काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या बैठकींमध्ये सत्तास्थापनेसंदर्भात एकमत झाले आहे. उद्या मुंबईमध्ये आघाडीचे नेते शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा करतील. आमच्यामध्ये झालेल्या चर्चेची संपूर्ण माहिती शिवसेनेला दिल्यानंतर मुंबईत सत्तास्थापनेच्या फॉर्म्युला आणि इतर मुद्यांसंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात येईल, अशी माहिती काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.
असा असेल सत्तास्थापनेसाठीचा गुलदस्त्यातील फॉर्म्युला!
दिल्लीतील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये झालेल्या दुसऱ्या बैठकीनंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी सत्तास्थापनेबद्दल दावा कधी करणार? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. यावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, खातेवाटप आणि मुख्यमंत्री तसेच आम्ही कोणत्या मुद्याच्या आधारावर एकत्र आलो याची सविस्तर माहिती शिवसेनेसोबत चर्चा केल्यानंतरच देऊ. दिल्लीतील बैठकींचे सत्र संपले असून सर्व नेते मुंबईला रवाना होणार आहेत. दोन दिवस आमची ज्या प्रमुख आणि महत्त्वपूर्म मुद्यांवर चर्चा झाली त्याची माहिती शिवसेनेला देण्यात येईल. याशिवाय आमच्यासोबत असलेल्या मित्रपक्षांनाही विश्वासात घेतले जाईल, असेही ते म्हणाले.
उपमुख्यमंत्रीपदासाठी बाळासाहेब थोरातांचे नाव आघाडीवर?
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जवळपास तीन आठवडे सत्तास्थापनेचा मोठा तिढा निर्माण झाला होता. दिल्ली दरबारातील आघाडीच्या बैठकीनंतर राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष मिळून सत्तास्थापन करणार असल्याचे अखेर पक्के झाले आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीतील नेत्यांच्या शिवसेनेच्या नेत्यांसोबत शुक्रवारी होणाऱ्या बैठकीनंतर उरला सुरले प्रश्न सुटतील आणि राज्यातील राष्ट्रपती राजवट संपूष्टात येईल, याचे संकेतच पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्लीतील बैठकीनंतर दिले आहेत.