महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार शनिवारी सांयकाळी संपुष्टात आला. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या. आता मतदारांना मतदानाचे वेध लागले आहेत. वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली व्यक्ती मतदान करण्यास पात्र ठरते. त्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. मतदान यादीत नाव असलेला व्यक्ती मतदानास पात्र आहे. परंतु, अनेकांना आपले नाव मतदार यादीत शोधता येत नाही किंवा त्याची माहिती नसते. त्यामुळे अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागते. केवळ या कारणामुळे मतदानापासून मतदार वंचित राहू नये म्हणून निवडणूक आयोगाने अत्यंत सोपी प्रक्रिया मतदारांसाठी उपलब्ध करुन दिली आहे.
Maharashtra Assembly Election 2019: ५ सोप्या प्रक्रियेच्या मदतीने मतदार यादीत आपले नाव आणि मतदान केंद्र शोधूयात..
१. मुख्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्रच्या वेबसाइटवर जा
https://ceo.maharashtra.gov.in/
२. तिथे आपले नाव टाकून मतदार यादीतील नाव शोधा यावर क्लिक करा (Search your Name in Final Electoral Roll 2019) यावर क्लिक केल्यानंतर एक दुसरी विंडो उघडेल.
३. तिथे वरच्या बाजूला नावाने किंवा ओळखपत्राच्या माध्यमातून नाव शोधण्याचा पर्याय आहे. त्यापैकी एकाला क्लिक करावे.
किंवा
जिल्हा किंवा मतदारसंघ माहीत असेल तर तो पर्याय क्लिक करावा.
४. त्यानंतर खाली दिलेल्या पर्यायावर क्लिक करुन आवश्यक ती माहिती भरावी
* जिल्हा/मतदारसंघाचे नाव
* पहिले नाव
* शेवटचे नाव / आडनाव
* मधले नाव
* एक गणितीय प्रश्न असेल जो प्रत्येकाला वेगळा असेल. त्याचे उत्तर द्यायचे.
५. त्यानंतर सर्च (Search) वर क्लिक करावे.

ही प्रक्रिया पार पडल्यानंतर तुमचे नाव आणि मतदान केंद्राची सर्व माहिती समोर स्क्रीनवर येईल.
दरम्यान, महाराष्ट्रात एकाच ट्प्प्यात २१ ऑक्टोबरला मतदान होत आहे. त्यानंतर ३ दिवसांनी २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातच प्रमुख लढत आहे.
राज्यातील २८८ जागांसाठी राज्यभरातून ३२३७ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. राज्यात ९६,६६१ मतदान केंद्र आहेत. एकूण ८.९ कोटी मतदार असून त्यापैकी ४.६ कोटी पुरुष तर ४.२ कोटी महिला मतदार आहेत. २६३४ तृतीयपंथी मतदार आहेत.