानसभेत ज्या पक्षाकडे बहुमत असते. अशा पक्षाच्या विधीमंडळ गटाची बैठक आयोजित केली जाते. या बैठकीत विधीमंडळ पक्षाचा नेता निवडला जातो. हीच व्यक्ती मुख्यमंत्री म्हणून शपथ घेते. हीच व्यक्ती त्याच्या मंत्रिमंडळात कोणकोण असेल हे निश्चित करीत असते. 

 

 

मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी कधी होईल?


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी, २४ ऑक्टोबर रोजी दुपारपर्यंत जाहीर होईल. त्यानंतर राज्यातील राजकीय चित्र स्पष्ट होईल. कोणत्या पक्षाला किंवा आघाडीला बहुमत मिळाले आहे हे सुद्धा स्पष्ट होईल. शुक्रवारपासून दिवाळीचा सण सुरू होतो आहे. त्यामुळे लगेचच सत्ता स्थापनेसाठी विजयी पक्ष किंवा आघाडीकडून दावा केला जाणार नाही. दिवाळी झाल्यावर म्हणजे २९ ऑक्टोबरनंतर राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल. त्यानंतर शपथविधीचा दिवस निश्चित केला जाईल. महाराष्ट्राच्या सध्याच्या विधानसभेची मुदत ४ नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळे त्यापूर्वी नवी विधानसभा अस्तित्त्वात येणे आवश्यक आहे. त्यासाठी मंत्रिमंडळ अस्तित्त्वात येणे आवश्यक आहे. शपथविधी झाल्यानंतरच नवे मंत्रिमंडळ विधीमंडळाचे अधिवेशन बोलावते. त्यामध्ये विधानसभेच्या सर्व नव्या सदस्यांना शपथही दिली जाते.

 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 when counting begins and first result declare all information