भाजपच्या विधीमंडळ नेतेपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली. प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह ११ आमदारांनी अनुमोदन दिले. यात राधाकृष्ण विखे पाटील, शिवेंद्रराजे, देवयानी फरांदे, हरिभाऊ बागडे, गणेश नाईक, सुरेश खाडे, मंगलप्रभात लोढा आदींनी अनुमोदन दिले. मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागणे जवळपास निश्चित झाले आहे.
Devendra Fadnavis elected as the leader of Maharashtra BJP legislative party. (file pic) pic.twitter.com/5ePWDI5kho
— ANI (@ANI) October 30, 2019
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांत काहीही येत असले तरी पुन्हा एकदा महायुतीचेच सरकार येईल, असे ठामपणे सांगितले. मित्रपक्षांच्या सहकार्यानेच महायुतीला मोठे यश मिळाले आहे. त्यासाठी शिवसेना, रयत क्रांतीकारी संघटना, रिपाइंचे आभार मानले. तसेच यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विशेष आभार मानले.
गेल्या पाच वर्षांत मोठे काम करण्याची संधी मिळाली. येत्या काळात छत्रपती शिवरायांच्या विचारांचे राज्य करु. पुढचे पाच वर्षें स्थिर सरकार राहणार असल्याचे ते म्हणाले. मागील कार्यकाळात प्रत्येक समाजाच्या अपेक्षा पूर्ण केल्या. आता सत्ता स्थापनेनंतर राहिलेली कामे पूर्ण करणार आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या मर्यादेत काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्यांना मदत करायची आहे हे त्यांनी आपल्या भाषणात आवर्जुन सांगितले.
यावेळी भाजपचे केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि पक्षाचे उपाध्यक्ष अविनाश राय खन्ना यांनी आमदारांच्या बैठकीसाठी केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून उपस्थित होते. तसेच पक्षाच्या महाराष्ट्र प्रभारी सरोजसिंह यांचीही उपस्थिती होती.