पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Maharashtra Assembly Election 2019 : मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज

राज्यभरात आज विधानसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी आज २१ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत. लोकशाहीच्या या महाउत्सवाच्या तयारीवर एक नजर...

महाराष्ट्रात पुरुष, महिला, तृतीयपंथी, दिव्यांग असे एकूण ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार असून यात पुरुष मतदारांची संख्या ही सर्वाधिक ४ कोटी ६८ लाख ७५ हजार ७५० इतकी आहे. तर ४ कोटी २८ लाक ४३ हजार ६३५ महिला मतदारांचा समावेश आहे. तृतीयपंथी मतदाराचां आकडा हा २ हजार ६३४ इतका असून ३ लाख ९६ हजार दिव्यांग मतदार आणि १ लाख १७ हजार ५८१ सर्व्हिस मतदार आहेत.  

मतदार जनजागृती
आतापर्यंत २०.८ लाख नागरिकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यापैकी १४.४० लाख मतदारांनी या यंत्रावर प्रत्यक्ष मतदानाची तालीम घेतली.
मतदार जागृतीच्या मोहिमेत ‘सदिच्छादूत’ म्हणून अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, अभिनेत्री माधुरी दीक्षित, अभिनेते प्रशांत दामले, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, डॉ.निशिगंधा वाड, अभिनेत्री उषा जाधव, महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना, महिला धावपटू ललिता बाबर, अर्जुन पुरस्कार सन्मानित जलतरणपटू वीरधवल खाडे, नेमबाज राही सरनोबत, तृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत, दिव्यांग कार्यकर्ता नीलेश सिंगीत यांचा समावेश होता.

विधानसभा निवडणूक २०१९: असे शोधा मतदार यादीत नाव, मतदान केंद्र

मतदान केंद्रे 
यंदाची विधानसभा निवडणूक ९६ हजार ६६१ मतदान केंद्रावर पार पडणार आहे. याची ९५ हजार ४७३ मुख्य मतदान केंद्र आणि १ हजार १८८ अशी वर्गवारी करण्यात आली आहे. खास महिलांसाठी, महिलांकडून संनियंत्रण करणारी आणि व्यवस्थापनावर भर देणारी ३५२ ‘सखी मतदान केंद्रे’ स्थापन करण्यात आली आहेत.

मतदारांसाठी सोई-सुविधा
किमान अत्यावश्यक सुविधांमध्ये पिण्याचे पाणी, विद्युत पुरवठा, प्रकाश योजना, ब्रेल भाषेतील मतपत्रिका, शौचालय, दिव्यांग मित्र आदी सर्व किमान सुविधा पुरविण्यात येणार आहे. दिव्यांग मतदारांना मतदार नोंदणी करणे, मतदान केंद्राचा शोध घेणे, व्हिलचेअरची मागणी नोंदविणे यासाठी PwD ॲपची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सर्व मतदान केंद्रांवर दिव्यांग तसेच वयोवृद्ध मतदारांकरिता व्हील चेअर व रॅम्पची व्यवस्था असेल. अंध मतदारांच्या सोयीकरिता मतदान केंद्रांवरील सूचनाफलक आणि मतदार यादी, ब्रेल लिपीमध्ये तयार करण्यात आली आहे. मतदान यंत्रावर ब्रेल लिपी मुद्रीत केली असल्याने त्यांना कोणाच्याही मदतीखेरीज मतदान करता येणे शक्य होईल. लहान मुलासह मतदानास येणाऱ्या महिला मतदारांच्या मुलांकरिता पाळणाघराची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांना सोईचे व्हावे, म्हणून पहिल्या अथवा दुसऱ्या मजल्यावरील सुमारे ५ हजार ४००  मतदान केंद्रे तळमजल्यावर स्थलांतरीत करण्यात आली आहेत.  पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावर असलेल्या मतदान केंद्रासाठी लिप्टची सुविधा असेल. 

मतदानाला जाताय.. मग यापैकी एक ओळखपत्र जवळ ठेवाच

यंत्रणा सज्ज
विधानसभा निवडणुकीसाठी  १ लाख ७९ हजार ८९५ मतदान यंत्र (बॅलेट युनिट)  आणि १ लाख २६ हजार ५०५ नियंत्रण युनिट (कंट्रोल युनिट) तर सुमारे एक लाख ३५ हजार २१ व्हीव्हीपॅट  (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट्रेल) यंत्रे पुरवण्यात आली असून त्यात राखीव यंत्रांचा देखील समावेश आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सुमारे ६.५० लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे.
 आचारसंहितेसंबंधात तक्रारी करण्यासाठी सी-व्हिजील ॲपची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट वाहतुक करणाऱ्या वाहनांच्या नियंत्रणाकरिता जीपीएस ट्रॅकिंग अॅप GPS Tracking App मतदारांच्या मदतीसाठी ‘व्होटर हेल्पलाईन-१९५० ’ या क्रमांकावर एसएमएस करून मतदारांना माहिती मिळवता येईल.