काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत संभ्रमाचे विधान केल्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा वेगळे वळण घेणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
कुणासोबत सरकार स्थापन करण्याबाबत काहीच ठरलेलं नाही : शरद पवार
राऊत म्हणाले की, राज्यातील सत्ता स्थापनेबद्दल या भेटीत कोणतीही चर्चा झालेली नाही. ओल्या दुष्काळामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. यापार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, यासाठीच त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांना शरद पवारांच्या सभ्रमात टाकणाऱ्या भूमिकेबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. पवारांच्या कोणत्याच विधानावर मी भाष्य करु शकत नाही, असे राऊत यावेळी म्हणाले.
राज्यात सत्तास्थापनेची जबाबदारी ही भाजपची होती. त्यांच्या पळपुटेपणामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे, असे म्हणत त्यांनी भाजपवरही निशाणा साधला. सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात झालेली चर्चा ही काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यातील अंतर्गत होती. ती जाणून घेण्याचा मी प्रयत्नच केला नाही. राज्यातील राष्ट्रपती राजवट अधिक काळ राहू नये, यावर आमच्यात एकमत आहे. लवकरच शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार बनेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
आठवलेंचा नवा फॉर्म्युला, राऊत म्हणाले..तर विचार करु
उल्लेखनिय आहे की, सोनिया गांधी यांच्यासोबतच्या चर्चेत शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याबाबत कोणत्याही विषयाची चर्चा झाली नसल्याचे शरद पवारांनी म्हटले होते. एवढेच नाही तर सत्तास्थापनेसंबंधी कोणत्याही समन्वय बैठकी पार पडलेल्या नाहीत. यासंदर्भातील निर्णय हा आघाडीतील मित्रपक्षांना डावलून घेणार नसल्याचे शरद पवारांनी म्हटले होते.