पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिवसेनेच्या गटनेतेपदी कोण?; आदित्य ठाकरे, सुभाष देसाई की एकनाथ शिंदे

आदित्य ठाकरे

एकीकडे सत्तेत समान वाटा मिळावा, यासाठी भाजपशी सुरू असलेला शिवसेनेचा संघर्ष कायम असतानाच दुसरीकडे शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक गुरुवारी होणार आहे. या बैठकीत पक्षाचा विधीमंडळ गटनेता निवडला जाणार आहे. शिवसेना या पदासाठी कोणाची निवड करणार यावरून विविध तर्क लढविले जात आहेत.

शिवसेनेच्या नव्या आमदारांपैकी अनेकांनी युवासेनाप्रमुख आणि यावेळी पहिल्यांदाच विधानसभेत आलेल्या आदित्य ठाकरे यांच्याकडे विधीमंडळ गटनेतापद द्यावे, अशी मागणी केली आहे. पण यासंदर्भात बुधवारी रात्रीपर्यंत शिवसेना नेतृत्त्वाचा निर्णय झाला नव्हता, अशी माहिती मिळते आहे. सर्वसाधारणपणे ज्याच्याकडे विधीमंडळ गटनेता पद दिले जाईल, त्याच्याकडेच उपमुख्यमंत्रीपदही दिले जाण्याची शक्यता आहे. 

ज्यांच्या मनात पाप तेच सत्तेसाठी पर्यायांबद्दल बोलतात - संजय राऊत

शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, पक्षाचा विधीमंडळ गटनेता म्हणून आदित्य ठाकरे यांची निवड करण्यास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे फारसे उत्सुक नाहीत. आदित्य ठाकरे यांना लगेचच उपमुख्यमंत्री किंवा मंत्री करण्यासही उद्धव ठाकरे तयार नाहीत. विधीमंडळाचे कामकाज कसे चालते हे आदित्य ठाकरे यांनी आधी बघितले पाहिजे, अशी त्यांची अपेक्षा आहे, असे या नेत्याने म्हटले आहे.

पण शिवसेनेतील एका गटाला आणि ठाकरे कुटुंबातील काही जणांना असे वाटते की आदित्य ठाकरे यांच्याकडेच ही जबाबदारी दिली पाहिजे. आदित्य ठाकरे यांनीही हे आव्हान स्वीकारले पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी ही जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला, तर त्यांच्याऐवजी पक्षाचे दुसरे वरिष्ठ नेते सुभाष देसाई किंवा एकनाथ शिंदे यांच्याकडे ही जबाबदारी दिली जाऊ शकते. 

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट

गुरुवारी होणाऱ्या बैठकीत पक्षाच्या आमदारांचा मूड काय आहे, हे सुद्धा उद्धव ठाकरे जाणून घेणार आहेत. सत्तेत समान वाटा देण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. युती करण्यापूर्वी तसेच ठरल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे. त्यामुळे या संदर्भातही आता पुढे काय निर्णय घेतला जातो, हे पाहणेही महत्त्वाचे असणार आहे.