पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सत्ताधाऱ्यांची मस्ती उतरवण्यासाठी खंबीर विरोधी पक्षाची गरज: राज ठाकरे

राज ठाकरे

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मागाठाणे येथील आपल्या जाहीर सभेत शिवसेना, भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. काँग्रेसच्या काळात होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या आम्ही थांबवू असे म्हणत हे सरकार सत्तेवर आले आणि यांच्या पाच वर्षांच्या काळात तब्बल १४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. या सरकारच्या बेबंदशाही कारभाराला रोखण्यासाठी खंबीर विरोधी पक्षाची गरज आहे. त्यामुळे मी अत्यंत विचारपूर्वक विरोधी पक्षाची भूमिका पार पाडण्याचे ठरवले. सत्ताधाऱ्यांची मस्ती उतरवण्यासाठी प्रबळ आणि खंबीर विरोधी पक्षाची गरज आहे. यांना कोणीतरी प्रश्न विचारणारा हवा. यांच्याशी कोणीतरी भांडणारा हवा. राज्याप्रमाणे केंद्रातही सक्षम विरोधी पक्षाची उणीव असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले.  

शिरुरमध्ये अमित शहांचा रोड शो, प्रचंड गर्दी

कामांवर मते मिळणार नाही, याची भाजपला माहिती आहे. त्यामुळे ते भावनेला हात घालतात. अमित शहा, नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येतात. पण त्यांना महाराष्ट्राच्या प्रश्नावर बोलण्याची हिंमत आहे का, तुमचे सरकार बहुमताने सत्तेवर आले आहे. मग उद्योगधंदे कसे बंद पडताहेत, असा सवाल करत यांच्याकाळात उद्योगधंदे, शहरे बरबाद झाली असल्याचे ते म्हणाले. 

पीएमसी बँकेवरुन त्यांनी भाजपवर कडाडून हल्ला केला. पीएमसी बँकेवर भाजपचे मुलुंडचे आमदार तारासिंग यांचा मुलगा आहे. तुमच्या हक्काचे पैसे या बँकेत ठेवले आता बँक बुडाली तर त्यांनी हात वर केले आहेत. सरकार म्हणते आमचा या बँकेशी काही संबंध नाही. रिझर्व्ह बँक म्हणते आमचा काही संबंध नाही. मग बँकेला कोणी परवानगी दिली. सरकार, आरबीआय जबाबदारी का घेत नाही.

'PMC बँक घोटाळ्यात कुणाचे नातेवाईक? मोदींनी उत्तर द्यावे'

यावेळी त्यांनी शिवसेनेवरही टीकेची तोफ डागली. यांचे खिशातले राजीनामे मागील ५ वर्षांत बाहेर निघाले नाही. कुठलेही पैशाचे काम अडले आणि सरकार ते करत नाही म्हटले की ते राजीनाम्याची धमकी देत. पुन्हा सरकार त्यांचे काम करत नाही म्हटले की ते राजीनाम्याची धमकी देत. त्यांच्या जाहीरनाम्यात आरेबाबत एकही वाक्य नाही. नवीन उद्योगधंदे आणू असे म्हणतात. पण कसे आणायचे ते सांगत नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला. मनसेने एकही आंदोलन अर्धवट सोडलेले नाही, हे त्यांनी निक्षून सांगितले. यावेळी त्यांनी बुलेट ट्रेन, छत्रपती शिवाजी स्मारक आदी विषयांवरही भाष्य केले.

पिंपरी-चिंचवडमध्ये पंकजा मुंडेंच्या सभेत गोंधळ