एखादा पक्ष, त्याच्यासोबत येणारं राजकारण, केलं जाणारं समाजकारण, या माध्यमातून होणारी देशाची सेवा असाच काहीसा प्रघात आहे. यामध्ये स्वार्थास कुठेच थारा असू नये, असं अपेक्षित आहे. पण त्याशिवाय मनुष्य प्राण्याचं काहीच चालू शकत नाही. निस्वार्थी सेवा, देशप्रेम हे फक्त साहित्यात वाचण्यास मिळणारे शब्द आहेत, असंच आता युवा पिढीस सांगावे लागेल, अशी भिती वाटते. निवडणुका लागल्या आणि हा स्वार्थ भाव जिकडे-तिकडे पाहावयास मिळायला सुरुवात झाली. तुम्हीही पाहिला असेल. पक्षांतर ही तर एक सर्वमान्य बाब झाली आहे. इकडे मान-मरातब नाही मिळाला की सोडा पक्ष, सोडा त्यांची तत्वे ! असंही तत्वांशी एकनिष्ठ राहावयास कुणास जमते अलिकडे ? असंच चित्र पाहायला मिळतं. हल्ली अजूनही आशावाद कायम आहे. निवडणुकांमध्ये चित्र बदलत आहे. राजकीय वारसा नसलेली मंडळी निवडणुकांमध्ये सहभागी होत आहेत, नवं नेतृत्व (वारसा नसलेले) पुढे येत आहे, त्यास उमलण्याची संधी आपणच द्यायला हवी नाही का?
BLOG: कायदा सोडून बोला- ही मानसिकता होत आहे का?
२०१९ मध्ये भाजपास मिळालेल्या यशामुळे अनेक दिग्गज नेत्यांची, कार्यकर्त्यांची अडचण झाली. अनेक वर्ष सत्ता उपभोगल्यानंतर एकाएकी सत्तेपासून वंचित राहणे आणि निभावणे शक्य होत नाही, असेच पाहायला मिळाले. त्यामुळे पक्षांतर सुरु झाले-इनकमिंग, आउट गोइंग (ज्यांना स्वबळ तपासण्याची खुमखुमी होती असे काही दिग्गज) देखील झाले. पण हे चित्र सामान्य नागरिक म्हणून पाहवत नव्हते. सत्तेसाठीच केला होता का यांनी अट्टाहास असा प्रश्न वारंवार मनात येत होता. जनतेचे प्रश्न आजही तेच आहेत, पण राजकीय पक्ष मात्र सुशिक्षित बेरोजगारांना मासिक भत्ता देवू (फुकट खाण्याची सवय लावू), सात-बारा कोरा करणे (आणखी किती वर्ष ही घोषणा ऐकायला मिळणार आहे?, कुणाच्या पैशातून हे शक्य होणार आहे? शेतकऱ्यास सक्षम बनविण्याचा निर्धार कुणीच करणार नाही का?), रोजगार निर्मिती करू, रस्ते करू, वीज देवू अशा घोषणा राजकीय पक्ष करतात. हे सगळं क्लेशदायक आहे (अनेक वर्ष हीच आश्वासने मिळाल्याने). जनतेस काय हवे आहे याची जाण कुणालाच नाही !! याचं आश्चर्य वाटतं. महाराष्ट्रात अनेक दिग्गज मंडळी आहेत, अनेक अनुभवी आहेत ज्यांनी महाराष्ट्र घडविण्याचं कार्य केलं. त्यांच्या कडून काही गोष्टी राहिल्या असतील त्या पूर्णत्वास नेणे हेतू कार्य करणारी मंडळी पुढे येत असतील, तर त्यांना संधी मिळाली पाहिजे. एखाद्या मतदार संघात फक्त निवडून येणे हा निकष अलीकडे महत्वाचा मानला जातो. या ऐवजी मतदार संघातील प्रश्न सोडविण्याचं कसबं, प्रश्नांची जाण महत्वाचं नाही काय? यावर एक मतदार म्हणून आपण व्यक्त होणार आहोत का? शासकीय कार्यालयात अनेक पदे रिक्त आहेत, मग ती राज्य सरकारची असोत अथवा केंद्र सरकारची, बँका असोत तेथील पदे कधी भरायची? जाहिरात निघाली तर आरक्षण या मुद्द्यावर घोड अडतं. पण त्यामुळे पदं रिक्त राहतात आणि याचा परिणाम सेवेवर होतो, हे कधी लक्षात येणार. त्यामुळे योग्य उमेदवार जे सामान्य नागरिकाच्या इच्छा अपेक्षांचं सरकार तयार करू शकतील अशांना निवडून देणे ही आजची गरज आहे.
BLOG: निवडणुकांचा काळ सुखाचा
निवडणूक अर्ज भरताना दिलेले विवरण त्यात राजकारणी मंडळींची आर्थिक स्थिती सगळं काही सांगून जाते. नेते तुपाशी आणि जनता उपाशी ! वयाची चाळीशी आली तरी सामान्य नागरिकाची मासिक उत्पन्नामध्ये बदल घडत नाहीत. आकड्या पुढील शून्य वाढत नाहीत आणि राजकारणी वारसदारांची आकडेवारी मात्र सामान्यांच्या लक्षात न-येण्यासारखी !! स्वातंत्र्यानंतर ७२ वर्षांनी आपल्याला बेरोजगारी, गरिबी, मुलभूत गरजांची वानवा, शेतकरी सात-बारा कोरा हेच विषय निवडणुकां मध्ये येणार असतील तर आता बदल घडवायची वेळ आलेली आहे असंच म्हणावं लागेल.
विधानसभा निवडणूक २०१९: ये जो पब्लिक है, यह सब जानती है..
या वेळी एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून आपली भूमिका खूप महत्वाची आहे, हे विसरता कामा नये. या निवडणुकीत २१ ऑक्टोबर रोजी कोणतीही सबब न सांगता मतदानास बाहेर पडा आणि सुयोग्य मतदारास तुमचे अमुल्य मत द्या, तुमचे कर्तव्य पार पाडा. तुमचं मत ताकद आहे, ती ओळखा आणि लोकशाही मजबूत करा.
BLOG : शतकातील महानायक- अमिताभ बच्चन
- अमित बाळकृष्ण कामतकर
सोलापूर
kamatkar.amit@gmail.com