पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जयपूर मंथन! काँग्रेसचा सेनेला थेट पाठिंबा मिळणार?

काँग्रेस शिवसेनेला थेट पाठिंबा देणार

राजस्थान येथील जयपूरमध्ये वास्तव्यास असलेल्या काँग्रेस आमदारांकडून शिवसेनेला उघड पाठिंबा देण्यासंदर्भातील हालचाली सुरु आहेत. राज्यपालांकडून सत्ता स्थापनेचे निमंत्रण मिळाल्यानंतर शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटातील हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेकडून अधिकृत प्रस्ताव येण्यापूर्वीच जयूपरमधील हॉटेलामध्ये असलेल्या काँग्रेस आमदारांकडून पाठिंब्यासंदर्भात लेखी पत्रावर सह्या घेण्यात येत असल्याचे वृत्त आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जून खर्गे नवनिर्वाचित आमदारांसोबतच्या चर्चेनंतर सोमवारी पहाटे जयपूरहून दिल्लीच्या दिशेने रवाना होणार आहेत. शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात ते काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधीशी चर्चा करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. 

सत्ता संघर्ष: राज्यपालांकडून सेनेला निमंत्रण, पण...

'एबीपी माझा' या वृत्तवाहिनेशी बोलताना काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ता सचिन सावंत यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. राज्यात निर्माण झालेल्या सत्ता समिकरणातील प्रक्रियेचा भाग म्हणून या सर्व घडामोडी सुरु आहेत. अधिकृतरित्या यासंदर्भात कोणतीही भूमिका काँग्रेसने घेतली नसून अंतिम निर्णय हा हायकमांडच्या हाती असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीप्रमाणेच काँग्रेसही शिवसेनेला पाठिंबा देण्यापूर्वी एनडीएतून बाहेर पडण्यासंदर्भात अट घालू शकते, असेही बोलले जात आहे. काँग्रेसने पाठिंबा दिला तर तो बाहेरुन असेल अशी चर्चा यापूर्वी रंगली होती. मात्र, राज्यातील सद्यस्थिती पाहता काँग्रेस शिवसेनेला थेट पाठिंबा देण्याबाबत विचार करत असल्याचे चित्र आहे. 

..तरच शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये चर्चा होऊ शकते : नवाब मलिक

दुसरीकडे सत्ता स्थापनेचे निमंत्रण मिळाल्यानंतर शिवसेनेने रात्री उशीराने मातोश्रीवर खास बैठक घेतली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासर आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे अन्य दिग्गज नेते या बैठकीला उपस्थित होते. सत्ता  राज्यपालांच्या भेटीसाठी तयार रहा, असे आदेश मालाड येथील हॉटेलमध्ये असलेल्या शिवसेनेच्या आमदारांना देण्यात आल्याचे वृत्त आहे. सत्तास्थापनेचा तिढा सुटण्यासंदर्भात सोमवारचा दिवसातील घडामोडी कितपत यशस्वी ठरणार याकडे राज्याचे लक्ष लागून आहे.