पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रचार संपला, उमेदवारांची धाकधूक वाढली

विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार संपला

विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात सर्वच राजकीय पक्षांचा सुरू असलेला प्रचार आज सांयकाळी सहा वाजता संपुष्टात आला. येत्या सोमवारी, २१ ऑक्टोबर रोजी राज्यात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून प्रचारसभा, बाईक रॅली, पदयात्रा, सोशल मीडिया या सर्वच माध्यमातून राजकीय नेत्यांनी आणि उमेदवारांनी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. आता मतदारांना आपला निर्णय घेऊन सोमवारी मतदान करायचे आहे. प्रचार संपण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राज्यात विविध ठिकाणी दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा सुरु होत्या. सहा वाजण्यास काही क्षण बाकी असताना प्रचार सभा आवरत्या घेण्यात आल्या.

'अरे ला कारे' म्हणण्याची धमक ठेवा, राज ठाकरेंचे आवाहन

बारामतीमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची सभा झाली. तर ठाण्यात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी अविनाश जाधव यांच्यासाठी सभा घेतली. दुसरीकडे भाजपच्या नेत्या परळी मतदारसंघाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना भाषणानंतर भोवळ आली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आल्याचे बोलले जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना खराब हवामानाचा फटका बसला. त्यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिग करावे लागले. त्यामुळे त्यांना कर्जत-जामखेडची सभाही रद्द करावा लागली.

राज्यातील लढत प्रामुख्याने भाजप-शिवसेना युती विरूद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी यांच्यामध्ये होते आहे. त्याचवेळी वंचित बहुजन आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन पक्ष कशी कामगिरी करतात हे पाहणे सुद्धा उत्सुकतेचे असणार आहे. विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण तापले होते. उमेदवारी कोणाला मिळणार, कोणाचे तिकीट कापले जाणार याची चर्चा सुरू झाली होती. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनेकांनी पक्षाच्या आदेशाविरोधात बंडखोरी केली. यापैकी काही बंडखोरांनी पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर आपल्या तलवारी म्यानही केल्या. तर अनेकांनी आपले बंड कायम ठेवले.

प्रचारामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ जाहीर सभा घेतल्या. यामध्ये त्यांनी सातारा, पुणे, परळी, मुंबई या ठिकाणी घेतलेल्या सभा गाजल्या. तर दुसरीकडे भरपावसात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी संध्याकाळी साताऱ्यात घेतलेली सभा अनेकांच्या मनात घर करून गेली. वयाच्या ८० वर्षी शरद पवार यांनी घेतलेल्या या सभेची चर्चा सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात रंगली. शरद पवार यांनीही गेल्या दोन आठवड्यात राज्यात झंझावती प्रचार दौरा केला.